मुलाचा वाढदिवस या दुर्दैवी हिरोईनचं अख्ख कुटुंब संपवून गेला.

आयुष्य हे कसं सुरू होईल आणि कोणत्या मार्गाला येऊन संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. ज्या नवऱ्याशी प्रेमविवाह केला तोच नवरा पुढे आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरेल असा विचार या अभिनेत्रीने कधीच केला नसेल.

ही अभिनेत्री म्हणजे सईदा खान.

कोणीही बाहेर असताना नवऱ्याबद्दल विचारलं की सईदा खान, “माझा नवरा खूप चांगला आहे, तो माझी खूप काळजी घेतो.” असं सांगायच्या. पण जेव्हा याच नवऱ्याकडून त्यांचा खून झाला तेव्हा सर्वांना धक्का बसला होता.

सईदा खान यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९४९ रोजी कोलकात्यात झाला. लहानपणापासून त्यांना सिनेमात अभिनय करून हिरोईन होण्याचं स्वप्न होतं. त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुद्धा सुरू झाला.

त्या काळी एच. एस. रावेल हे लोकप्रिय निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक होते. एका समारंभात सईदा खान यांची त्यांच्याशी भेट झाली. रावेल यांनी सईदाला

“तू माझ्या सिनेमात काम करशील?” असं विचारलं.

जे स्वप्न ती गेली अनेक वर्ष बघत होती ते पूर्ण होण्याच्या विचारात सईदाने रावेल साब यांना होकार दिला.

सिनेमात काम मिळण्याच्या उद्देशाने सईदा आईसोबत मुंबईत आली. रावेल साहेबांनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी सईदा खान ला १९६० साली आलेल्या ‘कांच की गुडिया’ या सिनेमात हिरोईन म्हणून संधी दिली. याच सिनेमातून अभिनेता मनोज कुमारला सुद्धा रावेल साहेबांनी हीरो म्हणून ब्रेक दिला.

यानंतर सईदा खान यांना अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली. यातील महत्वाचे कलाकार म्हणजे कुमार त्रिकुट. म्हणजेच.. किशोर कुमार, प्रदीप कुमार आणि मनोज कुमार या अभिनेत्यांसोबत सईदा खान हिरोईन म्हणून झळकल्या.

हिरोईन होण्याचं स्वप्न साकार झालं. पण हे स्वप्न त्यांना दीर्घकाळ टिकवता आलं नाही.

हळूहळू त्यांना बॉलिवुडमध्ये काम मिळणं कमी होऊ लागलं. यानंतर सईदा खान यांनी बी ग्रेड आणि सी ग्रेड सिनेमांमध्ये भूमिका केल्या.

याच काळात त्यांनी मशहूर सिनेनिर्माते ब्रीज सदानाह यांच्यासोबत प्रेमविवाह केला. हळूहळू सिनेमात काम कमी करून सईदा खान यांनी संसारात लक्ष द्यायला सुरुवात केली.

नव्याची नवलाई कमी झाल्यावर सईदा खान आणि ब्रीज सदानाह दोघांची घरी खूप भांडणं होऊ लागली. पण ही भांडणं त्या घराबाहेर जाऊ द्यायच्या नाहीत.

एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री सिनेमात काम करत नसली तरी लोकांसमोर निर्माण केलेली स्वतःची इमेज त्याला जपावी लागते. त्यामुळे उगाच कोणाच्या चर्चेचा विषय होऊ नये म्हणून सईदा खान घराच्या बाहेर नवऱ्याचं कौतुक करायच्या. या दोघांना नम्रता आणि कमल ही दोन मुलं होती.

२१ ऑक्टोबर १९९०. कमलचा २० वा वाढदिवस होता.

तो आपल्या मित्रांसोबत बेडरूममध्ये पार्टी करत होता. आणि खाली हॉल मध्ये सईदा खान आणि ब्रीज यांचं जोरदार भांडण झालं. भांडता भांडता ब्रीज दारू पीत होते. त्यामुळे ते बेभान झाले होते. भांडण वाढत गेलं. ब्रीज चा रागाचा पारा सुद्धा चढत गेला. त्यांच्याकडे स्वतःची एक बंदूक होती. त्यांनी दारूच्या नशेत रागाच्या भरात ती बंदूक सईदा खान वर रोखली. बंदूक दिसताच सईदा घाबरल्या.

आणि कसलाही विचार न करता ब्रीज सदानाह यांनी सईदा खान वर गोळ्या झाडल्या. सईदा जागीच गतप्राण झाल्या.

आईला वाचवण्यासाठी नम्रता धावत आली पण ब्रीज ने तिला सुद्धा गोळी मारली. दोघी मायलेकी जागीच ठार झाल्या.

एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकुन कमल सुद्धा रुम मधून बाहेर आला. त्याला बघताच ब्रीज साहेबांनी त्याच्यावर सुद्धा पिस्तुल रोखून गोळी मारली. गोळी कमलच्या खांद्याला चाटून गेली पण कमल बेशुद्ध झाला.

काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. कमल ला मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. कमल शुध्दीवर आल्यावर मित्रांनी त्याला आई आणि नम्रताचं निधन झालं, ही दुःखद बातमी दिली. इतकं घडून गेल्यावर बाबांचं काय झालं असेल, हा प्रश्न कमलच्या मनात आला. तेव्हा त्याला कळलं सर्व उध्वस्त केल्यानंतर ब्रीज सदानाह यांनी स्वतःला गोळी मारून स्वतःचं आयुष्य देखील त्याच क्षणी संपवलं.

या भयंकर घटनेनंतर कमल च्या आयुष्यावर खूप परिणाम झाला. आई, बहीण, बाबा गेल्याने तो पोरका झाला होता. स्वतःला संपवून टाकावं इतकं नैराश्य त्याला आलं होतं. पण जगणं भाग होतं.

कमलने काही हिंदी सिनेमांमध्ये काम करून स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न केले. 

कमलच्या आईला पहिली संधी देणाऱ्या एच एस रावेल यांचे सुपुत्र राहूल रावेल यांनी त्याला पहिला पिक्चर दिला. बेखुदी या सिनेमात कमलची पहिली हिरोईन काजोल होती. हा सिनेमा हिट झाला पण त्याच सगळं क्रेडिट काजोल घेऊन गेली. पुढे कमलने अनेक सिनेमामध्ये काम केलं पण एकही गाजला नाही. दिग्दर्शन करण्याचाहि त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग मात्र त्याने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

या घटनेनंतर अनेक वर्षांनी कमलने लग्न करून तो आज बऱ्यापैकी सेटल आहे.

ज्या नवऱ्यावर प्रेम केलं त्याच्याच हातून असा दुर्दैवी मृत्यू सईदा खान यांच्या वाट्याला आला. मृत्यू हा अटळ असतो. तो कोणीही चुकवू शकत नाही. हिरोईन होण्याचं स्वप्न घेऊन बॉलिवुडमध्ये आलेल्या सईदा खान यांना आपला मृत्यू असा होईल, याचा कधीच विचार देखील आला नसेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.