सेलिब्रिटी म्हणून ज्या चौकीचं उद्घाटन केलं, तिथंच सचिनच्या फॅनला फटके पडले

व्यक्ती प्रसिद्ध झाला की आपोआप त्यांचे फॅन्स देखील तयार होतात. अनेकदा हे फॅन्स आपल्या आयडल्ससाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. असाच एक फॅन सचिन तेंडुलकरचाही आहे. पण त्याची विशेष गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरचा हा फॅनसुद्धा बराच प्रसिद्ध आहे. अगदी गूगलवर त्याचं नाव जर तुम्ही सर्च केलं तर चटकन तुम्हाला तो कोण हे समजतं. या फॅनच नाव आहे सुधीर कुमार.

सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट ग्राउंडवर आपला पराक्रम गाजवत होते त्या दरम्यान या फॅनलाही फेम मिळालं. याचं कारण म्हणजे सचिनच्या प्रत्येक मॅचला सुधीर कुमार उपस्थित राहायचे म्हणजे राहायचे. मग ती मॅच कुठेही असो. अगदी देशाच्या बाहेर जरी सामना असला तरीसुद्धा. ते देखील त्यांच्या एकदम हटके अंदाजात. संपूर्ण शरीर भारतीय तिरंग्याच्या रंगात रंगवून आणि छातीवर सचिन तेंडुलकरांचं नाव लिहून!

अशी दिवानगी असले तर तुमचा प्रेमी तुमची दखल घेणार नाही असं होईल का!

जेव्हा सचिनला या फॅनबद्दल कळलं तेव्हापासून त्यांची अशी काय जवळीक झालीये की सचिनच्या प्रत्येक बर्थडेला आता हा भिडू थेट सचिनच्या घरी असतो. आणि त्याला सचिनच्या घरात एंट्रीसुद्धा खुली आहे. पण जेव्हापासून सचिनने रिटायरमेंट घेतली, हा फॅन देखील बातम्यांतून काहीसा दूर लोटला गेला होता. मात्र आता तो परत माध्यमांत चर्चेचा विषय झालाय. कारण भावावर प्रसंगच तसा ओढवला आहे.

या भिडूनं सेलिब्रिटी गेस्ट म्हणून ज्या चौकीचं उद्घाटन केलं, तिथंच त्याला फटके पडले आहे.

ही घटना घडली आहे बिहारच्या मुजफ्फरपुर इथे. झालंय असं की, गुरुवारी २० जानेवारीला टाऊन ठाणे पोलिसांनी सुधीर कुमार यांचा चुलत भाऊ किशन कुमार याला ताब्यात घेतलं होतं. तेव्हा सुधीर कुमार घरी नव्हते. संध्याकाळी जेव्हा सुधीर घरी आले तेव्हा त्यांना भावाच्या अटकेची बातमी कळाली.

किशन कुमारला पोलिस घेऊन गेल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं, मात्र प्रकरण काय आहे, हे सांगितलं नाही.  यानंतर सुधीर यांनी स्वत: पोलीस ठाणे गाठलं. तिथे पोलिसांनी त्यांच्या चुलत भावाला लॉकअपमध्ये ठेवलं होतं. भावाला लॉकअपमध्ये बंद असल्याचं पाहून सुधीर थेट त्याच्याकडे गेले आणि नेमकं प्रकरण काय आहे हे त्यांना विचारू लागले. तेव्हा किशन यांनी घडलेला प्रकार सांगितला.

किशन यांनी सांगितलं की, त्यांच्या एका मित्राने जमीन खरेदी केली होती. यावेळी साक्षीदार म्हणून किशन यांचं नाव त्यांनी दिलं होतं. या जमिनीसंदर्भात काही वाद चालू होते त्याअंतर्गत पोलिसांनी किशन यांना अटक केली होती. पण नेमका वाद काय आहे, याची माहिती अजूनही त्यांना देण्यात आलेली नव्हती. यावेळी सुधीर आपल्या भावाशी बोलतंच होते तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा सुधीरकुमार यांनी विरोध केला तेव्हा  या अधिकाऱ्याने त्यांना मारहाण केली.

सुधीर यांना मारहाण झाल्यानंतर ते चुपचाप पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी डीएसपी यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा डीएसपी यांनी प्रकारावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र याने सुधीर खूप दुखावले गेले असून हे आपलं दुर्भाग्य आहे की, ज्या ठाण्याचं उदघाटन केलं तिथेच आज मार खाण्याची वेळ आली, असं ते म्हणताय.

क्रिकेटच्या देवाच्या फॅनवर ओढवलेल्या या प्रकरणाचं पुढे काय होतंय हे तर येणाऱ्या काळात कळेलंच. पण आयुष्यात कधी आपण स्वप्नातही विचार करणार नाही तसे प्रसंगही आपल्या समोर येऊ शकतात हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं हे नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.