एन्काऊंटर स्पेशालीस्ट सचिन वाझेंनी एकेकाळी सेनेकडून आमदारकीची तयारी केली होती

२ डिसेंबर २००२, मुंबईच्या घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. दोन जण मारले गेले तर अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी तपास करताना आठ जणांना अटक केली. त्यात एक ख्वाजा युनुस नावाचा तरुण होता. तो इंजिनियर होता, मुळचा परभणीचा मात्र दुबईला नोकरी करायचा.

२५ डिसेंबर ला त्याला पोटाच्या अंतर्गत अटक केली होती. बॉम्बस्फोटात त्याचा हात आहे असा पोलिसांचा दावा होता. क्राईम ब्रँचचे अधिकारी चौकशी साठी म्हणून ख्वाजा युनूसला औरंगाबादला घेऊन जात होते. तेव्हा नगरच्या पारनेरजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात झाला.

यावेळी ख्वाजा युनूस संधीचा फायदा उचलत पळून गेला , तिथून तो परत कधीच दिसला नाही. असा जबाब क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवला.

पण त्याच्या कस्टडीतील इतर कैद्यांनी आरोप केला की क्राईम ब्रँचचे अधिकारी ख्वाजा युनुसचे सगळे कपडे काढून त्याला रक्त येई पर्यंत मारत होते. त्यानंतर तो कधी दिसलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला की पोलिसांनी ख्वाजा युनुसचा एन्काऊंटर केला.

या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यामुळे चार पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने बडतर्फ केलं होतं. 

यात प्रमुख नाव होते एन्काऊंटर स्पेशालीस्ट सचिन वाझे

सचिन वाझे मुळचे कोल्हापूरचे. असं म्हणतात की त्यांचे वडील राजकारणातील मोठ प्रस्थ होत. मात्र वाझे यांनी राजकारणाच्या ऐवजी स्पर्धा परीक्षेचं करीयर निवडलं. एमपीएससीची परीक्षा दिली आणि १९९० साली सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले. त्यांची पहिलीच पोस्टिंग गडचिरोली येथे झाली होती.

तिथे नक्षलग्रस्त भागात त्यांनी केलेलं कार्य प्रचंड गाजलं. पुढची पोस्टिंग ठाणे येथे झाली. त्यांची धडाडी, मोठे केसेस सोल्व्ह करण्याचे खास तंत्र यामुळे वाझे यांच नाव तिथल्या प्रत्येकाच्या तोंडात बसलं. तिथे मुंब्र्यासारख्या दंगलग्रस्त एरियात त्यांनी शांततेसाठी जे कार्य केलं त्यासाठी त्यांच प्रचंड कौतुक झालं.

सचिन वाझे यांची मुंबईच्या नावाजलेल्या क्राईम ब्रांचसाठी निवड झाली. प्रदीप शर्मा, दया नायक अशा फेमस एन्काऊंटर स्पेशालीस्ट अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. ठाण्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

दाउद इब्राहीमपासून ते छोटा राजन पर्यंत अनेक गँगमधील कुख्यात गुंडांचा त्यांनी निकाल लावला. त्यांच्या नावावर सराईत गुन्हेगार मुन्ना नेपाळी याच्यासह ६३ गुंडांना यमसदनी पाठवण्याचा रेकोर्ड आहे.

फक्त एन्काऊंटरच नाही तर सचिन वाझे पोलीस डिपार्टमेंटमध्ये टेक्नोसॅव्ही म्हणून प्रसिद्ध आहेत.

टेक्नोलॉजीशी संबंधित अनेक खटल्यांचा निकाल त्यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आला आहे. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. मराठी फेसबुक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या laibhari.com ची देखील निर्मिती त्यांचीच होती.

असे  हे जांबाज पोलीस ऑफिसर सचिन वाझे ख्वाजा युनुस प्रकरणात मात्र चांगलेच गोत्यात आले. कोर्टाने त्यांचे निलंबन केल्यावर वाझे यांनी २००७ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण त्यांचाय्व्रील प्रकरणाचा अजून तपास सुरु असल्यामुळे पोलीस खात्याने हा राजीनामा स्वीकारला नाही उलट २००९ साली त्यांना बढतीच दिली.

निलंबन झालेल्या काळात सचिन वाझे यांनी राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला.

२००८ सालच्या दसरा मेळाव्यात सचिन वाझे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. याची संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा झाली. सचिन वाझे यांच्यासारखा धडाकेबाज अधिकारी राजकारणात येत असेल तर त्याच स्वागतच आहे असाही सूर काहीजणांनी लावला.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी सचिन वाझे यांनी आपले गुरु प्रदीप शर्मा यांच्याबरोबर जोरदार तयारी केली होती.

प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार होते. मात्र कुठे माशी शिंकली माहित नाही पण या दोघांनाही तिकीट मिळाले नाही. मागच्या वर्षीच्या निवडणुकीत मात्र प्रदीप शर्मा यांनी पोलीसखात्याचा राजीनामा देऊन सेने कडून निवडणूक लढवलीच.

पण सचिन वाझे यावेळी राजकारणापासून दूर राहिले. यावर्षी तब्बल सतरा वर्षांनी त्यांना परत पोलीस खात्यात जॉईन करून घेण्यात आलं. पोलीस आयुक्तांनी या प्रसंगी सांगितल की न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून वाझे यांच्यासह देसाई, तिवारी आणि निकम यांना पोलिस सेवेत घेण्यात आले आहे.

मागे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध अन्वय नाईक यांच्या आत्महत्येविषयक  चाललेल्या केसची तपासणीत ते सहभागी झाले होते.

सध्या अंबानी यांच्या घराबाहेर ज्या गाडीत स्फोटके सापडली त्याच्या मालकाचा मनसुख हिरेन याचा मृतदेह आज सापडला. या प्रकरणाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला असून हिरेन याचे गायब होण्यापूर्वी सचिन वाझे यांच्याशी फोन कॉल झाले होते असा आरोप केला गेलाय.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.