तुमच्या आमच्या सारख्या फाटक्या बॉयफ्रेंड लोकांच दुःख साहीरलाच कळालं होतं !
” मै पल दो पल का शायर हुं “ म्हणणारा साहीर लुधियानवी आधुनिक काळात भारताने बघितलेला सर्वात महान शायर. आपल्याला शायरची नावं विचारली की जी चार दोन नावं आठवतात त्यात गालिब नंतरच दुसर नाव हमखास साहीरच असत. साहीरची शायरी, त्याची पिक्चर मधली गाणी, प्यासा, सिगरेट, अमृता प्रीतमसोबतची लव्ह स्टोरी वगैरे सगळ्यांनाच माहित असेल.
अहो पण हे सोडून तुम्हाला साहीरच्या शायरी मागची कहाणी ठाऊक आहे का?
साहीर लुधियानवी या नावानं सगळ जग त्याला ओळखतं पण त्याच खर नाव “अब्दुल हयी ” हे होतं. पंजाब च्या लुधियाना मध्ये जन्मलेल्या या शायर ला आपल्या प्रत्येकाला असतो तसा गावाचा अभिमान होता. म्हणूनच त्याने कवी बनल्यावर आपल्या टोपण नावात “लुधियानवी” लिहिलं.
कॉलेज काळापासून शायरीसाठी प्रसिद्ध झालेला साहीर शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पंजाबमधलं मोठ शहर असलेल्या लाहोरला आला. तेव्हा काही वर्षातच इंग्रजांनी देश सोडून जायचं ठरवलं. हिंदू मुस्लीम शीख सगळे एकमेकाच्या उरावर बसले, फाळणी झाली. देश वाटला गेला. पाकिस्तान मधले हिंदू भारतात आले आणि भारतातले मुसलमान पाकिस्तान मध्ये जाऊ लागले. भयंकर रक्तपात दोन्ही दिशेकडून झाले.
अशा वेळी साहीर नावाचा हा मुस्लीम उर्दू शायर मुसलमानांचा पाकिस्तान सोडून आपल्या म्हातारी आईला घेऊन भारतात दिल्लीला पळून आला.
साहीर भारतात परत येण्यापूर्वी तो येतोय ही बातमी इथे पोहचली होती. दिलोंकी दिल्ली मध्ये तो रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. पण तो तिथं खूप दिवस टिकला नाही. तुमच्या आमच्यासारखं त्याला पण फिल्मी किड्याने झपाटलं होतं.
“फिल्मी गाने तेरी शायरी कि सादगी को मैला कर देंगे “
असं त्याच्या मित्रांनी त्याला सुनावून बघितलं. पण गडी मुंबईला आला.
मुंबईमध्ये आल्या आल्या तो जेष्ठ संगीतकार एस.डी.बर्मनच्या ऑफिसवर जावून धडकला आणि त्यांना म्हणाला
“मै साहीर लुधियानवी !”
बंगाली बाबू एस.डी.बर्मननी उर्दू साहित्यातलं हे दिग्गज नावं ऐकलं असण शक्य नव्हत. तरी त्यांनी त्याला एक चान्स दिला. गाण्याची सिच्युएशन सांगितली, आणि एस.डी. दा हार्मोनियम वरून बोट फिरवू लागले. काही क्षणातच शायर म्हणाला,
“ठंडी हवाएं, लहरा के आंए, रुत है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलाएं “
नौजवान या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गाण अजरामर झालं आणि तसंच एस.डी. आणि साहीर जोडी सुद्धा अजरामर झाली.
” ये चमन-ज़ार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक़्क़श दर ओ दीवार ये मेहराब ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़ “
प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहलवर अनेकांनी शायरी केली आहे. पण तुमच्या आमच्या सारख्या फाटक्या बॉयफ्रेंड लोकांच दुख्खः साहीरलाच कळालं होतं.
पण तुम्हाला गंमत माहित आहे का हि शायरी लिहिण्यापूर्वी साहीरने एकदाही ताजमहाल बघितला नव्हता.
दिल्लीमध्ये साहीर खूप फेमस होता. त्याची गाणी खूप जन त्याची परवानगी न घेता आपल्या पुस्तकात आणी मासिकात छापायचे. एकदा एक तरुण मुलगा त्यांना भेटला. त्याच नाव अमर वर्मा. त्याला त्याच्या पुस्तक प्रकाशनसंस्थेत पहिलं पुस्तक साहिरच्या कवितांच छापायचं होत. त्यान साहिरला त्याची काही गीत वापरायची परवानगी मागितली. साहीरने लगेच “गाता जाये बंजारा ” या नावाने पुस्तक छाप सांगितल.
ते काही दिवसात हि घटना विसरून देखील गेले होते, इतक्यात एकेदिवशी त्यांच्या घरी एक बासष्ट रुपयांचा चेक आला.
अमर वर्माने आपल्या ऐपती प्रमाणे त्यांना रॉयल्टी दिली होती. त्या चेक सोबत एवढ्या मोठ्या कवीला आपण इतका कमी रकमेचा चेक देतोय याबद्दल शरमिंदा झालेलं पत्र सुद्धा त्यानी पाठवलं होतं.
साहीरन त्याला उलटं उत्तर पाठवलं,
“मेरे जिंदगी में पहिली बार किसीने मुझे रॉयल्टी दि है. इस चेक को मै जिंदगी भर नही भूलुंगा.”
साहीरची लोकप्रियता एवढी होती की पहिल्यांदाच फिल्मच्या पोस्टर वर गीतकाराच नाव येऊ लागलं.
एकदा साहीर आणि त्याचे मित्र उपन्यासकार कृष्ण चंदर हे कारने लुधियानाहून कुठे तरी जात होते, अचानक त्यांना शिवपुरी गावाजवळच्या निबिड जंगलात डाकुनी अडवल. त्यांचा मुखिया कुप्रसिद्ध डाकू मानसिंग हा होता. कार मधले सगळे घाबरले. पण साहीर बिनधास्त होता. त्यान मानसिंग ला सांगितलं,
“जो डाकूंओ पर फिल्म आई थी ना ‘मुझे जिने दो ‘ उसके गीत मैने लिखे है”
डाकू मानसिंग ने तो पिक्चर पाहिला होता कि नाही माहित नाही पण साहीरचा कॉन्फीडन्स पाहून त्यानं त्यांना जाऊ दिल. असा हा अवलिया शायर. आज त्याची पुण्यतिथी
हे ही वाच भिडू
- खुदा ए सुखन अर्थात गालिबचा उस्ताद मीर तकी मीर
- नेहरू के नाम मंटो का खत!!!
- एकविसाव्या शतकाची भाषा जाणणारा गीतकार.
- शायर ज्याला नेहरूंनी जेलमध्ये बंदिस्त केलं होतं !