सद्दाम हुसेनचा पाहुणा बनलेल्या दिल्लीच्या सुताराला घ्यायला ६ मर्सिडीज गाड्या उभ्या होत्या….

सद्दाम हुसेन. एकेकाळचा हा साधा लष्करी अधिकारी, पण बंडखोर अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी इराकचा हुकुमशहा बनला होता. तेलाच्या फायद्यासाठी इराण इराकच्या मध्ये युद्ध लावून देऊन अमेरिकेने या हुकूमशाला आपली ताकद पुरवली. पण जसा काळ बदलू लागला तसा अमेरिकेनेच सद्दामला जगासमोर क्रूर हुकूमशहा म्हणून पुढे आणलं होतं.

सद्दामच्या काळात विरोधातल्या लोकांना क्रूरपणे संपवणे हे अरबी देशात अगदी नॉर्मल गोष्ट समजली जायची.

अशा या सद्दामच भारतासाठी मात्र एक वेगळंच रुप दिसून यायच. तो भारताचा मोठा फॅन होता. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याच त्याला आश्चर्य वाटायचं. इतकंच काय तर इंदिरा गांधी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेनने उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होता.

अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्याने आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. खर खोट त्या सद्दाम हुसेनलाच ठाऊक. 

मात्र अशाच एका भारत प्रेमातुन सद्दामने दिल्लीच्या मुख्तियार सिंग नामक एका सुताराला आपला खास पाहुणा बनवला होता, त्यावेळी त्याला घ्यायला तब्बल ६ मर्सिडीज गाड्या उभ्या झाल्या होत्या.

गोष्ट आहे १९७६ सालातील. एक इराकी राजदूत दिल्लीतील मुख्तियार सिंग यांच्या फर्निचर दुकानात आला. हा राजदूत मुख्तियारने बनवलेली कार्व चेयर बघून चांगलाच खुश झाला. त्याने ती इराकला सद्दाम हुसैन पर्यंत पोहोचवली. १९८० च्या दरम्यान या राजदूतांनी इराकच्या वाळवंटात मुख्तियार यांनी बनवलेल्या फर्निचरची निर्यात सुरु केली.

त्यानंतर सद्दाम हुसेनच्या पुतण्याला भारतात राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं. इथूनच मुख्तियार यांचा बिझनेस देखील फुलायला सुरुवात झाली. सद्दाम हुसैन पर्यंत देखील या फर्निचरची आणि ते बनवणाऱ्या कलाकराची ख्याती पोहचत होती. याच ख्यातीमधून १९९० साली या इराकी राजदूतांनी मुख्तियारला सद्दामचा खास पाहूणा म्हणून इराकला येण्याचं आमंत्रण दिलं.

२३ जानेवारी १९९० या दिवशी भेटीची तारीख ठरली. वेळ होती फक्त १५ मिनिट.

नियोजित वेळेनुसार जेव्हा मुख्तियार बगदादच्या विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना घेण्यासाठी सद्दामने ६ मर्सिडीज गाड्या पाठवल्या होत्या. हे असं स्वागत बघून मुख्तियार यांचे डोळेच पांढरे झाले होते. ते स्वतः सांगतात, मी एक साधा सुतार होतो, त्यामुळे या अशा स्वागताची मला अजिबातच अपेक्षा नव्हती. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमधून मुख्तियार यांना सद्दामच्या भव्य महालाजवळ नेण्यात आलं.

त्याठिकाणी मुख्तियार यांच्यासाठी एक स्पेशल रूम, दिमतीला नोकर चाकर असं सगळं तैनात होतं. मुख्तियारना अजून बरेच धक्के बसणं बाकी होतं. महालात पोहचल्यावर सोन्याच्या कपातून कॉफी देण्यात आली. काही वेळातच महालातील एका खोलीत मुख्तियार यांना नेण्यात आलं. तिथं प्रत्यक्ष सद्दाम हुसेन स्वागताला दोन्ही हात पसरून उभे होते.

एक परफेक्ट सूट घातलेला उंचपुरा अश्या सद्दामने मुख्तियार यांना आलिंगन दिलं, आणि आपल्या शेजारी बसवलं. मुख्तियार सांगतात, गप्पा दरम्यान सद्दामने अनेक वेळा भारताच तोंड भरून कौतुक केलं. त्याच दरम्यान मुख्तियार यांनी सद्दामला २५० किलो वजनाची स्वतः हाताने बनवलेली खुर्ची भेट दिली. त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाचं चिन्ह होतं.

१५ मिनिट ठरलेली भेट जवळपास १ तासापेक्षा जास्त वेळ चालली. शेवटी जेव्हा सद्दामने मुख्तियार यांना काय करू शकतो? असं विचारलं तेव्हा मुख्तियार यांनी एकचं इच्छा व्यक्त केली. ती होती इराकमधील बाबा नानक गुरुद्वारा पुन्हा सुरु करण्याची. शीख समुदायात या गुरुद्वाराला एक विशेष महत्व प्राप्त होतं. जेव्हा गुरुनानक बगदादमध्ये होते तेव्हा याच ठिकाणी वास्तव्याला होते.

मुख्तियार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेतली गेली,आणि गुरुद्वारा सुरु झाला. 

यानंतर सद्दामने मुख्तियार यांना इराकच्या फर्निचर उद्द्योगाची जबाबदारी घेण्यास विनंती केली, मात्र मुख्तियार यांनी तात्काळ नकार कळवत त्याबदल्यात इराकी लोकांना हि कला शिकवण्यास संमती दर्शवली. त्यानुसार सद्दामने २० जणांना सुतारकाम शिकण्यासाठी भारतात पाठवलं होतं. मुख्तियार यांनी देखील काही हि हातच न राखता हि कला इराकी लोकांना शिकवली.

अशा या भारतप्रेमी सद्दामला जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा काही मोजक्या दुखी लोकांच्यामध्ये मुख्तियार या मित्राचा देखील समावेश होता.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.