लालू प्रसाद यादवांच्या मुलाच्या लग्नामुळं, त्यांचे मेव्हणे चांगलेच खवळलेत

लग्न गावाकडं असू द्या किंवा शहरामध्ये. एक आवाज फिक्स कानावर येतो, ‘मुलीचे मामा लवकरात लवकर स्टेजवर या.’ लग्नात जितका मान वरमाय आणि वरबापाला नसेल, तितका मान या मामा लोकांना असतोय. तशा आत्या, मावश्या पण लग्नात फिक्समध्ये रुसतात, पण त्यांचा राग जरा साडी-बिडी दिली की निवांत होत असतोय. मामा मंडळी रुसली, की मात्र वांदे फिक्स.

बरं आता फक्त आपल्या सामान्य लोकांच्याच लग्नांमध्ये रुसवे-फुगवे होतात, असं तुम्हाला वाटत असेल… तर बॉईज अँड गर्ल्स हा तुमचा गैरसमज आहे. आता लालू प्रसाद यादव ही काय साधी असामी आहे होय? सध्या देशातली पॉवर थोडी कमी झालेली असली, तरी अजूनही लालूंचं नाव ऐकलं की गाव हलतंय.

नुकतंच लालूंचे छोटे चिरंजीव, क्रिकेटर आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं लग्न झालं. तेजस्वी हे सुद्धा कायम चर्चेत असणारं व्यक्तिमत्व. त्यांना बिहारच्या लय पोरींनी प्रपोझ केल्याची बातमीही तुम्ही नुकतीच वाचली असणार. तेजस्वी यांचं लग्न झालं म्हणून लय पोरींनी तुटलेले हार्ट आणि खच्ची गाणी सोशल मीडियावर टाकली. सगळ्यांना वाटलं, की तेजस्वी यांच्या लग्नामुळं फक्त या पोरीच नाराज आहेत.

पण नाय आणखी एक मोठी व्यक्ती, या लग्नामुळं नाराज आहेत, ते म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे मेव्हणे आणि तेजस्वी यादव यांचे मामा साधू यादव. साधू यादव यांच्या मते, ‘तेजस्वी यांनी ख्रिश्चन मुलाशी लग्न करुन फक्त यादव परिवाराचंच नाही, तर पूर्ण समाजाला कलंक लावला आहे. यदुवंशी समाज या लग्नाचा स्वीकार करत नाही. लालू प्रसाद यादव ज्या २१ टक्के समाजाच्या जीवावर इतकी वर्ष सत्तेत राहिले, तोच समाज आता तेजस्वी यांना बॉयकॉट करेल. यांना मतं यादव समाजाची पाहिजेत, पण लग्न मात्र हे बाहेरच्या समाजातल्या मुलीशी करणार?’

बरं एवढं बोलून थांबतील, ते मामा कसले? त्यांनी तेजस्वीवर बेक्कार टीका केली. ते म्हणाले, ‘ख्रिश्चन मुलीशी लग्न करायला, यादव समाजात काय मुलींची कमी आहे का? आता तेजस्वीनं मतं मागायला पण चंदीगड आणि केरळलाच जावं.’

तुम्ही लग्नात किंवा लग्न जमवताना होणाऱ्या भांडणांमध्ये कान उघडे ठेवून वावरत असाल, तर तुम्हाला आणखी एक गोष्ट फिक्स माहीत असणार. भांडण झालं की, ते फक्त रिसेन्ट विषयावर होत नाही त्याच्यात इतिहास फिक्स निघत असतोय. तेजस्वी यांच्या मामांची मेमरी निघाली शार्प.

त्यांनी तेजस्वी यांच्या बहिणीच्या लग्नाची स्टोरी काढली, ते म्हणाले ”मीसा भारतीसाठी आम्ही राजस्थानमधलं एक स्थळ बघितलं होतं. त्या मुलाच्या नेपाळमध्ये चार फॅक्टऱ्या होत्या. त्यांचा राजेशाही परिवारही होता, आम्ही ते स्थळ पसंतही केलं होतं. मात्र मला बाहेरुन कळलं, की मुलाची आई ब्राम्हण आहे म्हणून लालूंनी त्या स्थळाला नकार दिला. म्हणजे तेव्हा जातीचा एवढा विचार करणाऱ्या लालू यांनी तेजस्वीच्या लग्नावेळी मात्र हा विचार केला नाही.”

या सगळ्या गोंधळात तेजस्वी यांच्या पत्नी रॅशेल यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे, अशा बातम्याही काही संकेतस्थळांनी दिल्या आहेत. मात्र यादव कुटुंबाकडून यावर काही भाष्य करण्यात आलेलं नाही.

साधू यादव म्हणतात, तसं तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीचा या लग्नामुळं बाजार उठणार की बिहारची जनता आपल्या या नव्या सुनेचं खुल्या दिल्यानं स्वागत करणार? हे येत्या निवडणुकांमध्ये समजेलच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.