कार्यकर्ता जपण्यासाठी त्याला मांडीवर बसवून नेणारा नेता म्हणजे साहेबराव डोणगावकर

राजकारणात सगळ्यात जास्त कोणाला जपायच असतं? असा प्रश्न एखाद्या नेत्याला विचारला तर ते डोळे झाकून ‘कार्यकर्ता’ असचं उत्तर देतात. म्हणजे एक वेळ पैश्याशिवाय निवडणूका जिंकता येतीलही पण ‘सामान्य कार्यकर्त्या’ शिवाय शक्यच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणूकीत कार्यकर्ता म्हणजे एखाद्या पक्षाची ‘संपत्ती’ असते.

यात मग प्रत्येक नेत्याची, आमदार, खासदारांची कार्यकर्ता जपण्याची आप-आपली पद्धत असते. कोणी कार्यकर्त्यांना फिरायला पाठवतं, कोणी दहीहंडी स्पर्धांच आयोजन करत, तर कोणी आणखी काय.

अशीच एक पद्धत होती,

मा. खा. कै. साहेबराव डोणगावकर यांची.

साहेबराव कचरू पाटील. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे हे गंगापूर तालुक्यातील डोणगावचे. गावचे सरपंच ते लोकसभा सदस्य असा त्यांचा प्रवास होता. शाळा अंडरमॅट्रिक झालेली पण माणसं वाचायचं उपजत ज्ञान अमाप. त्यातुनच आधी गावच्या राजकारणात आले. जवळपास १३ वर्ष सरपंच राहिले.

याकाळात गावासोबतच ते तालुक्याच्या देखील राजकारणात उतरले. एक – एक कार्यकर्ता जोडला. यातुनच गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे १० वर्षे सरचिटणीस अशा विविध पदांवर ते होते. त्यासह मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिले.

एकदम दिलखुलास आणि बेधडक व्यक्तिमत्त्व असणारे साहेबराव जिल्ह्यात अण्णा म्हणून ते परिचित होते. सोबतच कॉंग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते म्हणून लोक त्यांना ओळखायचे.

जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा पवार यांच्यासह ते देखील काँग्रेस (एस) मध्ये आले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष राहिले. १९८० सालच्या लोकसभेचे तिकीट मिळाले पण पराभूत झाले.

१९८४ ला मात्र इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहानुभूतीची लाट होती. या सहानुभूतीच्या लाटेत देखील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस एसचे
महाराष्ट्रात दोन खासदार निवडून आले होते. एक होते शरद पवार आणि दुसरे साहेबराव डोणगावकर.

तर अशा या साहेबराव डोणगावकर यांची कार्यकर्ता जपण्याची आयडीया साधीच होती पण अगदी भन्नाट.

ते कायम म्हणत,

“कार्यकर्ता हा नेत्याच्या प्रेमाच्या चार शब्दांचा भुकेला असतो. त्याला बरोबरीने वागवा, सन्मानाने वागवा. त्याच्या सुखदुखाला धावून जा. तो तिथे आहे म्हणून मी इथे मोठा झालो आहे. कार्यकर्त्याला योग्य सन्मान द्या, तोच तुम्हाला आमदार, खासदार मंत्री करीत असतो”

त्यांचा हाच फंडा साहेबरावांना सरपंच पदापासून लोकसभेपर्यंत घेवून गेला.

तर ही गोष्ट आहे १९८८ मधील. कन्नड कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमास कै. आ. रायभान जाधव यांनी साहेबरावांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. तिथे पोहचण्यापुर्वी साहेबराव गंगापूर तालुक्यात एका गावात पोहोचले.

ते इथे एका कार्यकर्त्याच्या घरी भेटीगाठी व चहापान आटोपून पुढे निघाले. साहेबरावांच्या ॲम्बेसेडॉर कारमध्ये तेव्हा एकुण सात माणसे दाटीवाटीने बसलेली होती.

साहेबरावांची एक सवय होती, ती अशी की, धुळीची पर्वा न करता कारच्या गाडीच्या काचा खाली ठेवत असत आणि रस्त्यात परिचितांना हात दाखवत. त्यामुळे एसी देखील बंदच असायचा.

अशातच गाडी गावाबाहेर पडताना वळणावर एस . टी . बसस्टॉप होता, तिथे आली. तिथून आवाज आला अण्णा.. अण्णा!

ती हाक ऐकताच साहेबरावांनी ड्रायव्हरला गाडी थांबवयाला लावली. हाक कोणी मारली हे मागं वळून बघितले. मग कार मागे बसस्टॉपपर्यंत रिव्हर्स घ्यायला लावली. एका चाळिशीतील कार्यकर्त्याने त्यांना नमस्कार केला.

साहेबराव कारमधून खाली उतरले. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून दोन मिनिटे मोठ्या आवाजात त्याच्याशी हास्य विनोद केला. गप्पा मारल्या. मग ते कारकडे वळले तर त्या कार्यकर्त्याने त्यांच्याबरोबरच कन्नडला येण्याचा आग्रह धरला. इकडे गाडीत तर पाय ठेवायलाही जागा नव्हती.

साहेबरावांनी एकदा सगळीकडे नजर फिरवली. ते गाडीत बसले व त्या कार्यकर्त्यास म्हणाले, ये बैस. त्यांनी आता त्याला आपल्या मांडीवरच बसवून घेतले. सगळ्यांनाच खूप अडचण होत होती. अगदी साबेबरावांना देखील.

कार २-३ किलोमीटर पुढे गेल्यावर मोठा रस्ता लागला. मग अण्णा त्या कार्यकर्त्याला म्हणाले,

“मित्रा माझ्या पायाला खूप रग लागलीय. कारमध्येही दाटीवाटी आहे. कसे करतो?”

कार्यकर्ता म्हणाला, अण्णा गाडी थांबवा. मी उतरतो इथचं.

त्याने बाहेर उतरून कारचा दरवाजा धाडकन लावला आणि अण्णांना तीन-तीनदा वाकून नमस्कार करून अत्यानंदाने चालू लागला.

कन्नडचा कार्यक्रम पार पडला. औरंगाबादला माघारी येत असातना अण्णासोबत एक – दोघे जण होते. त्यापैकी एक होते, जेष्ठ पत्रकार जयंत महाजन. त्यांनी हा किस्सा एकेठिकाणी सांगितलं आहे. जयंत महाजन सांगतात त्या दिवशी मी न राहवून त्यांना घडलेल्या प्रसंगाबद्दल विचारले,

“कन्नडकडे जाताना त्या गावातून कारमध्ये जागा नसतानाही तुम्ही एका कार्यकर्त्याला बसवून घेतलं आणि ५ मिनिटांनी त्याला उतरवून दिलं. त्याने काय साध्य केले? तुम्ही एकतर त्याला गाडीत बसवायचेच नव्हत किंवा शेवटपर्यंत सोबत घ्यायच होते. असे मध्येच उतरवून दिल्यामुळे तो नाराज झाला असणार?”

त्यावर साहेबराव हसत म्हणाले,

“तुमचे शिक्षण कॉलेजचे आहे आमचे शिक्षण जीवनाच्या शाळेतले आहे. इथे माणसे पुस्तकासारखी वाचता आली पाहिजेत.

त्या कार्यकर्त्याने जिथं मला मोठ्याने हाक मारली तो बसस्टॉप होता. तेथे वीस- पंचवीस जण तर सहज उभे होते. त्यात जसे सामान्य नागरिक होते तसेच माझ्या राजकीय विरोधकांचे समर्थकही होते. आज मी जर त्याच्यासाठी थांबलो नसतो तर विरोधी कार्यकर्त्यांनी माझ्या माणसाची टर उड़वली असती. त्याचा अपमान केला असता.

म्हणून त्याने हाक मारताच मी कार रिव्हर्स घेऊन खाली उतरलो. इथे माझ्या कार्यकर्त्याची सरशी झाली. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी हास्य विनोद करत असल्याचे सगळ्यांनी बघितल्याने त्याची कॉलर ताठ झाली. कारमध्ये जागा नाही हे देखील सगळ्यांनी बघितले होते. तरीही त्याने विनंती करताच मी त्याला गाडीत बसवून घेतल. एवढेच नव्हे तर माझ्या मांडीवर बसवून घेतल हे पण सगळ्यांनी बघितले.

त्याच्या अपेक्षेपेक्षा मी त्याला भरभरून दिल. त्याचा सन्मान राखला. त्यामुळे सगळ्यांसमोर त्याला माझ्या गाडीत बसण महत्त्वाच होते. त्याचा हा हेतू साध्य झाल्याने तो पाच मिनिटांनी कारमधून उतरायला तयार झाला.

त्याला कन्नडला यायचेच नव्हते. खासदार आपल्याला गाडीमध्ये जागा नसताना देखील बसवून घेतात हे इतरांना त्याला दाखवून द्यायच होते.

मी त्याचा सन्मान राखल्याने तो आता येत्या निवडणुकीत माझ्या पॅनेलचे जोरात व उत्साहात काम करणार. विरोधक पैशाने किंवा प्रलोभनाने त्याची निष्ठा खरेदी करू शकणार नाहीत.

शेवटी काय तय कार्यकर्ता प्रेमाच्या चार शब्दांचा भुकेला असतो. त्याला बरोबरीने वागवा, सन्मानाने वागवा. त्याच्या सुखदुखाला धावून जा. तो तिथे आहे म्हणून मी इथे मोठा झालो आहे. कार्यकर्त्याला योग्य सन्मान द्या, तोच तुम्हाला आमदार, खासदार मंत्री करीत असतो.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.