धर्मप्रसाराच्या मागे लागला नाहीतर तो आज “पाकिस्तानचा तेंडुलकर” असता.
काही आठवणी नकोशा असतात. त्या आठवल्या की जखमांची खपली निघते. अशीच एक आठवण म्हणजे २१ मे १९९७ ला मद्रासला (आजचे चेन्नई) खेळण्यात आलेली भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच.
चेपॉक स्टेडीयमवर सईद अन्वर रुपी त्सुनामी वादळ आलं होतं. कोणताही भारतीय फॅन ती मॅच विसरू शकत नाही. त्या काळात पाकिस्तानची टीमच जबरदस्त होती. वसीम आक्रम आणि वकार युनुसची जोडी आग ओकत होती. भारत पाकिस्त्तानचे मॅचेस म्हणजे महायुद्ध असायचे. तेव्हा सईद अन्वर आणि शाहीद आफ्रिदीची डावऱ्या आणि उजव्या बॅट्समन ची जोडगोळी जबरदस्त फटकेबाजी करून जगभरातल्या बॉलरना जेरीस आणत होते.
पेप्सी इंडिपेंडंस कपसाठी पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ भारतात आला होता. पाकिस्तानच्या टीम मध्ये त्या काळात फलंदाजाचे कर्दनकाळ असलेले वसीम अक्रम आणि वकार युनुस आले नव्हते.
२१ मे च्या मॅचला पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. दुसऱ्याच ओवर मध्ये कुरविल्लाने शहीद आफ्रिदीला जाळ्यात पकडले. अख्ख स्टेडीयम नाचत होतं. सईद अन्वरला काहीच फरक पडला नाही. त्याच्या डोक्यात काय चालू होते काय माहित मात्र त्याने सुरवातीपासून धुलाई सुरु केली होती. थोड्या थोड्या अंतराने समोरच्या विकेटा पडत होत्या मात्र,
सईद अन्वर खुंटा गाडून क्रीजवर उभा होता.
हा हा म्हणता म्हणता त्याने सेन्चुरी पूर्ण केली. त्या काळात शतक म्हणजेच खूप मोठी गोष्ट असायची. सईद अन्वरची गाडी स्लो होईल असं वाट होत मात्र घडल उलटच. त्याने स्ट्राईक रेट वाढवला. चेपॉकवर सुई पडल्यावर आवाज येईल अशी शांतता पसरली होती. फक्त सईद अन्वरच्या बॅटचा आवाज बोलत होता.
कुंबळेने तसे बऱ्यापैंकी अन्वरला जखडून ठेवले होते मात्र ४१ वी ओव्हर आली. सईद अन्वरने त्याला धु धु धुतला. सलग तीन छक्के कुंबळेला बसले. त्या ओवर मध्ये २६ रन अन्वरने काढले. ट्वेन्टी ट्वेन्टी येण्याच्या आधीच्या जमान्यात एका ओवर मध्ये एवढ्या रन कधीच ऐकल्याच नव्हत्या. स्टेडियम तर गप्प झालेच होत पण कित्येक भारतीयांच्या घरातले टीव्ही देखील बंद झाले होते. त्याचं कारण आणखी एक संकट समोर दिसत होतं.
अन्वरच्या टप्प्यात एक विश्वविक्रम आला होता.
वन डे मध्ये अजून एकही द्विशतक बनलं नव्हतं. जगातला वन डे मधला हायेस्ट स्कोर होता १८९. तोही १९८४ साली दिग्गज बॅट्समन विविअन रिचर्डनी बनवला होता.
भारताचा कर्णधार सचिन तेंडूलकरने बॉलिंग हाती घेतली. त्याला पण आल्या आल्या अन्वर ने दोन बाऊन्डऱ्या मारल्या आणि रिचर्डचा तेरा वर्ष टिकलेला रेकॉर्ड मोडला. स्कोर झाला १९४.
आता द्विशतक म्हणजे एक फॉर्म्यालीटी उरली होती. सचिनचा पुढचा बॉल अन्वरने उचलला. लॉंग ऑन ला गांगुली उभा होता. तो बॉलच्या मागे धावू लागला. गांगुलीने बॉलकडे झेप घेतली. सगळ्यांनी श्वास रोखला. पण त्याने झेल पकडला. बॉल पकडल्यावर काही क्षण तो तसाच जमिनीवर पडून राहिला. सर्व भारतीयांच्या जीवात जीव आला. आपण ती मॅच जिंकू शकलो नाही. पण अन्वरचा रेकॉर्ड तेरा वर्षांनी २०१० साली सचिन तेंडूलकरनेच मोडला (झिम्बाब्वेच्या कोवेंटी चार्ल्स ने २००९ ला या विक्रमाची बरोबरी केली होती).
नंतर वनडे मधलं जगातलं पहिलं द्विशतक झळकण्याचा मान सचिनने मिळवला. एका अर्थाने क्रिकेटमधलं एक वर्तुळ पूर्ण झालं.
असा हा डावखरा शैलीदार सईद अन्वर भारता विरुद्ध हमखास खेळायचाच. त्याने १९८९ साली अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. फार कमी लोकांना माहित असेल की सईद अन्वरने त्याकाळात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होत. पाकिस्तानी क्रिकेट मध्ये असे कार्यकर्ते दुर्मिळच आहेत.
वन डे मध्ये त्याने २० शतकाच्या सहाय्याने ८८२४ रन्स बनवल्या. सचिनशी त्याची तुलना केली जायची. २००१ साली दुर्दैवाने त्याच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली.
तो देवा धर्माच्या नादाला लागला. क्रिकेट वरचं त्याचं मन उडालं. ताब्लीघी जमात नावाच्या इस्लाम धर्म प्रसार संघटनेला त्याने स्वतः ला वाहून घेतले. २००३ च्या विश्वकप मध्ये देशभक्तीचे भावनिक आवाहन करून त्याला क्रिकेट टीम मध्ये परत आणण्यात आले. तेव्हा सुद्धा भारता विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने शेवटचे शतक ठोकले.
त्यांनंत्तर मात्र दाढी वाढवून मुल्ला बनलेला अन्वर परत कधी दिसला नाही.
– भूषण टारे.
हे ही वाचा –
- भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !
- या खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळलंय !!!
- क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली.