क्रिकेट पंढरी लॉर्ड्सवर शतक झळकवणे सचिनला फक्त एकदाच जमलं होतं..

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगमान्य खेळाडूंच नेतृत्व करतं सचिनने लॉर्ड्स गाजवल होत. आज त्या घटनेला २३ वर्ष पुर्ण होत आहेत.

लॉर्ड्स म्हणजे क्रिकेट जगताची पंढरी. लॉर्ड्सवर खेळायला मिळावं हे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही लॉर्ड्सवर काही पराक्रम केलात तर क्रिकेट जग तुमचं नावं सोनेरी अक्षरात पाठीवर लिहून ठेवत. असाच एक पराक्रम सचिनने २५ व्या वर्षीच आपल्या पदरी पाडून घेतला होता.

तो दिवस होता १८ जुलै १९९८. हा दिवस सचिनच्या कारकीर्दीत सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला होता.

यादिवशी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर प्रिन्सेस डायना मेमोरियल फंडासाठी एका एक दिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख राष्ट्रांमधील जगज्जेते खेळाडू भाग घेणार होते. यामधील एका संघाचा कर्णधार होता माईक आथरटन आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार होता सचिन तेंडुलकर.

इतर जगज्जेते खेळाडू असताना सचिनला कर्णधार करायचे कारण की, सचिनचा असलेला फॉर्म.

सचिनने इतक्यातच आपले टेस्ट करियर मधले १७ वे शतक पूर्ण केले होते व तसेच भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सुद्धा त्याच्याकडेच होते. तरीपण लॉर्ड्स वर नेतृत्व करण्याच्या या संधीला तो आपल्या आयुष्यातील सुवर्ण पान आजही मानतो.

सचिनच्या नेतृत्वात खेळणारी टीम जर आपण पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल की सचिन किती मोठ्या खेळाडूंचे नेतृत्व करत होता ते. १) सचिन तेंडुलकर (कर्णधार), २) सनथ जयसूर्या, ३) सैद अन्वर, ४) अरविंद डिसिल्व्हा, ५) ग्रॅम हिक, ६) टॉम मुडी, ७) वसीम अक्रम, ८) क्रिस केन्स॔, ९) अँडी फ्लॉवर, १०) मुश्ताक अहमद, ११) ईअन बिशप.

या सर्व स्वतःपेक्षाही अनुभवी व दिग्गज खेळाडूंचे नेतृत्व करण्याची संधी त्याला खुप लहान वयात मिळाली होती.

आथरटनचा संघ प्रथम खेळायला आला आणि त्यांनी ५० ओव्हरमध्ये ४ बाद २६१ अशा धावा केल्या. त्यांच्याकडून चंद्रपॉल ने नाबाद १२७ धावा केल्या. मिळालेल्या २६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला सचिन ओपनर म्हणूनच खेळायला आला. त्याला ॲलन डोनाल्ड, क्रेक मॅगरा, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे आणि ब्रायन मॅकमिलन ह्या क्रिकेट विश्वातल्या पाच यशस्वी गोलंदाजांना तोंड द्यायचे होत.

मॅच सुरु झाली आणि सनथ जयसुर्या व सैद अन्वर हे दोन फलंदाज लवकर आऊट झाले. आणि सगळी जबाबदारी येऊन पडली ती सचिनवर. त्याच्यासोबतीला अरविंद डिसिल्व्हा आला व दोघांनी डाव सावरला.

सचिनने मिळालेल्या संधीचा फायदा घेत १५ दणदणीत चौकरांसह आणि ४ षटकारांसह १२५ धावा केल्या आणि ४३.३ ओव्हर मध्येच सचिनच्या टीमने मॅच संपवुन टाकली. सचिनच्या खेळीमुळे त्याच्या संघाचा विजय झाला होता. लॉर्ड्सवर सचिनचे हे पहिलच शतक होत आणि तेही जगातल्या उत्कृष्ट गोलंदाजी विरुध्द आणि मातब्बर प्रेक्षकांसमोर.

लॉर्ड्स वरचे सुटाबुटातील प्रेक्षक हे परकोटीचे क्रिकेट रसिक असतात. त्यांच्याकडून शाबासकी मिळवणे हे सहज शक्य नसते. पण ज्यावेळी सचिन १२५ धावांवर बाद झाला तेव्हा संपुर्ण लॉर्ड्स मैदानावर सचिनला टाळ्यांच्या गजरात स्टँडिंग ओवेशन देण्यात आले होते.

आपल्या आक्रमक शैलीने, उत्तम फुटवर्कने आणि जबरदस्त प्लेसमेंटने त्याने सर्वांची मने जिंकून घेतली होती. सचिनची खेळी इतकी नयनरम्य होती की, सचिनच्या पाठी विकेट किपिंग करणारा ईअन अली हा मॅच झाल्यावर बोलला की, “मी आजवर अनेक डावांच्या वेळी विकेट किपिंग केली आहे. पण सचिनची खेळी पाहताना तो मला एक परिपुर्ण फलंदाज वाटला.”

दुसऱ्यदिवशी ही लंडनच्या वृत्तपत्रांनी सचिनचा गौरव करताना त्याला थेट डॉन ब्रॅडमन आणि डब्ल्यू.जी.ग्रेस. या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत नेऊन बसवलं.

सचिनसाठी ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट होती.

– कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.