सदफला गाडी मिळाली ; समाजात मदतीला धावून येणारे अनेकजण आहेत…

चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजारों बोटं असोत असं जेष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे म्हणतात. याचाच प्रत्यय सदफच्या निमित्ताने आला. सदफची दूचाकी कुंभार्ली घाटातून चोरीला गेली होती. हा सदफ कोण आणि नेमकं काय करतो हे आम्ही बोलभिडूच्या माध्यमातून आपणासमोर आणलं होतं. आपण खालील लिंकवर क्लिक करुन त्याच्याबद्दल वाचू शकता.

सदफची गाडी चोरीला गेल्यानंतर त्याच्या या चांगल्या कामात खंड पडू नये म्हणून बोलभिडू मार्फत सदफच्या कामासाठी आपली गाडी देवू करावी असे आवाहन करण्यात आले होते. सर्वात प्रथम पराग वडके यांचे अभिनंदन. कारण त्यांच्यामुळे बोलभिडू पर्यन्त सदफची योग्य माहिती पोहचू शकली. पराग वडके यांच्या फेसबुकपोस्टमुळे सदफ बाबत माहिती मिळाली. बोलभिडू वरून सदफ बाबतचा लेख प्रकाशित करण्यात आला.

या आवाहनला प्रतिसाद देत गोवा येथील न्यूज १८ लोकमतचे गोवा प्रतिनिधी अनिल पाटील यांनी आपली बॉक्सर गाडी सदफला देवू केली. काल दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सदफला ती गाडी अनिल पाटील यांनी सुपूर्त केली. आज दिनांक १३ जानेवारी रोजी सदफ व राणी प्रभुळकर बेळगाव येथे त्यांच्याशी संबधित व्यक्तिकडे मुक्कामी राहिले असून उद्या कोल्हापूर मार्गे ते संस्थेची कामे संपवून गावी जाणार आहेत.

याबद्दल अनिल पाटील यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. अनिल पाटील हे पेशाने पत्रकार आहेत. यापूर्वी ते झी न्यूज, टाईम्स नाऊ, एनडीटिव्ही साठी देखील पत्रकारिता करत होते.

पत्रकारतेसोबत पर्यावरणासंबधित कामांमध्ये ते सक्रीय असतात. पश्चिम घाटात पर्यावरणासंबधित कार्यरत असणाऱ्या विविध सघटनांच्या नेटवर्किंगमध्ये ते काम करतात. पश्चिम घाटासंबधित काम करणाऱ्या विविध संघटना, संस्था, पर्यावरण कार्यकर्ते यांना एकत्रित करुन कामांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी वेस्टर्न वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (गोवा) या बॅनरअंतर्गत कार्यरत आहेत.

अनिल पाटील यांनी देशातील विविध अभयारण्यांमध्ये, नॅशनल पार्कमध्ये जैवविविधतेचा डेटा गोळा करण्याचे काम केले आहे. बिग कॅट मधील वाघ, बिबट्या यांच्या मानवी जिवनाचा असलेला संबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून पश्चिम घाटातील प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, फुलपाखर यावरही त्यांचा अभ्यास आहे.

अशा या अनिल पाटलांनी सदफला मनापासून कोणताही स्वार्थ न ठेवता मदत केली. 

अगदी त्यांच्याबाबत चार ओळी लिहाव्यात म्हणून त्यांची माहिती जेव्हा आम्ही विचारली तेव्हा ते म्हणाले,

कशाला रे..! सदफसारख्या मुलांमागे उभा राहणं हे आपलं कर्तव्य आहे. केलेली गोष्ट या कानाची त्या कानाला कळू नये. कशाला सांगायचं…

पण वास्तविक अनिल पाटील यांच्यासारखी माणसं आहेत हे लोकांना समजावं म्हणूनच त्यांच्याबाबत आम्ही सांगत आहोत.

याचसोबत सदफला चिपळूणच्या संजय सुर्वे यांनी संपर्क साधत कोणतिही बाईक मिळेपर्यन्त आपली बाईक वापरायला दिली होती. तर पुण्याच्या विश्वास साठे यांनी नवीन बाईक मिळेपर्यन्त आपली देखील बाईक घेवून जाण्यास सदफला सांगितले. सातारचे असिफ खान यांनी बाईक देण्याविषयी सदफसोबत संपर्क केला. तर यवतमाळच्या कपिल श्यामकुंवर यांनी देखील आपली बाईक देवू केली होती. आटपाडीचे मनोज भागवत यांनी संपर्क करुन तुर्तात आपली बाईक देखील वापरण्यासाठी घेवून जावू शकतो अस सांगितलं.

सोबतच पोफळीच्या सुर्यकांत शिंदे, खेर्डीचे नितीन साळवी, शिरगांवचे महेंद्र कापडी, कासारखडकचे संतोष शेळके, पोफळीचे असलम कडवेकर यांनी सदफचं काम थांबू नये म्हणून नवीन बाईक मिळत नाही तोपर्यन्त त्यांची बाईक देवू केली..

असे एक ना अनेक माणसं सदफच्या कामासाठी धावून आले, प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. अनेकांनी संपर्क केला. सदफ बराच काळ हा घाटमाथ्यावर, धनगर पाड्यांमध्ये मुक्कामाला असल्याने अनेकांचा त्याच्याशी संपर्क देखील होवू शकला नसेल.

जे जे लोक धावून आले त्यांचे मनापासून आभार…

1 Comment
  1. Daulat Kirdat says

    अनिल पाटील सरांचे, सौरभ पाटिल आणि बोल भिडू चे आभार… तुमच्या मुळे Sadaf ch काम चालू राहील…

Leave A Reply

Your email address will not be published.