भारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.

काय बोलताय? कधी कधी बोलभिडू म्हणजे निव्वळ आभाळ मारायला लागल्यासारख्या हेडलाईन टाकतात. कस शक्य आहे. सचिन तेंडुलकर अस्सल मुंबईकर. त्याचा आणि पाकड्यांचा काय संबध? उगीच आपलं काहीही काय?

हे बघा मित्रमंडळींनो, यापुर्वी कधी आपण थापा मारलेत काय? मग आत्ता कशाला खोट सांगू. सचिन तेंडुलकर खरच पाकिस्तानकडून खेळला होता. ते पण कसोटी सामन्यात. बर या सामन्यात सचिन तेंडुलकरला पाकिस्तानने बॅटिंग दिली नव्हती. त्यांनी सचिनला फक्त फिल्डिंग करायला लावली. खरतर हेच भारताचं नशिब नाहीतर पाकिस्तानला दोन वर्ष अगोदर सचिनची दहशत कळाली असती.

तर, किस्सा काय आहे ते विस्कटून सांगतो. 

काळ होता १९८७ चा.

भारताने विश्वचषक जिंकून चार वर्ष झालेली. कपिल देव भारतासाठी देव होता. सिद्धु, अजरुद्दिन, के. श्रीकांत, गावसकर असले तगडे प्लेअर सचिनसारख्या पोरांचे देव होते. त्यांच्यासाठी शिवाजी पार्कत खेळत असणारा सचिन काहीही करण्यासाठी तयार असायचं.

तर झालं काय १९८७ च्या दरम्यान पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या महोत्सव  निमित्ताने भारत पाकिस्तानमध्ये पाच सामन्यांची एक विशेष कसोटी मालिका खेळवण्यात येणार होती. लिटल मास्टर गावसकर यांच्या करियरमधली हि शेवटची मालिका होती. त्यातला एक सामना मुंबईच्या प्रसिद्ध अशा ब्रेबॉन स्टेडियमवर खेळवला जाणार होता.

पाकिस्तानच्या संघाचा कॅप्टन होता, इम्रान खान. त्याच्यासोबत जावेद मियॉंदाद, अब्दुल कादिर असे तगडे प्लेअर देखील होते. या संघासोबत भारतीय संघाचा कॅप्टन होता कपिल देव.सामन्याच्या पुर्वी भारत पाकिस्तान मध्ये सराव सामना खेळवण्यात येणार येणार होता.

ठरलेला दिवस उजाडला.  

सराव सामना असला तरी तो भारत आणि पाकिस्तानमध्ये चालला होता हे विसरून चालणार नाही. कितीही नाही म्हणलं तर भारत पाकिस्तानच्या या सराव सामन्यात देखील एकमेकांच्या विरोधात खुन्नस चालूच होती. बर या सर्व गोष्टीत सचिन कुठून आला?

तर सचिन तेंडुलकरला या सामन्यात बॉल बॉय म्हणून काम करत होता. बॉल बॉय म्हणजे चौकार षटकार मारले की बाऊंड्री बाहेर आलेला बॉल स्टेडियमवर फेकण्याचं काम सचिन तेंडुलकरवर सोपवण्यात आलं होतं. सामना सुरु होता. भारत बॅटिंग करत होता तर पाकिस्तान फिल्डिंग करत होता आणि सचिन तेंडुलकर आपलं काम करत होता.

पुढे झालं अस की दूपारच्या सत्रात लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकला गेलेले जावेद मियॉंदाद आणि अब्दुल कादिर हे मैदानात परतलेच नाहीत. त्यांच्या लेखी कितीही झालं तरी हा सराव सामनाच होता. ते दोघं आले नाहीत म्हणल्यानंतर फिल्डरची कमतरता भासू लागली.

अशा वेळी संधिचा पुरेपुर वापर करत सचिन तेंडुलकर इम्रान खानच्या जवळ गेला आणि फिल्डिंग करु का म्हणून विचारले. फिल्डरच कमी आहेत म्हणल्यानंतर इम्रान खान ने देखील बॉल बॉय असणाऱ्या सचिन तेंडुलकरला फिल्डिंगची संधी दिली. सचिनला लॉग-ऑनवर उभं करण्यात आलं.

अखेर काही वेळ गेल्यानंतर सचिनच्या दिशेने बॉल आलाच. तो शॉट कपिल देवने खेळला होता. पाकिस्तानचा फिल्डर म्हणून सचिन तेंडूलकर बॉल मागे धावत होता. एका एकमेव सीन सोडला तर सचिनच्या दिशेने नंतर बॉलच आला नाही. २५ मिनीटे फिल्डिंग केल्यानंतर सचिन पुन्हा बॉल बॉय म्हणून मैदानाबाहेर गेला.

आत्ता तुमच्या डोक्यातला प्रश्न, इतकं डिटेल्स तुम्हाला कुणी सांगितलं. तर हा किस्सा खुद्द सचिनने आपल्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे. शिवाय तो पुढे अस देखील म्हणतो की इम्रान खान यांना हा किस्सा लक्षात ठेवण्यासारखा देखील नसेल. पण इम्रान खान यांच्यामुळेच मला पाकिस्तानकडून फिल्डिंग करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतरच्या दोन वर्षात म्हणजे १९८९ साली सचिन भारताकडून खेळू लागला. नंतरचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहितीच आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही ते मात्र बर झालं, नाहीतर सचिन नावाची धास्ती पाकिस्तानने दोन वर्षांपुर्वीच खाल्ली असती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.