जिथं फक्त कुसळं उगवायची अशा माळरानावर त्यांनी सफरचंद उगवून दाखवली आहेत

शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोऱ्या आपण वाचतच असतो. एकरी घेतलेलं ऊसाचं विक्रमी उत्पन्न असो नायतर अचानक सोन्याचा भाव मिळालेलं एखादं पिक असो. मधूनअधून शेतकऱ्यांच्या जिद्दीच्या गोष्टी वाचून समाधान वाटतं. 

आजची अवस्था सांगायची तर कोरोनामुळे मार्केट बंद आहे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मार्केट मिळत नाही, वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे.

अशा काळात एकदम भारी वाटणारी माहिती घेवून आलो आहोत. 

ही बातमी आहे सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील खेराडवांगी या गावची. या गावातल्या एका शेतकऱ्यांने आपल्या शेतात थेट सफरचंद लावली, विशेष म्हणजे आज त्या सफरचंदाची झाडं फळांनी लगडली आहेत. पंचक्रोशीत सफरचंद लावली म्हणून वेड्यात काढलेला हा शेतकरी आज कौतुकाचा विषय ठरतोय. 

खेराडवांगी हे गाव म्हणजे दुष्काळाला पुजलेलं. पावसाळ्यातल्या पंधरा दिवसात देखील इथे पाऊस पडणं मुश्कील असतं. एक काळ असाही होता जेव्हा इथल्या माळरानावर कुसळं सोडून दूसरं काहीही उगवत नसे. पण काळ बदलला आरफळ, टेंभू, ताकारी अशा योजना कार्यन्वित झाल्या आणि दूष्काळी पट्ट्यात पाणी आलं. ज्या माळरानावर येरझाऱ्या घालून आजवरच्या पिढ्या संपल्या त्याच माळरावर शेतकऱ्यांनी रानं तयार केली. पाणी आलं आणि ऊसासारखं हमखास भाव देणारं नगदी पिक घेण्याची स्पर्धा सुरू झाली. 

पाणी आल्यामुळे शेतकरी आपल्या शेतीत प्रयोग करू लागले, असाच प्रयोग खेराडवांगीच्या ॲड लक्ष्मण महादेव सुर्यवंशी या शेतकऱ्यांनी केला. 

झालं अस की त्यांनी आपल्या शेतात डाळिंबाच पिक घेण्यास सुरवात केली होती. पण वारंवार येणारा रोग आणि दराची अनिश्चितता म्हणून त्यांनी पिकात काही फेरपालट करता येईल का याचा विचार करण्यास सुरवात केली. त्यावेळी मित्रांच्या चर्चेतून त्यांच्या डोक्यात सफरचंद लावता येतील का विचार आला. 

मुळात माळरानावर सफरचंदाचा विचार करणं देखील वेड्यात निघण्यासारखी गोष्ट होती. इथल्या पोरांना सफरचंद बघायला मिळणं मुश्किल असायचं तिथं सफरचंद उगवणं तर लय मोठ्ठी गोष्ट होती. 

पण ॲड. लक्ष्मण सुर्यवंशी यांनी सफरचंदाच्या रोपांची माहिती घेण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांना आंध्रप्रदेशातील एका मित्राकडून समजलं की व्हिएतनाममध्ये उष्ण पट्ट्यात तग धरू शकणारी सफरचंदाची जात विकसित करण्यात आली आहे. इथे या रोपांपासून उत्पादन घेतलं जातं. वेळ न घालवता लक्ष्मण सुर्यवंशी यांनी या रोपांची मागणी केली. 

लक्ष्मण सुर्यवंशी यांना रोप मिळाली ती तीन वर्षांपूर्वी. तेव्हा या फक्त काटक्या होत्या. आपल्या वडिलांसोबत त्यांनी सुमारे १२५ रोपांची लागवण करून त्यांची जोपासना करण्यास सुरवात केली.  गावात सफरचंद लावल्याची बातमी व्हायरल झाली आणि लोकं या पितापुत्रांना वेड्यात काढू लागले. माळावर कुठं सफरचंद येत असतय का म्हणून बोलू लागले. 

सुरवातीला काटक्यांना पाने येवू लागली. तेव्हा ॲड लक्ष्मण सुर्यंवशी यांच्या मनात शंका आली. आपल्याला नर्सरीवाल्याने फसवलं का इथपासून हे सिताफळाचे रोप आहे की सफरचंद हा फरक देखील कळत नव्हता. तरिही त्यांनी रोप जगवण्याची धडपड सुरू ठेवली. 

दोन वर्षानंतर या वर्षी सफरचंदाचा बहार घेण्यात आला आणि सव्वाशे झाडं सफरचंदानी भरून गेली. लक्ष्मण सुर्यवंशी सांगतात झाडांना लागलेली सफरचंद बघून सॅटिस्फाय वाटतय. आत्ता जमा खर्चाचा अंदाज लिहून घेत आहे. व्यापारी पातळीवर याचं उत्पादन घेता येवू शकत का याचा अभ्यास सुरू आहे.

हे शक्य झालं तर दुष्काळी भागाचं नंदनवन करणार नवीन पिक म्हणून नक्कीच सफरचंद पिकाचं नाव होईल. तस झालच तर सुर्यंवशी पितापुत्रांची नोंद दुष्काळी भागात सफरचंद पिकवणारे शेतकरी म्हणून अवलिये म्हणून नक्कीच घेतली जाईल. 

  •  संदर्भ : वज्रधारी न्यूज विटा

हे ही वाच भिडू. 

3 Comments
  1. Umesh pawar says

    Give me contact

  2. Saurabh says

    सफरचंद कुठल्या जातीचे होते?

  3. जगन्नाथ जावरे says

    सलाम तुमच्या जिद्दीला आणि चिकाटी ला

Leave A Reply

Your email address will not be published.