अमरापूरकरांच्या या एका रोलसाठी फिल्मफेअरला नवीन कॅटेगिरी बनवावी लागली होती.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बेरकी खलनायक म्हणून सदाशिव अमरापूरकर हे नाव वरच्या रांगेत आहे. ज्यांच्या अभिनयाने आपण अवाक होतो कधी कधी भीती आणि रागही येतो. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका कलाक्षेत्रातल्या लोकांना कायम आव्हान वाटत राहतात. डोळ्यात असणार बेरकीपण, सावळा रंग आणि कुत्सित हसू यामुळे त्यांचा पडद्यावरचा वावर कायम प्रभावित करतो.
वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचा त्यांचा हातखंडा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेला अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. उत्तम विनोदी टायमिंग ही त्यांची खासियत होती पण खलनायकी भूमिकांकडे ते कसे वळले ह्याचासुद्धा एक किस्सा आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकांकिका या नाट्यप्रकाराशी त्यांचा संबंध आला आणि नाटकाने त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं. नाटकाचं त्यांना इतकं भयंकर वेड होत की घरी वडिलांसोबत त्यांचे कायम खटके उडायचे. वडिलांना त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली होती पण अमरापूरकरांचं नाटकाचं वेड त्यांना गप्प बसू देत नव्हत.
एके दिवशी वडिलांनी त्यांना घरात कोंडून टाकलं आणि परत नाटकाचं नाव घेऊ नको म्हणून बजावलं पण अमरापूरकराना माहिती होतं की ते नाटकाशिवाय जगू शकत नाही. त्यांनी ओरडून ओरडून घर डोक्यावर घेतलं आणि उलट वडिलांनाच दम दिलं की ते काहीकेल्या नाटक कधीच सोडणार नाही म्हणून.
शेवटी वडिलांनीच त्यांचा नाद सोडला.
नाटकाच्या दौर्यानिम्मित होणारे प्रवास आणि नवीन लोकांसमोर सादर केला जाणारा अभिनय याने ते लोकांच्या नजरेत येऊ लागले. व्यावसायिक नाटक करून पैसेही मिळवता येऊ शकतात हे त्यांना कळल्यावर त्यांनी व्यावसायिक नाटकांकडे वाटचाल सुरु केली.
नाटकातला त्यांचा अभिनय बघून इतर नाटकात भूमिका करण्यासाठी त्यांना बोलवण येऊ लागलं आणि त्याचे पैसेही मिळू लागले. लग्न आणि पोरंबाळ होऊनसुद्धा नाटकाप्रतीची त्यांची निष्ठा तसूभरही कमी झाली नाही.
पत्नीची LIC मध्ये नोकरी होती आणि भावाच एक दुकान होत त्यामुळे वडिलांसकट घरच्यांकडून त्यांना भक्कम सपोर्ट मिळाला आणि ते मुंबईत आले. मुंबईत येऊनही ते नाटकच करत राहिले. नाट्य वर्तुळात एक सशक्त अभिनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
HANDSOME या एका मराठी नाटकात त्यांना विजय तेंडूलकरानी बघितल आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली.
गोविंद निहलानी दिग्दर्शित अर्धसत्य ह्या पहिल्याच चित्रपटात त्यांच्या अप्रतिम भूमिकेने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. त्या रोलचा इतका गाजावाजा झाला की त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला.
श्याम बेनेगल दिग्दर्शित भारत एक खोज या मालिकेत त्यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली. नाटकातला पहिला रोल आणि चित्रपटातील पहिला रोल दोन्हीही खलनायकचं होते. खलनायकी रोल देण्यामागच कारण तेंडुलकरांना विचारलं असता ते म्हणाले की
ही तुझ्या डोळ्यांची जादू आहे. तुझ्या डोळ्यात असलेला बेरकीपणा इतर कुणाच्याही डोळ्यात नाही.
तेंडूलकरांच्या या उद्गाराने अमरापूरकर अवाक झाले पण ह्या विधानाला त्यांनी चांगल्या अर्थाने घेऊन आपली अभिनय शैली अजूनच बहरवली.
तीनशेपेक्षा मराठी हिंदी चित्रपट त्यांनी केले पण त्यातला सगळ्यात जास्त नायक नायिकेपेक्षाही खलनायक म्हणून लक्षात राहणारा १९९१ला आलेला चित्रपट म्हणजे सडक. त्यावेळी संजय दत्त हा वेगळी भूमिका करू पाहत होता. महेश भट्ट ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. सडक चित्रपट जितका गाण्यांनी गाजला तितकाच सदाशिव अमरापूरकर यांच्या महाराणी या भूमिकेने गाजला.
इतका काळ उलटून गेला पण जितक्या वेळा सदाशिव अमरापूरकर यांचं नाव येईल तितक्या वेळा त्यांच्या या अजरामर भूमिकेचं नाव सदोदित येत राहील. कामाठीपुर्यातील एका हिजड्यावरून प्रेरित होऊन महेश भट्ट यांनी महाराणी हे पात्र चित्रपटात आणलं.
ह्या पात्राच्या नुसत्या पडद्यावरील वावराने भल्याभल्यांच्या काळजात धडकी भरायला लागली.
चित्रपटातील त्यांच्या पहिल्या सीनपासून ते प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात इतका ताकदीचा अभिनय त्यांनी केला. केसाची बट तोंडात घेऊन ,लहरीपणाने संवाद फेकणे ह्या पात्राची खासियत होती.
चित्रपट संपल्यावरही त्यांची भूमिका विसरली जात नाही. त्यांच्या या भूमिकेनंतर अनेक नट लोकांनी अशी भूमिका करण्याचा प्रयत्न केला पण सदाशिवरावांइतका प्रभाव कुणातही दिसला नाही. अभिनय कसा असावा, पात्र कसं उभं राह्त याची उत्तम जाण असणारा हा अभिनेता होता.
त्यांच्या सडक मधील भूमिकेने फिल्मफेअरमध्ये धडक दिली आणि विजयी सुद्धा झाले पण हा पुरस्कार कोणत्या कॅटेगिरी मध्ये द्यावा ह्याविषयी संभ्रम आयोजकांमध्ये होता. शेवटी अमरापूरकरांच्या या भूमिकेसाठी एक नवीन कॅटेगिरी बनली आणि त्या कॅटेगिरीचं नाव होतं
best actor in a villainous role.
ह्या बदललेल्या कॅटेगिरीसाठी सुद्धा अमरापूरकर दीर्घकाळ चर्चेत राहिले. नाटकवेडा माणूस म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांचा अभिनय अजूनही जिवंत आहे. हुशार आणि अभ्यासू नट म्हणून त्यांची ख्याती होती.
हे ही वाच भिडू.
- फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.
- नाना पाटेकर आणि अशोक सराफ : ही दोस्ती तुटायची नाय!!
- अक्षय कुमारने त्याला मिळालेला अवार्ड अमीर खानला दिला..
- राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण आईसाठी नानाने तसली भूमिका परत कधीच केली नाही