तो भारतीय बॉलर दिसला तरी सईद अन्वरची टरकायची !!

तर गोष्ट आहे १९९७ सालची. कॅनडामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान सहारा फ्रेन्डशिप कप होत होता. सचिन तेव्हा भारताचा कप्तान होता. आपल्या टीमची बॅटिंग लाईनअप सचिन गांगुली अझर द्रविड जडेजा मुळे चांगली होती मात्र योगायोगाने त्यावेळी आपला एकही मुख्य बॉलर फिट नव्हता. श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, कुंबळे वगैरे सगळे बॉलर सिरीज साठी आले नव्हते.

बलाढ्य पाकिस्तान विरुद्ध भारताने अॅबे कुरविल्ला, देबाशिष मोहंती, निलेश कुलकर्णी, राजेश चौहान, हरविंदरसिंग असे नवे बॉलर नेले होते.

पाकिस्तान तेव्हा मोठ्या फॉर्ममध्ये होता. अनुभवी रमीझ राजा त्यांचा कप्तान होता. इंझमाम, सलीम मलिक, सईद अन्वर हे त्यांचे मेन बॅट्समन होते. सईद अन्वरचा तर तो सुवर्णकाळ होता. ओपनिंगला येणारा डावखुरा सईद अन्वर आउटच व्हायचा नाही. सचिन बरोबर त्याची तुलना केली जात होती. पाकिस्तानी तर म्हणायचे तो सचिन पेक्षा भारी आहे. शतकांचा हिशोब केला तर १९९७ मध्ये सचिन पेक्षा तो पुढे होता

त्यातच त्याने आपल्याविरुद्ध वनडेमध्ये १९४ धावा काढून डोंगराएवढा जागतिक विक्रम केलेला.

कुंबळेची तो धुलाई करतोय हे नव्वदच्या दशकातल दुःखद सत्य होतं.

असा हा कर्दनकाळ सईद अन्वर भारतीय टीममधल्या नवीन बॉलर्सचे काय हाल करेल या चिंतेने भारतीय फॅन्सची रात्रीची झोप उडाली होती. जिंकलो तर बॅटिंगवरच हे ठरवलेलं. पाकिस्तानचे सुद्धा अक्रम वकार या सिरीज वेळी नव्हते. अकिब जावेद एकट्यावर सगळी जबाबदारी होती.

सचिनच्या नेतृत्वाखाली आपली टीम सहारा कपसाठी कनडाला पोहचली. पहिल्याच मॅचमध्ये मात्र भारताचा स्कोर २०८ धावांमध्ये गडगडला. एवढा स्कोर तर अन्वर एकटाच करू शकतो या माजात पाकिस्तानी होते. पण गंमत म्हणजे सईद अन्वर बॅटिंगला उतरला आणि पहिली ओव्हर खेळून काढली.

दुसऱ्या ओव्हरसाठी आलेल्या देबाशिष मोहंतीने आपल्या पहिल्याच बॉल ला त्याला बोल्ड काढले.

सगळ स्टेडियम स्तब्ध झालं. काही क्षण कोणालाच काही कळेना. पहिलीच इंटरनशनल मॅच खेळणाऱ्या देबाशिष मोहंतीने पहिल्याच ओव्हर मध्ये पाकचा माज मोडला होता. अन्वरलासुद्धा हे अपमानास्पद होते. त्याने ठरवले की बेटा नशीबवान ठरला. पुढच्या मॅचला दाखवू.

deba bahai 1482909905 800

भारताने ती मॅच जिंकली. पुढची मॅच आली, त्या मॅचला सुद्धा देबूने अन्वरला आउट केले. अन्वर जरा चपापला. त्याच्या पुढच्या मॅचला जेव्हा देबूने त्याला आउट काढल मग मात्र त्याच डोकं हालल. काय करावे त्याला कळेना. सहकाऱ्यांचा सल्ला घेतला, कोचशी बोलून झालं, पाकच्या जुन्या खेळाडूंशी चर्चा केली. पण काही कळेना.

चौथ्यांदा तो परत आउट झाला.

त्या दिवशी रात्री दोन्ही टीमच्या खेळाडूना हॉटेलमध्ये ऑर्गनायझरनी एक पार्टी ठेवली होती. भारताने ती सिरीज अगोदरच खिशात टाकलेली. पाकला चार पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यांचे खेळाडू पार्टीमध्येही टेन्शन मध्ये होते. तेव्हा सईद अन्वरची गाठ भारताचा कप्तान सचिन तेंडूलकरशी पडली. सचिनला माहित होते अन्वरचे हाल काय सुरु आहेत. आधीच त्यावरून भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये जोक सुरु होते.

अन्वर टेन्शन मध्ये सचिनला म्हणाला,

“सचिन भाई ये आपके बॉलर का मै क्या करू? उसका बॉल मुझे समझ मैही नही आता. और तो और उसका अक्शन इतना चिढाने वाला है. ये गेंद डालने के बाद मेरे सामने ऐसे हाथ करता है जैसे मुझे पुछ रहा हो की क्या डालने वाला हु पता है ? “

सचिन खूप हसला. परत दुसऱ्या दिवशी फायनल मॅच होती. तेव्हा योगायोगाने सईद अन्वरने देबाशिषला व्यवस्थित खेळून काढल.

सगळ्यानां आश्चर्य वाटल. सचिनला टेन्शन आल, हा जर बसला तर आपल्या हातातली मॅच गेली. देबाशिषच्या स्पेलची शेवटची ओव्हर होती. सचिन स्लीपमधून शॉर्ट स्क्वेअर लेगला जाऊन उभा राहिला, म्हणजे पिचच्या मध्ये म्हटल तरी चालेल. का हे त्याला सुद्धा माहित नाही.

पण गंमत म्हणजे पुढचाच बॉल देबुने अन्वरच्या पायात टाकला अन्वर मारायला गेला आणि सचिनच्या हातात लाडू सारखा कॅच देऊन आउट झाला.

सगळी भारतीय टीम हसून हसून लोळू लागली. देबाशिषने खूप मोठी कामगिरी कधी केली नाही पण त्याला कायम अन्वरचा कर्दनकाळ म्हणून ओळखले गेले. सचिनने हा किस्सा आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तो म्हणतो की ,

“कधी एखादा बॉलर बॅट्समनच्या मागे लागला तर त्याला आयुष्यभर सोडत नाही.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.