इतिहासातले साडे तीन शहाणे कोण? नाना फडणवीसांना अर्धा शहाणा का म्हणायचे?

तस बघायला गेलं तर मराठी मध्ये साडे तीन आकड्याला खूप महत्व आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये साडे तीन मुहूर्त मुख्य मानले गेले आहेत, तसंच महाराष्ट्रात देवीची साडे पिठं महत्वाची मानली जातात तर मराठ्यांच्या इतिहासात साडे तीन फाकडे साडे तीन शहाणे आपण नेहमी ऐकत आलोय.

या साडे तीन या शब्दावर आपल्या पूर्वजांनी का भर दिला हे पुन्हा कधी तर पाहू मात्र यातील साडे तीन शहाणे हा प्रकार काय ते आज समजावून घेऊ.

१)पहिला शहाणा सखारामबापू बोकील:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या बोकील घराण्याचा वंशज. सुरूवातीस सखारामबापू महादजीपंत पुरंदरे याच्याकडे कारकून व शिलेदार होता. नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीत यांचा पराक्रम प्रकर्षाने समोर आला. सदाशिवरावभाऊंबरोबर कर्नाटकच्या स्वारीवेळी  सखाराम बापूने तलवार गाजवली. त्याने भरपूर धनदौलत जमवून छ. शाहूंचे कर्ज फेडले.

पुढे त्यांची नेमणूक रघुनाथराव पेशव्यांचे कारभारी म्हणून करण्यात अली. राघोबा दादांच्या प्रत्येक स्वारीत सखाराम बापू सोबत असत. असं म्हटलं जायचं की राघोबा पेशवे बापूच्या तंत्राने वागतात.

जेव्हा रघुनाथराव पेशव्यानी निजामाचा पराभव केला तेव्हा सखारामबापूच्या सांगण्यावरून त्याचा पुरता मोड केला नाही. उलट निजामअली व जानोजी भोसले यांची मदत घेऊन पेशव्यांचा पराभव केला. तेव्हा चुलता-पुतण्यात समझोता होऊन पुन्हा राघोबा वरचढ झाला

रघुनाथरावांनी सखारामबापूस नऊ लाखांची जहागीर दिली.

पण सखाराम बापूंचे वाढते महत्व माधवराव पेशवे यांनी त्यांचे पंख कापण्यास सुरवात केली.  हैदर अलीवरील युद्घप्रसंगी पेशव्यानी सखाराम बापूस बरोबर घेतले. मात्र बापूची लाच घेण्याची सवय आणि वाढलेला प्रभाव, त्यांना जाचक वाटू लागला. त्यांनी राघोबास १७६८ मध्ये नजरकैदेत ठेवल्यानंतर बापूची कारभारी पदावरून उचलबांगडी केली पण त्याची जहागीर पूर्ववत त्याच्याकडेच ठेवली. मरणापूर्वी माधवरावांनी बापूची योग्यता लक्षात घेऊन त्यास पुन्हा कारभारी नेमले आणि त्याच्या समक्ष राघोबास नारायणरावाचा सांभाळ करण्यास सांगितले.

नारायणराव पेशवे यांच्या कारकीर्दीत सखाराम बापूच राज्यकारभार पाहत असे. मात्र नारायणरावांच्या खुनानंतर निजामावरील स्वारीला गेलेले सखाराम बापू तातडीने परत आले आणि रघुनाथरावांच्या विरुद्ध बारभाईंच्या कारस्थानात सामील झाले.

नाना फडणीस व मंडळींनी सखाराम बापूंच्याकडेच राज्यकारभाराचे सर्वाधिकार दिले.

पुढे मात्र नाना फडणवीस आणि सखाराम बापू यांच्यातील वाद उफाळून आले. नारायणराव पेशवे यांच्या खुनात बापुंचाही अप्रत्यक्षरीत्या हात होता हे स्पष्ट झाले होते. राघोबा आणि इंग्रज जेव्हा पेशव्यांच्या चालून आली तेव्हा या युद्धाच्यावेळी  बापूचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला. अखेर नानांनी त्याला कैद केले.  तिथेच त्याचे देहावसान झाले.

सखाराम बापू चाणाक्ष, प्रसंगानुसार वर्तन करणारा, अत्यंत व्यवहारी व लोभी होता. तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्याने हितसंबंध जपले होते. तो स्वत: लढवय्या नसला, तरी फौज बाळगून होता. त्याचे सालिना उत्पन्न पाच लाख होते. कर्तृत्व, मुत्सद्दीपणा आणि नैसर्गिक बुद्धीमत्ता यांच्या जोरावर त्याने पानिपतपासून वडगावच्या तहापर्यंत मराठयांच्या राजकारणावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला. त्यामुळे त्याची साडेतीन शहाण्यांतील एक पूर्ण शहाणा, अशी ख्याती झाली.

२)दुसरा शहाणा विठ्ठल सुंदर :

मूळचा संगमनेरचा विठ्ठल सुंदर परशुरामी. प्रचंड हुशार आणि पराक्रमी होता. हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात रामदास पंतांच्या वशिल्याने याचा प्रवेश झाला होता. तिथे आपल्या कर्तबगारीने मोठे नाव कमावले. हिंदू ब्राम्हणसमाजातील असूनही मुस्लिमाचा वरचष्मा असलेल्या निजामाच्या दरबारात त्याला मोठे महत्व प्राप्त झाले.

इ.स. १७६२ त सलाबतजंगास कैद करून निजाम अल्लीनें हैद्राबादची गादी बळकाविली, तेव्हा विठ्ठल सुंदर याला आपल्या राज्याचा मुख्य दिवाण बनवलं.

जेव्हा राघोबादादा यांनी पेशवाई बळकवण्याचे प्रयत्न सुरु केले तेव्हा चुलत्या पुतण्यांतील भांडणाची ही संधि साधून पेशव्यांचे राज्य उलथून पाडण्याचा विठ्ठल सुंदरनें प्रयत्न केला. त्यासाठी सातारच्या राजाराम महाराजांच्या जागी नागपूरच्या जानोजी भोंसल्याच्या हस्तें मराठेशाहीचा राज्यकारभार चालवावा व पेशव्यांनां हांकलून द्यावें असा बेत त्यानी बनवला.

साडेतीन शहाण्यापैकीच एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांच्या मार्फत जानोजी भोसले यांना पेशव्यांच्या विरुद्ध तयार केले. रघुनाथरावांच्या कारस्थानामुळे असंतुष्ट असणारे मोरोबा फडणीस, सदाशिव रामचंद्र शेणवी, गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदारही पेशव्यांविरुध्द फितूर झाले. त्यांच्या बळावर निजामानें पुण्यावर चाल करून पुणें लुटलें व जाळले.

परंतु पुढें जानोजी भोसले प्रबळ झाल्यामुळे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून विठ्ठलपंतानें कोल्हापूरच्या छत्रपतींशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. पण याचा फायदा घेऊन पेशव्यानी जानोजी भोसले यांना निजामापासून फोडले.

१७६३ साली झालेल्या राक्षसभूवन येथील युद्धात पेशव्यांनी निजामाचा मोठा पराभव केला. या युद्धात विठ्ठल सुंदर मारला गेला.

विठ्ठल सुंदर हे पेशवाईचे शत्रू होते मात्र ते मोठे बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होते. त्यांनीच निजामअल्लीला गादी मिळवून दिली होती. ते लष्करी डावपेंचांतहि निष्णात होते. हैद्राबादच्या मुस्लिम राजवटीत विठ्ठलपंताना मोठा मान होता. त्यांना राजाबहादुर प्रतापवंत हा किताब दिला असून निजामशाहींत त्याची जहागीर ”गणेश” या नांवानें ओळखली जात होती.

३)तिसरा शहाणा देवाजीपंत चोरघडे :

नागपूरकरच्या भोसले घराण्यातील महत्वाचे राजकीय सल्लागार. दिवाकर पुरुषोत्तम किंवा दिवाकरपंत म्हणूनही परिचित. रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांच्यात गादीसाठी चढाओढ सुरु झाली तेव्हा जानोजीराजे भोसले यांना सत्ता स्थापनेसाठी मदत करणाऱ्यांमध्ये चोरघडे मुख्य होते.

खरं तर ते त्याकाळी एक साधे कारकून होते. जानोजी भोसले याना सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळविण्याकरिता काही सरदारांना पुण्यास पेशव्यांकडे पाठविण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत हे देवाजीपंत चोरघडे देखील होते. पेशवे दरबारात होत असलेल्या नजराणा भेटीत जानोजी भोसले यांना फसवून पैसे खाल्ले जात आहेत हे चोरघडेंच्या लक्षात आले. परत नागपूरला आल्यावर त्यांनी जानोजींच्या कानावर हि हकीकत घातली.

हा भ्रष्टाचार उघड करून देवाजीपंत चोरघडे फेमस झाले. फक्त नागपूरकर भोसलेच नाही तर पेशवे दरबारात देखील त्यांची ओळख एक हुशार मुत्सद्दी म्हणून होऊ लागली. एकेकाळी पेशव्यांचा विश्वास संपादन करणारे देवाजी चोरघडे हे  पुढे विठ्ठल सुंदर यांच्या मदतीने पेशवाई उलथवून लावण्याच्या प्रयत्नाला लागले. वर उल्लेख आल्याप्रमाणे हा प्रयत्न फसला.

पेशवाईच्या शत्रूंमध्ये यांची गणना केली जात असली तरी आपला मुत्सद्देगिरी आणि चलाखपणा याच्या जोरावर देवाजीपंत उर्फ जिवाजीपंत चोरघडे यांना मराठेशाहीतील एक पूर्ण शहाणा अशी पदवी दिली जाते.

४)अर्धा शहाणा नाना फडणवीस :

फडणीस हे पेशव्यांच्या मुळगाव श्रीवर्धनचे भानू . सिद्दीच्या हल्ल्यात त्यांनी बालाजी विश्वनाथ भट याला वाचवलं होतं म्हणून पुढे पेशवे पद मिळाल्यावर बाळाजीने भानू कुटुंबाला फडणिशीची वस्त्रे दिली. याच घराण्यात नानाचा जन्म झाला.

नाना चौदा वर्षांचा असताना पेशव्यांचे फडणवीस बनले.

त्यांचे शिक्षण सदाशिवराव भाऊ यांच्या निगराणीखाली झाले होते. पण लहानपणापासून प्रकृती तोळामासा असल्यामुळे ते फडावरच जास्त रमायचे. पानिपताच्या युद्धात पालखीत बसून जाणाऱ्या नाना फडणविस यांची येथेच्छ चेष्टा पुणेकरांनी उडवली होती. पण याच पानिपतातील युद्धात जे मोजके मराठे सैनिक जिवंत महाराष्ट्रात आले त्यात नानांचा समावेश होता.

माधवराव पेशव्यांच्या काळात  नाना फडणवीस दरबारी राजकारणामध्ये एकदम तरबेज झाले. नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर त्यांनी बारभाईच्या मदतीने सत्ता ताब्यात घेतली. अल्पवयीन सवाई माधवराव पेशव्याला त्यांनी गादीवर बसवले. 

फक्त लेखणीच्या जोरावर रघुनाथ पेशव्याला सत्तेपासून दूर केले. पेशवाईची घडी बसवली. याच काळात महादजी शिंदेनी दिल्लीमध्ये मराठीशाही पोहचवली. नानाची बुद्धी आणि महादजींचा बळ यामुळे मराठा साम्राज्याला परत वैभवाचे दिवस आले.

याच काळात नानाने पुण्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. शनिवारवाड्याची डागडुजी केली. पुण्यात पेठा वसवल्या. पाण्याचा प्रश्न सोडवला. अनेक मंदिरे बांधली. प्रत्येक ठिकाणच्या “आतल्या” बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. हैदर अली पासून ते इंग्रजांच्या पर्यंत सगळीकडे पसरलेलं या हेरखात्यामुळे नानांनी आपला वचक बसवला होता.

नाना फडणवीस यांचे काही दुर्गुण देखील होते. त्यांनी स्वतःसाठी प्रचंड पैसे कमवून ठेवला होता. ते शीघ्रकोपी होते. त्यांच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार विषयवासना हा देखील त्यांचा मोठा दुर्गुण होता. त्यांनी तब्बल ९ लग्ने केली. याशिवाय त्यांच्या प्रकरणाच्या खुमासदार चर्चा पुण्यात चांगल्याच गाजायच्या.

जेव्हा सवाई माधवरावा पेशव्यांनी भ्रमिष्ट होऊन आत्महत्या केली. त्यानंतर मात्र नानाचे महत्व कमी होत गेले.

पुढचे पेशवे म्हणजेच दुसरा बाजीराव यांचा नाना फडणवीसवर राग होता. सत्तेत आल्या आल्या त्यांची अटक केली होती. नानांनी बाजीरावाला दोन कोटीचा जामीन देऊन स्वतःची सुटका करवली. पुढे काहीच दिवसात नानाचा मृत्यू झाला.

नाना फडणवीस हे चतुर राजकारणी होते. त्यांनी पेशवाई आणि पर्यायाने मराठेशाहीचा कारभार आपल्या हुशारीच्या जोरावर उत्तम सांभाळला. ते दरबारी राजकारणात जितके तरबेज होते तितकं युद्धकला क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान तोकडं होतं. म्हणूनच त्यांना पेशवाईचा अर्धा शहाणा असे म्हटले गेले.

त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावाच्या अननुभवी कारभारामुळे पेशवाई वेगाने अस्त झाली आणि भारतात ब्रिटीशांचे राज्य उदयास आले. कुणीतरी लिहून ठेवलंय,

“नाना गेले व त्यांबरोबरच मराठी राज्यांतील शहाणपणा व नेमस्तपणा हीं लयास गेलीं.”

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kalash bhagwat says

    बारभाई कोण आहेत?

Leave A Reply

Your email address will not be published.