आणि तेव्हा कोल्हापूरच्या सदाशिवराव मंडलिकानी मंत्रीपदाची रेस जिंकली.

गोष्ट आहे ९०च्या दशकातली. तेव्हा सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात मंत्रीमंडळ विस्तारच्या हालचाली सुरु होत्या. अनेक नेते मुंबईमध्ये आपआपल्या मोर्चेबांधणीसाठी हजर झाले होते. यातच होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे सदाशिवराव मंडलिक.

सदाशिवराव मंडलिक म्हणजे संघर्षातून मोठा झालेला नेता.

त्यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती ना पैशाच पाठबळ. वडील ट्रक्टरवर ड्रायव्हर. पण तरीही लोकांची काम करत, शेतकरी संघ, मग जिल्हापरिषद असं प्रत्येक टप्प्यावर झगडत झगडत राजकारणात आले. वयाच्या २८व्या वर्षी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा पराभव झाला. पण त्यांच्यातल्या कार्यकर्त्याने उमेद हरली नाही.

याच संघर्षाच्या बळावर पक्षाच तिकीट नसतानाही मंडलिकसाहेब कागलचे आमदार बनले. सहकाराच जाळ त्यांनी कागल, मुरगूड भागात पसरवल होतं. त्यांच्या विकास कार्यामुळेच कागलच्या जनतेने आपल्या लाडक्या राजाचा विक्रमसिंह घाटगेचा पराभव करून मंडलिक साहेबांवर विश्वास दाखवला.

अत्यंत चुरशीच्या लढतीत राजेंचा झालेला पराभव हा एक चमत्कारच मानला गेला. 

१९९० ला मंडलिकसाहेबांची आमदारकीची तिसरी टर्म होती. यावेळी कॉंग्रेसने अधिकृतरित्या मंडलिकांनां तिकीट दिल होतं. त्यांचं कामच एवढ मोठ होत की यंदा त्यांना मंत्रीपद देण्यावाचून मुख्यमंत्र्यांना पर्याय नव्हता. सदाशिवराव मंडलिक मंत्री व्हावेत ही अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याची इच्छा होती

तरीही कॉंग्रेसची संस्कृती म्हणजे दिल्लीहून मंत्रीमंडळाची यादी येते मग त्यात राज्यातले नेते फेरफार करतात, कधी कोणी आपल घोडं पुढ दामटतात. अशावेळी सर्व हालचालीवर लक्ष असणे गरजेचे असते.

यासाठीच दिल्लीत वजन असणारे कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरचे खासदार उदयसिंहराव गायकवाड सदाशिवराव मंडलिकांनां घेऊन मुंबईला आले.

त्यांच्यासोबत महेश संघवी नावाचे मित्र देखील होते. निवांत बोलता यावे यासाठी संघवी यांनी दुपारचे जेवण महालक्ष्मी रेसकोर्सच्या कँटिनवर करायचा निर्णय घेतला. रेस रविवारी असते आणि त्या दिवशी सोमवार होता त्यामुळे तिथे शांतता होती.

त्यादिवशीच मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा होणार होती. मंडलिकसाहेबांना नाही म्हटल तरी काय होणार याचं टेन्शन आलेल.

मंत्रिमंडळ विस्तार, कोल्हापूरला मंत्रिमंडळात स्थान याबद्दल या तिघांच्या गप्पा सुरु होत्या. त्यांच्या चर्चा सुरु होत्या आणि अचानक रेसकोर्सवरची वर्दळ वाढली. टीव्हीवर देखील घोषणा होऊ लागली. सोमवारी रेसला सुट्टी असते मग अचानक ही गर्दी याचं उदयसिंह गायकवाडांनां आश्चर्य वाटलं. त्यांनी तिथे साफसफाई करणाऱ्या माणसाकडे चौकशी केली. त्याने सांगितलं,

“काल रविवारी पाऊस झाल्यामुळे रेस रद्द करण्यात आली होती. ती रेस आज होणार आहे.”

उदयसिंहराव गायकवाड हे सरदार घराण्यातले. त्यांना शर्यतीचा नाद होता. त्यांनी स्टुअर्टकडून आज ज्या घोड्यांची रेस आहे त्याच पुस्तक मागवलं. गायकवाडांनां शर्यतीवर पैसे लावायचे होते. पण योगायोगाने त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी संघवी आणि मंडलिक यांच्याकडे चौकशी केली.

सदाशिवराव मंडलिक म्हणजे गावाकडचा गडी. त्यांना हे रेस वगैरे काही पटायचं नाही.

शिवाय आधीच त्या मंत्रीपदाच काय होणार याच टेन्शन आलेल त्यात हे रेसच टेन्शन आणखी कशाला घ्या अस त्यांना वाटलं. पण उदयसिंहरावांनां कस सांगायचं म्हणून त्यांनी आपल्याकडेही पैसे नाहीत अशीच थाप ठोकली. गायकवाडांनी संघवी यांच्याकडून १०० रुपये घेतले आणि विनप्लेसवर लावले.

गंमत म्हणजे ती रेस गायकवाडांनी पैसे लावले होते त्या घोड्याने जिंकली.

विजयामुळे आत्मविश्वास आलेल्या गायकवाडांनी दुसऱ्या रेसवर देखील पैसे लावले. योगायोगाने ती रेस सुद्धा त्यांनी जिंकली. तोपर्यंत त्यांच्या जेवणाची ऑर्डर आली. गप्पा सुरूच होत्या.

अजूनही मंत्रीमंडळाचा निर्णय आला नव्हता.

एवढ्यात टीव्हीवर तिसऱ्या रेसची घोषणा झाली. तो पर्यंत गायकवाड प्रत्येक रेस जिंकत आहेत ते बघून मंडलिकाना देखील आपण घोड्यावर पैसे लावावे अस वाटू लागल. त्यांनी खासदार साहेबांना १०० रुपये काढून दिले. पण योगायोग म्हणजे गायकवाड नेमकी तिचं रेस हरले.

सदाशिवरावांचं मन खट्टू झालं. कधी नव्हे ते पहिल्यांदा घोड्यावर पैसे लावले आणि त्यात हार पत्करावी लागली. उदयसिंह गायकवाड त्यांना गंमतीमध्ये म्हणाले,

“सदाशिवराव तुमची रेस इथे नाही तिकडे मंत्रालयात सुरु आहे. तुम्ही ही रेस जिंकणार आणि मंत्री होणार याची मला ग्यारंटी आहे.”

यावर सदाशिवराव दिलखुलासपणे खळखळून हसले. तोवर जेवण आवरल होतं.  रेसकोर्सवरून तिघे निघणार तोवर दूरदर्शनवर मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा झाली. सुधाकरराव नाईकांनी सदाशिवराव मंडलिकांचा त्या यादीत समावेश केला होता.

उदयसिंह गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे मंडलिक साहेब यांचं कार्यच एवढ अफाट होत की त्या रेसमध्ये त्यांचा पराभव होणे शक्यच नव्हते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.