संपूर्ण भारतभरातून मानसिक रुग्णांना या बाबाच्या पायाशी घातलं जातं..

तस बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी हे इतर गावांसारखंच नॉर्मल वाटतं. खाण्यापिण्याची दुकानं, कॅसेटची दुकानं, दवाखाने आणि मेडिकल भरपूर आहेत. पण इथं एक गोष्ट खास आहे ती म्हणजे इथल्या बऱ्याच दुकानांना सैलानी हे नाव आहे ते मुस्लिम संत सैलानी बाबांच्या नावावरून आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सैलानी बाबाची दर्गा ओळखली जाते. सर्वधर्मसमभावाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाची दर्गा सगळ्या देशभरात प्रसिद्ध आहे.

गावाच्या मधोमध सैलानी बाबाची दर्गा आहे. सैलानी बाबाची देशभर कीर्ती असण्याचं कारण म्हणजे इथं मानसिक आजार असलेल्या लोकांना या रोगातून बर केलं जातं. लोकांची सैलानी बाबावर इतकी प्रचंड श्रद्धा आहे कि मानसिक आजार असलेल्या लोकांचे नातेवाईक त्या रुग्णाला डॉक्टरकडे न नेता थेट सैलानी बाबांच्या पायाशी घालतात. मानसिक रुग्ण साखळदंडात बांधलेली जागोजागी दिसतात पण बुलढाण्यात राहणाऱ्या लोकांना यात जास्त काही विशेष वाटत नाही.

भारतात अशा अनेक दर्गा आहेत इलाहाबादमधील हजरत मुनव्वर अली शाह कि दर्गाह, तमिळनाडूच्या  एरवादी मधील हजरत सुल्तान सैय्यद इब्राहिम शहीद कि दर्गाह इथं मानसिक रुग्णांना आणलं जातं, नंतर त्यांना साखळ्यांनी बांधलं जातं, प्रसंगी मारलंही जातं, मानसिक आजारांना वाईट साईट आत्म्यांचा प्रभाव मानलं जातं.

सैलानी बाबाच्या दर्गातही हि परंपरा बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. शेगाव संस्थानाच्या खालोखाल या दर्ग्याचा बोलबाला आहे. देशभरातून प्रत्येक धर्माला मानणारे हजारो लोकं दर्ग्यात येतात, स्थानिक लोकांकडून सैलानी बाबाची माहिती दूरवर पोहचत असते. सैलानी बाबांच्या आशीर्वादाने मानसिक रुग्ण बरे होतात अशी इथे समजूत असल्याने दुरून दुरून मानसिक रोगी इथे आणून सोडले जातात.

सैलानी बाबांची कीर्ती दूरवर असल्याने रुग्णांचे नातेवाईकी रुग्ण सोडून निघून जातात तेव्हा ते रुग्ण भ्रमिष्टासारखे भटकताना दिसतात, अस्वच्छ राहणीमान आणि त्यात त्यांचा आजार हे बऱ्याचदा स्थानिकांना आणि दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांना त्रासदायक असतं. बऱ्याच सोयीसुविधा अर्धवट असल्याने भाविकांची होणारी परवड लागलीच दिसून येते.

या देवस्थानांवर इतका पैसा खर्च होतो त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भ्रमिष्टावस्थेत फिरणाऱ्या मनोरुग्णांसाठी एखाद अद्यावत सोयीसुविधा असलेलं हॉस्पिटल उभारावं अशी मागणी लावून धरली होती. पुण्यातील एका श्रीमंताने सैलानी बाबांच्या भक्तांसाठी खाण्याची व्यवस्था केलेली आहे. सोबतच एक छोटेखानी दवाखानासुध्दा भाविकांच्या सेवेसाठी उभारला आहे. पण दवाखान्यातील डॉक्टरचं म्हणणं आहे कि लोकं दवाखान्यात मोठ्या मुश्किलीने लोकं येतात कारण सैलानी बाबांवर त्यांचा अतूट विश्वास आहे.

अनेक लोकांचं म्हणणं आहे कि सैलानी बाबाच्या दर्ग्यावर मानवाधिकारांच्या नियमांचं उल्लंघन केलं जातं. रुग्णांना साखळीने बांधलं जाणं, त्यांना मारझोड करणं, ग्रामीण भागात उपचारांच्या सोयीसुविधा नसल्यानं आणि उपचारांचा खर्च परवडत नसल्याने मानसिक रुग्णांना इथे आणून टाकलं जातं त्यामुळे ते रुग्ण एका जागी न बसता फिरत रहातात.

अशा अनेक समस्या तर आहेच पण सैलानी बाबाच्या दर्ग्याची खास आणि आकर्षण असणारी गोष्ट म्हणजे इथली होळी. हि होळी फक्त बुलढाण्यातच आणि महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तब्बल दहा ट्रक नारळाची होळी सैलानीत केली जाते तेही मोठ्या उत्साहाने.

भारतभरातून सैलानी बाबांच्या दर्ग्याला लोक भेट देतात. सर्वधर्मसमभाव आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून सैलानी बाबांची दर्गा ओळखली जाते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.