चिडलेल्या सचिनने दादाला ‘तुझं करियर संपवतो’ अशी धमकी दिली होती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारतीय टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. अटीतटीची टेस्ट सिरीज सुरू होती. पहिल्या दोन कसोटी ड्रॉ झाल्या होत्या.

तेव्हा आपला कप्तान होता सचिन तेंडुलकर तर विंडीजचा कप्तान होता ब्रायन लारा.

हे दोघेही ऐन भरात होते. कुठल्याही विकेटवर कोणत्याही बॉलरला उध्वस्त करण्याची क्षमता त्यांच्या कडे होती.

अख्ख जग डावखुरा लारा भारी की उजवा सचिन भारी या वादात विभागल गेलं होतं.

या दोघांपैकी नंबर वन कप्तान कोण याबद्दलही त्यांच्या फॅन्समध्ये भांडणे सुरू झाली होती. या टेस्ट सिरीज मध्ये याचा निकाल लागणार अस बोललं जातं होत. होम कँडीशनमध्ये खेळत असल्यामुळे लाराला बेनिफिट होता.

विंडीजच्या वेगवान विकेटवर खेळणे भारताला अवघड जाते हा इतिहास होता.

त्यातच आपला सर्वोत्तम फास्टर बॉलर जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे एक बाजू कमजोर झाली होती. तरीही पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राखणे हे देखील आपलं यश होतं.

त्याकाळात भारतीय बॅटिंग पूर्णपणे सचिनवर अवलंबून असायची. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे अनेक तगडे बॅट्समन होते मात्र अझर, सिद्धू सारखे बॅट्समन करियर च्या उतरतीस होते तर गांगुली, लक्ष्मण,द्रविड यांचा अजून जम बसला नव्हता.

ही तिसरी मॅच जिंकणे भारतासाठी अतिशय गरजेचं होतं.

पहिल्या डावात चंद्रपॉलच्या शतकाच्या जोरावर विंडीजने २९८ धावा काढल्या. याला उत्तर देताना द्रविड आणि सचिनने केलेल्या संयमी बॅटिंग मुळे भारताने ३१९ रन्स बनवल्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये चमत्कार झाला. लारा सोडला तर एकही वेस्ट इंडियन बॅट्समन भारतीय फास्टर बॉलर समोर टिकू शकला नाही. वेंकटेश प्रसाद आणि अबी कुरविला यांनी १४० धावांमध्ये त्यांना गुंडाळून टाकले.

भारतापुढे विजयासाठी फक्त १२० धावांच आव्हान होतं.

सचिन प्रचंड खुश होता. त्या दिवशी संध्याकाळी एका भारतीय हॉटेलमध्ये डिनरला गेल्यावर तिथल्या मालकाला गंमतीत उद्याच्या विजयासाठी शॅम्पेन रेडी ठेव असं सांगितलं होतं.

पण दुर्दैवाने घडलं उलटंच. कर्टली अम्ब्रॉसच्या धुंवाधार बॉलिंग पुढे भारतीयांनी नांगी टाकली. ऑपनिंगला आलेला लक्ष्मण सोडला तर संपूर्ण टीममध्ये एकानेही दोन अंकी आकडा गाठला नव्हता.

भरवश्याचा सचिन ४ धावांवर आउट झाल्यावर पत्त्याचा बंगला कोसळावा तसा अख्खा डाव कोसळला.

अगदी सहज सोपी मॅच आपण ३८ धावांनी गमावली.

त्या दिवशी सचिन प्रचंड रागात होता. अगदी कमी वयात उचलावी लागलेली कप्तानीची जबाबदारी त्याला पेलवत नाही, कर्णधारपदामुळे त्याच्या बॅटिंगवरही परिणाम होत आहे अशी मीडियामध्ये चर्चा होती.

शिवाय मॅच फिक्सिंगची कुणकुण लागायला सुरवात झाली होती.

काही सिनियर खेळाडू जीव तोडून खेळत नाहीत याचाही सचिनला राग आला होता. पण त्यांना काही म्हणता येत नाही यामुळे त्याचा कोंडमारा होत होता.

पराभवानंतर गांगुली ड्रेसिंग रूममध्ये आला. तेव्हा त्याला सचिन एका कोपऱ्यात बसून रडतोय हे दिसले. सचिनच गांगुलीवर लक्ष गेलं. मग त्याच्या सर्व रागाचा भडका दादावर उडाला.

गांगुली टीममध्ये नवीन आला होता, तो टॅलेंटेड असूनही फिटनेस कडे लक्ष देत नाही अशी तक्रार सचिनची होती. सचिन म्हणाला,

“रोज सकाळी पहाटे लवकर उठून माझ्या सोबत रनिंगला यावे लागेल. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. इथे माझ्या सोबत खेळायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागणार.”

रागाच्या भरात सचिनने सौरव गांगुलीला चांगलं खेळत नसल्यास टीम मधून बाहेर काढून करियर संपवण्याची धमकी दिली.

दोघे समवयस्क होते. अंडर 16 च्या काळापासून दोघे एकमेकांना ओळखत होते. गांगुलीला ठाऊक होते की सचिनचे फ्रस्ट्रेशन का निघत आहे ते. तो काही बोलला नाही. सचिनच्या रागवण्याला त्याने पॉजिटीव्हली घेतले.

त्यांनंतर गांगुलीने स्वतःच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली.

सचिन आणि तो मिळून अनेक सामने त्यांनी भारताला जिंकून दिले. पुढे गांगुली कप्तान बनल्यावर त्याच्या नेतृत्वाखाली सचिनचा खेळ बहरला.

आजही त्यांची मैत्री आणि एकमेकांच्या खेळाबद्दलचा आदर अबाधित आहे. स्वतः गांगुलीने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनस या शो मध्ये हा किस्सा सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.