सद्दाम हुसेननं फाशीवर जाण्यापूर्वी दोनच इच्छा व्यक्त केल्या होत्या.

जिकडं बघावं तिकडं नुसत पसरलेलं वाळवंट, उंट घेऊन राहणारे, अक्रोड बदाम विकून उपजीविका करणारे अरबी लोक. जस या वाळवंटात तेल सापडलं तेव्हापासून या लोकांवर अरिष्टच कोसळलं म्हणा ना. तेलातला पैसा मिळवण्याच्या चढाओढीत बऱ्याच अमेरिकी कंपन्यांनी या अडाणी अरबी लोकांना धुवून घेतलं. त्यांना धर्माच्या नादी लावल, अतिरेकी निर्माण केले. आपापसात झुंजवल. अमेरिकेने अनेक भयंकर राजवटी निर्माण केल्या. 

अशातलाच एक हुकुमशहा म्हणजे सद्दाम हुसेन.

एकेकाळचा हा साधा लष्करी अधिकारी, बंडखोर अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी इराकचा हुकुमशहा बनला. इराण इराकच्या मध्ये युद्ध लावून देऊन अमेरिकेने याला फुगवल. आपली शस्त्रास्त्रे खपवली. आणि याच काळात सद्दाम हुसेन अमेरिकेलाही न जुमानण्याइतपत मोठा झाला. त्यामुळंच २२ जुलै २००३ रोजी सद्दामला हटवण्यासाठी अमेरिकेने इराक वर हल्ला केला. सद्दामला पकडण्यात आलं. 

सद्दाम हुसैनला ३० डिसेंबर २००६ रोजी फाशी देण्यात आली. पण या तीन वर्षाच्या काळात सद्दाम हुसैनच्या सुरक्षेसाठी जे बारा अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले होते ते मात्र रडले होते. हे बारा सैनिक त्याचे आयुष्यभराचे मित्र झाले नाहीत, पण त्यांचे शेवटच्या काळातले सोबती नक्की होते. 

त्याच्या या सोबतीचीच ही गोष्ट… 

सद्दामला अटक केल्यानंतर त्याच्यावर पहारा देण्यासाठी ५५१ मिलिट्री पोलिस कंपनीतून निवडल्या गेलेल्या सैनिकांना सुपर ट्वेल्व्ह म्हणून ओळखलं जायचं. या बारा सैनिकांपैकी एका सैनिकाने एक पुस्तक लिहिलं. द प्रिझनर इन हिज पॅलेस, हिज अमेरिकन गार्ड्स, अँड व्हॉट हिस्ट्री लेफ्ट अनसेड’ असं ते पुस्तक. त्या पुस्तकात सद्दाम हुसैनच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती दिली होती. हे पुस्तक लिहिलं विल बार्डेनवर्पर याने. 

तो त्याच्या पुस्तकात म्हणतो त्याप्रमाणे,

ऍडम रोजरसन आणि त्या सैनिकांनी सद्दामकडे कधीच मनोविकृत मारेकरी म्हणून पाहिलं नाही. ते त्या सैनिकांना त्यांच्या आजोबांप्रमाणे वाटायचे. सद्दामवर  आपल्या १४८ विरोधकांच्या हत्येचा आदेश देण्याबद्दल खटला चालविण्यात आला होता. सद्दामचे शेवटचे दिवस हे इराकमधील तुरूंगात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लाइजा हिची गाणी ऐकण्यात गेले. सद्दाम हुसेनला त्याच्या एक्सरसाइज बाइकवर बसायला आवडायचं. त्या बाइकच नाव पोनी होतं. सद्दामला गोड खायला खूप आवडायचं. त्यातला त्यात मफिन्स खाणं म्हणजे त्याच्यासाठी पर्वणीच असायची.

शेवटच्या दिवसात या क्रूरकर्म्याचंवागणं खूप नम्र होतं. सद्दाम त्यांच्या काळातील सर्वांत क्रूर शासक होता. मात्र शेवटच्या दिवसात त्या अमेरिकन सैनिकांना तसूभर ही जाणवलं नाही. सद्दामला कोहिबा सिगार पिण्याचा नाद होता. वेट वाइप्सच्या डब्यात तो आपल्या सिगार ठेवायचा. आणि मध्येच सैनिकांशी गप्पा हाणता हाणता आपल्याला फिडेल कॅस्ट्रोनं सिगार ओढायला शिकवल्याचं आवर्जून सांगायचा.

सद्दामला शेवटच्या दिवसात बागकामाची आवड जडली होती. तो तुरुंगाच्या आवरात परिसरात झाडाझुडपांनाही एखाद्या सुंदर फुलाप्रमाणच पहायचा. सद्दाम त्याच्या खाण्यापिण्याबद्दल अतिशय संवेदनशील होता. नाश्त्यामध्ये तो आधी ऑमलेट खायचा. मग मफिन आणि त्यानंतर एखादं ताजं फळ. चुकूनही जर त्याचं ऑमलेट तुटलं, तर तो खायला नकार द्यायचा. 

सद्दाम कधीकधी आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सुद्धा सैनिकांना सांगायचा. यात त्याने एकदा सैनिकांना आपला मुलगा उदयच्या क्रूरतेचा एक किस्सा सांगितला होता. उदयच्या त्या कृत्यामुळ सद्दाम प्रचंड संतापला होता. उदयनं एका पार्टीत गोळीबार केला होता. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते तसंच जखमी झाले होते. यामुळे सद्दाम इतका नाराज होता की, त्याने उदयच्या सगळ्या गाड्यांना आग लावली होती. उदयच्या महागड्या रोल्स रॉइस, फेरारी, पोर्शसारख्या महागड्या गाड्यांना कशी आग लावून देण्यात आली हे सद्दाम मोठमोठ्यानं हसून सांगत होता.

सद्दाम जसा क्रूर होता अगदी तसाच तो संवेदशील ही होता. एका सैनिकाच्या भावाचा मृत्यू झाला आहे, हे ऐकल्यावर सद्दामने एका सैनिकाला मिठी मारली आणि म्हटलं, आजपासून तू मला तुझा भाऊ समज. सद्दामच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अजून एका सैनिकाशी बोलताना म्हटलं होतं की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी मिळाली तर मी तुझ्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च उचलायला तयार आहे.

त्या एका रात्री सगळ्यांनी पाहिलं की, डॉसन नावाचा वीस वर्षांचा एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दामने आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता. यावर सगळे सैनिक डॉसनला खूप दिवस हसायचे. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता.

सद्दाम आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या. सद्दामच्या वरील खटल्यांच्या दरम्यान त्याला दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. एक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आणि दुसरा उत्तर बगदादमधला त्याचा महाल होता, जो एका बेटावर होता. तिथपर्यंत एका पुलावरून जावं लागायचं.

पण तुरुंगवासाच्या काळात सद्दामला आवश्यकतेपेक्षा जास्त काहीच मिळाल नाही. पण सैनिकांनी त्याच्या स्वाभिमानाला देखील कधीच धक्का पोहोचवला नाही.

स्टीव्ह हचिंसन, क्रिस टास्कर आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्टोअर रुमला सद्दामच्या कार्यालयाचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला होता. सद्दामला सरप्राइज देण्याची योजना या सैनिकांनी आखली. अडगळीच्या खोलीतून एक छोटा टेबल आणि चामड्याचं कव्हर असलेली खुर्ची बाहेर काढली. टेबलावर इराकचा छोटा झेंडा ठेवण्यात आला. 

या सगळ्याच्या मागे हा विचार होता की, तुरूंगातही सद्दामसाठी शासनप्रमुखाच्या कार्यालयासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करता येईल. सद्दाम जेव्हा पहिल्यांदा त्या कार्यालयात गेला, तेव्हा एका सैनिकानं पटकन झुकून टेबलावरची धूळ झटकून साफ केली. सद्दामनी या कृतीची दखल घेतली आणि खुर्चीवर बसून हसला.

सद्दाम रोज येऊन त्या खुर्चीवर बसायचा आणि त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचे. जणूकाही सद्दामचा दरबार भरला आहे असं वातावरण निर्माण व्हायचं.

फाशीवर जाण्यापूर्वी सद्दाम हुसेनने दोनच इच्छा व्यक्त केल्या होत्या. त्यातली एक म्हणजे त्याला सैनिकांप्रमाणे मरण यावं, म्हणजे त्याला गोळ्या घालून मारा असं त्याच म्हणणं होत. पण त्याची पहिली इच्छा काही पूर्ण झाली नाही. म्हणून दुसरी इच्छा मागताना तो म्हंटलं कि मला फाशी देतच आहात तर नकाब घालू नका. त्याची इच्छा पूर्ण केली गेली. सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथ उभे असलेले काही लोक त्याच्या मृतदेहावर थुंकले. हे पाहून सद्दामची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे १२ सैनिक आश्चर्यचकित झाले.

त्याचे सोबती हे सैनिकच होते. सद्दाम हुसैनच्या मृत्यूनंतर या सैनिकांनी शोक व्यक्त केला होता. 

Leave A Reply

Your email address will not be published.