सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने प्रकरणातून सहीसलामत सुटणार का..?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचार प्रकरण सध्या सुरु आहे. गेल्या वर्षीपासून यात काही ना काही घडतंच असल्याने बातम्यांमधून हे प्रकरण खाली उतरण्याचं नाव घेतंच नाहीये.
या प्रकरणात अजून एक नाव आहे ते म्हणजे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे.
प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या याच सचिन वाझे यांना काल १ जूनला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. १० फेब्रुवारीला त्यांनी माफीचा साक्षीदार होण्यास तयारी दाखवली होती आणि अर्ज केला होता. त्यानुसार आता जूनमध्ये हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं स्वीकारला आहे.
मात्र या प्रकरणात यापूर्वी राज्याचे सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले होते ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणाले होते,
माफीचा साक्षीदार बनविणे म्हणजे एकप्रकारे त्या गुन्ह्यातून त्या आरोपीची मुक्तता करणे होय. त्यामुळे त्या गुन्ह्यात आरोपीची भूमिका नेमकी कशी आणि किती आहे, हे लक्षात घेऊन नंतरच संबंधित आरोपीला माफीचा साक्षीदार करायचा की नाही, हे न्यायालय ठरवत असतं.
एखादा मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करीत असेल, तर त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळणे जवळजवळ अशक्य असतं…
उज्ज्वल निकम यांचं म्हणणं पाहिल्यास काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे सचिन वाझे. मुख्य आरोपी असूनही सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलेलं आहे.
माफीचा साक्षीदार होऊन सचिन वाझेला काय फायदा होणार का? याचा अर्थ ते या प्रकरणातून सुटणार का? याचीच उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…
सुरुवातीला हे प्रकरण काय आहे? ते थोडक्यात बघू…
गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी वाझेंवर शंका व्यक्त केली. आणि संपूर्ण तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी केली.
त्यानंतर प्रकरणात खळबळ उडाली ती गाडी मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळल्यानंतर. मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकले पुन्हा सचिन वाझे. त्यानंतर १३ एप्रिल २०२१ ला सचिन वाझे यांना जवळपास १३ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने त्यांना अटक केली. ते अजूनही अटकेत आहेत.
आलरेडी अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे अडकले होते. तोच अनिल देशमुखांचा मनी लॉन्डरिंग प्रकरण पुढे आलं त्यातही सचिन वाझे दोषी आढळले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले होते ते म्हणजे, अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील बार,रेस्टॉरंट मधून १०० कोटींची खंडणी वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. याचसंदर्भात ईडीने अनिल देशमुखांना अटक केली.
हे सगळ्या नाट्यमय घडामोडी घडतच होत्या की, सचिन वाझेने मनी लाँड्रींग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली.
आता माफी देण्याचा मुद्दा पाहिला तर, मुख्य न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्ट किंव्हा हाय कोर्टचे न्यायाधीश किंवा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात. पण ही परवानगी केवळ ज्या गुन्ह्यास सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेल्या सर्व प्रकरणात दिली जाऊ शकते.
पण हे ही मेख आहे की, हे गुन्हे आर्थिक स्वरूपाचे नसावेत.
असं असताना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं सचिन वाझेला नेमकं आर्थिक प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे. ते ही मुख्य आरोपी असताना. तेव्हा यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी आम्ही ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशीच संपर्क साधला. तेव्हा त्यांनी या विषयांबद्दल सांगितलं…
माफीचा साक्षीदार होणं म्हणजे फिर्यादी पक्ष म्हणजे सरकार आणि तो गुन्हेगार यांच्यात एक करार असतो की, जर त्या गुन्हेगाराने त्याला माहित असलेली खरी व पूर्ण हकीकत सांगितली तर त्याला न्यायालय माफी देत. एकदा की कोर्टातील पुरावा झाला की त्याची सुटका होते.
पण माफीचा साक्षीदार केव्हा करावा याविषयी काही मापदंड आहेत. पहिलं म्हणजे त्या गुन्ह्यात त्याचा कमीत कमी सहभाग असावा. दुसरं म्हणजे माफीच्या साक्षीदाराने सांगितलेलं कथन हे पुष्टीदायक पुरावा आहे की नाही, याची कोर्टाला खात्री करावी लागते. मग कोर्ट विश्वास ठेवून सुटका करू शकतं.
यानुसार वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आलंय. तेव्हा यात काय होऊ शकतं? सचिन वाझेला काय फायदा होऊ शकतो? सुटका होऊ शकते का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला…
त्यांनी सांगितलं की,
या प्रक्रियांमधली उणीव म्हणजे, सगळं सुरु झालं मुकेश अंबानी यांच्या हत्येच्या कटापासून तेव्हा यात त्यांचं स्टेटमेंट घेणं गरजेचं होतं, तेच यात नाहीये. तेव्हा ती घेणं गरजेचं आहे नाहीतर आरोपी सुटू शकतात. सचिन वाझे यामध्ये मुख्य आरोपी आहे. मुख्य आरोपी शिवाय गुन्ह्याची चेन घडूच शकत नाही. तेव्हा कायद्यानुसार ते माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही. जरी त्यांना करण्यात आलं आहे तरी हे बेकायदेशीर ठरणार आणि यावर कुणीही आक्षेप घेत तक्रार करू शकतं.
यात सचिन वाझे यांना सुटका मिळू शकते का? तर मुळीच नाही. हे फार कठीण आहे. पण फायद्याबद्दल बोलायचं तर सचिन वाझे यांची शिक्षा कमी होऊ शकते कारण ते न्यायालयाची मदत करत आहेत.
अशाप्रकारे वाझे प्रकरणाने वळण घेतलं आहे. सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं असून ७ जूनच्या सुनावणीत प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. शिवाय या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाच भिडू
- सचिन वाझे जर माफीचा साक्षीदार झालाच तर कोण-कोण गोत्यात येऊ शकतं ?
- बंगाल निवडणूक आणि कोरोनाची दुसरी लाट या वातावरणात सचिन वाझेचं काय झालं?
- एन्काऊंटर स्पेशालीस्ट सचिन वाझेंनी एकेकाळी सेनेकडून आमदारकीची तयारी केली होती