रुपेरी पडद्यावरील संत दर्शन…

आपल्याकडे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची खूप जुनी संपन्न अशी परंपरा आहे. अनेक संतानी या धर्माची ध्वज पताका दिमाखाने फडकत ठेवली. या संताच्या शिकवणुकीचा, त्यांच्या आचरणाचा आणि समतेच्या संदेशाचा मोठा प्रभाव इथल्या जनमानसात खोलवर रुजलेला आजही दिसतो.

हजारो वर्षापासून चालू असलेली वारीची प्रथा नुसती टिकूनच नाही तर दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसते आहे हे त्याचेच लक्षण आहे. पंढरीची वारी,विठ्ठलाच्या भेटीला जाणारा लाखो वैष्णवांचा सोहळा, माणसातील परमेश्वर व त्यालाच नतमस्तक होणारा वारकरी समाज हे सारं इथल्या मातीचं खरं वैभव आहे नव्हे हाच खरा समृध्द सांस्कृतिक ठेवा आहे.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आणि अन्य संतानी भक्तीचा मार्ग दाखवत समाज प्रबोधन केले. या महात्म्यांचा प्रभाव इथल्या सांस्कृतिक माध्यमांवर पूर्वी पासून पडत आला आहे.

 चित्रपट या प्रभावी दृकश्राव्य माध्यमातून संतावर अनेक चित्रपट आले.

आजही थेट संतपट येत नसले तरी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विचार त्यांची वचने आणि त्यांचे काव्य याचे ठायी ठायी दर्शन घडते. पण एक जमाना होता अशा चित्रपटांचा. या कलाकृती पौराणिक चित्रपटांपासून अगदी भिन्न अशा होत्या. यात मोठे राजवाडे, महाल, त्यांचा डामडौल, डोळे दिपवून टाकणारे नेत्रदीपक सेट्स, चमत्कार याचा संपूर्णपणे अभाव असायचा.

चित्रपटातील साधेपणातून समतेचा आशय समाजापर्यंत पोचवला जायचा.आपला देश हा सणावारांचा, व्रत वैकल्याचा आणि यात्रा उत्सवांचा असल्याने अशा संस्कारक्षम सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कलाकृतीला या काळात चांगले यश मिळत असे. सध्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरीच्या जवळ पोचला आहे. अशा या सात्विक, मंगलमय प्रसंगी आपण संतपटांचा आढावा घेवूयात.

संतपट म्हटलं की पहिल्यांदा नजरेपुढे येतो तो प्रभातचा संत तुकाराम.

७ नोव्हेंबर १९३६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविले आहे. व्हेनिस येथे १९३७ साली झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम ‘ ला जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटामध्ये निवड करून गौरविण्यात आले होते.

विष्णूपंत पागनीस यानी यातील तुकाराम महाराजांची भूमिका केली होती. दामले आणि फत्तेलाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. संत तुकारामांची विठल भक्ती, समाजातून त्यांना होणारा विरोध, त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवणे, त्यांचे वैकुंठ गमन, शिवाजी राजांसोबत झालेले त्यांची भेट, वरून भांडखोर पण मनाने प्रेमळ असलेली त्यांची पत्नी आवली हे सर्व इतक्या साध्या आणि समर्पक रीतीने पडद्यावर चितारले होते की आजही हा चित्रपट, अभ्यासकांकरीता आदर्श वस्तुपाठ आहे. 

यातील पागनीस यांच्या भूमिकेचे गारुड अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनातून दूर झाले नाही. इतके की बऱ्याच ठिकाणी संत तुकाराम म्हणून विष्णूपंत पागनीस यांचेच छायाचित्र लावले जावू लागले! यातील ‘आधी बीज एकले बीज अंकुरले रोप वाढले ‘हा अभंग वस्तुत: तुकाराम महारांजाचा नव्हता तो लिहिला होता शांताराम आठवले यांनी पण भल्या भल्या विद्वानांना त्यातील भाषा सौंदर्याने फसायला झाले! यातील सुंदर प्रासादिक संवाद शिवरामपंत वाशीकर यांचे होते. तर संगीत केशवराव भोळे यांचे होते.

 यात तब्बल २९ गाणी होती. हाच ‘संत तुकाराम’ प्रभात ने १९४८ साली हिंदीत डब करून पडद्यावर आणलापण त्यावेळी विष्णूपंत पागनीस हयात नव्हते. १९४३ सालीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे या हिंदीतील गाणी त्यांच्या स्वरात डब करता आली नाही ती केली गेली संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या स्वरात. याच भाटकर बुवांनी आणखी एका तुकारामावरील चित्रपटाला संगीत दिले होते.

१९६४ साली ( उदय चित्र या संस्थेचा) राजा नेने यांनी ‘तुका झालासे कळस ‘ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात कुमार दिघे आणि सुलोचना यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. 

कथा पटकथा संवाद आणि काही गाणी गदिमांची होती. यात मूळ तुकोबाच्या बऱ्याच अभंगांना स्थान दिले होते.  सुंदर ते ध्यान, सावळे सुंदर रूप मनोहर ,आम्ही जातो आमच्या गावा या अभंगांनी चित्रपट रसपूर्ण बनला होता .यात एकूण १७ गाणी होती. यातील अखेरचा वैकुंठ गमनाचा प्रसंग सप्तरंगात चित्रित केला होता. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार १९६५ साली या सिनेमाला मिळाला होता.

१९७४ साली मराठीत ‘महाभक्त तुकाराम’ नावाचा एक सिनेमा आला होता पण हा मराठीत डब होवून आला होता. मूळ तमिळ मध्ये बनलेल्या या चित्रपटात ए. नागेश्वरराव यांनी तुकाराम साकारला होता तर आवली च्या भूमिकेत अंजली देवी होत्या. 

अंजली देवी चे पती आणि संगीतकार आदी नारायण राव यांची हि निर्मिती होती. (सुवर्ण सुंदरी च्या ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ फेम) दिग्दर्शक होते मधुसूदन राव. यात नंतरच्या काळात अफाट यश मिळविलेल्या श्रीदेवी ने तुकारामाच्या मुलीची बाल भूमिका केली होती.

२००२ साली ‘जगद्गुरू संत तुकाराम’ नावाचा एक चित्रपट आला होता ज्यात श्याम पांडे यांनी प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन केले होते. ८ जून २०१२ रोजी चंद्रकात कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ हा चित्रपट आला. यात जितेंद्र जोशी ने तुकाराम साकारला होता.

नव्या तंत्रातील हा तुकाराम रसिक प्रेक्षकाच्या पसंतीस उतरला. यातील काही पारंपारिक रचनांसोबत काही गाणी दासू वैद्य यांनी लिहिली होती.याला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. मराठी शिवाय कन्नड भाषेतही तुकाराम महाराजांवर चित्रपट निर्मिती झाली. तेलगु मध्ये दूर चित्रवाणीवर मालिका आली.

 मूकपट तसेच बोलपटा सुरुवातीच्या काळात हिंदीतही चित्रपट आले.

संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तुकारामाच्या आधीचा बाराव्या शतकातील. प्रभात ने १९४० ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट निर्माण केला. दामले फत्तेलाल यानीच याचे दिग्दर्शन केले होते. शाहू मोडक या गुणी कलावंताने प्रमुख भूमिका केली होती.

यात ज्ञानेश्वर माउली आणि त्यांच्या भावंडाना समाजाकडून मिळालेली अमानुष वागणूक, ज्ञानार्जनासाठी करावा लागलेला संघर्ष आणि ज्ञानेश्वरीची रचना करण्याचा त्यांचा कालखंड अतिशय कलात्मक रीतीने दाखविण्यात आला.

 प्रभात च्या चित्रपटाची निर्मिती इतकी अचूक आणि समर्पक असायची की त्यात किंचितही त्रुटी असता कामा नये अशी त्यांची धारणा असायची.

या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पैठण आणि नेवासा इथे स्वत: जावून तिथल्या स्थळांचे आरेखन केले व तसे सेट्स प्रभात मध्ये उभारले. भगवान श्री कृष्णाने भगवत गीतेत सांगितलेला मानव धर्म रूढ दांभिक धर्माखाली दबून गेला असल्याने खऱ्या धर्माची महती सोप्या प्राकृत भाषेत करण्याचा माउलींचा ध्यास फार फार सुंदर प्रकारे चित्रित केला गेला. १८ मे १९४० रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

पुण्यात तर या सिनेमाची प्रिंट टाळ, मृदुंग यांच्या गजरात प्रभात थिएटरवर आणण्यात आली. माउलींच्या जयजयकाराने अवघा परिसर भक्तीमय बनला. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत चित्रपटाला चांगले यश मिळाले. मुंबई दूरदर्शनचा मराठी चित्रपटांच्या प्रक्षेपणाचा शुभारंभ ७ ऑक्टोबर १९७२ रोजी याच चित्रपटाने झाला होता. 

या नंतर १९६४ साली हिंदीत ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट बनला. 

‘ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताने मोठी लोकप्रियता मिळविली. यात सुधीरकुमार ने (दोस्ती फेम ) ज्ञानेश्वर साकारला होता. मणिभाई व्यास यांच दिग्दर्शन होतं तर लक्ष्मीकांत प्यारेलाल याचं संगीत होतं.

१९८२ साली आपला महेश कोठारे यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली होती हा सिनेमा एस व्ही अय्यर यांनी निर्मिला होता. तर त्याला संगीत एस एन त्रिपाठी यांचे होते हा सिनेमा डब होवून मराठीत आला होता.

महेश कोठारे यांनी ज्ञानोबांची बाल भूमिका १९६४ सालच्या ‘संत निवृत्ती ज्ञानदेव ‘ मध्ये केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुकर पाठक यांचे तर संगीत सी रामचंद्र यांचे होते.यात पद्माकर गोवईकर यांनी ज्ञानदेव साकारला होता. यातील गाणी खूपच गोड होती. गदिमा यांनी यात कमालच केली. 

ज्ञानेश्वरांच्या लेखन शैलीशी जुळणारे एक गीत यात होते जे गदिमांनी लिहिले होते. ‘नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु , मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ’ हेच ते गीत जे आशाने गायले होते.’मुंगी उडाली आकाशी ‘,’रूप पाहता लोचनी सुख जाले हो साजनी’, ‘ चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर ‘ हे अभंग देखील यात होते. 

या सिनेमाला चांगले यश मिळाले. १९६४ साली आलेल्या ‘संत ज्ञानेश्वर ‘ आणि ‘संत निवृत्ती ज्ञानदेव ‘ या दोन्ही चित्रपटात सुलोचना यांची सारखी म्हणजे ज्ञानोबांच्या आईची भूमिका होती! संत ज्ञानेश्वराचे समकालीन संत म्हणजे संत नामदेव. त्यांचे आपल्या प्रांताइतकेच बहुमोल कार्य पंजाबात केले. 

प्रभात चित्र संस्थेने १९४९ साली ‘संत जनाबाई ‘ हा चित्रपट बनविला. 

यात नामदेवांची भूमिका अभिनेता विवेक याने तर जनाबाईच्या भूमिकेत हंसा वाडकर होत्या. गदिमा-सुधीर फडके हि जोडी गीत संगीता करीता होती.’प्रभात समयो पातला ‘ हि भूपाळी यात होती. १९९५ साली यशवंत पेठकर यांनी’संत नामदेव’ हा रंगीत चित्रपट निर्मिला ज्यात पद्माकर गोवईकर नामदेव बनले होते.

नामदेव आणि ज्ञानेश्वर समकालीन असल्याने या चित्रपटात यात त्यांचाही समावेश होता. सुधीर फडके यांची निर्मिती असलेला १९५१ सालच्या ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पेठकर यांनीच केले होते. यात संताची गर्दी होती. यात तुकारामाची भूमिका बालगंधर्व यांनी केली होती. हि त्यांची अखेरची रुपेरी भूमिका ठरली. 

या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी श्रीधर फडके यांचा जन्म झाला होता. आणि चित्रपटात पाळण्यातील बाळ दाखविताना त्याचे ओझरते दर्शनही घडले होते! दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपट १९६२ साली पडद्यावर आला. यात अरुण सरनाईक याने नामदेवाची भूमिका केली होती. यातील जनाबाईची भूमिका सुलोचना यांनी केली होती. कोल्हापूर जवळच्या कण्हेरी गावात चित्रीकरण चालू असताना सारे गाव सुलोचना बाईच्या पाया पडत होते!

संत एकनाथ महाराज त्यांच्या अस्पृश्यता विरोधी लढा आणि समाजातील दांभिकतेवर त्यांनी रचलेल्या भारुडामुळे आजही जनमानसात लोकप्रिय आहेत.

१९३५ साली प्रभात फिल्म कंपनी ने ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांचा जीवनपट दाखविला होता.

यात मुख्य भूमिकेत बालगंधर्व होते आणि त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आपल्या स्त्री पार्ट ने अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर बालगंधर्व यांनी यात पहिल्यांदाच पुरुष पात्र रंगवले होते. बोलपटाच्या आगमनानंतर रंगभूमीला वाईट दिवस आले होते. आर्थिक अडचणी मुळे गंधर्व नाटक कंपनी त्याच सुमारास बंद पडली होती. 

प्रभात आणि गंधर्व यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातूनच या चित्रपटाची निर्मिती झाली. या सिनेमाचे मूळ नाव ‘महात्मा’ होते. म. गांधी चे हरिजन उद्धाराचे काम त्यावेळी जोरात चालू होते. एकनाथांच्या कार्याला गांधीचा चेहरा लावून कुठेतरी गांधीचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे याची कुणकुण ब्रिटिशांच्या कानी गेली आणि त्यांनी सिनेमाचे नाव बदलायला लावले! 

आयुष्यभर रंगभूमीवर वावर केल्याने बालगंधर्व मात्र एकूणच सिनेमाच्या तंत्राबाबत आणि पुरुष पार्ट बाबत काहीसे कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे चित्रपट फारसा जमला नाही असेच म्हणावे लागेल. पुढच्याच वर्षी बालगंधर्व यांनी सिनेमात स्त्री पार्ट करत संत मीराबाई ची भूमिका केली पण हाही चित्रपट चालला नाही.

 १९४१ साली ‘संत सखू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

यात प्रमुख भूमिकेत हंसा वाडकर होत्या. सखूचा अतोनात छळ तिच्या सासूने केला या सासूच्या भूमिकेत गौरी होती. सखूची हि कहाणी महिला वर्गात अफाट लोकप्रिय असल्याने त्यांनी सिनेमाचे उदंड स्वागत केले. १९७१ साली मुंबईच्या ‘प्लाझा’ चित्रपटगृहात ‘संत सखू’ पुन्हा प्रदर्शित केला होता. 

त्या वेळी हंसा वाडकर खूप आजारी होत्या आणि त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावयाची होती.आजार गंभीर असल्याने ऑपरेशन करणे गरजेच्गे होते पण हंसाने ‘मला एकदा संत सखू बघू द्या ‘ असा हट्ट धरला. पण तब्येत इतकी नाजूक होती की डॉक्टर कोणतीही जोखीम घ्यायला तयार नव्हते. ऑपरेशन झाले, पण हंसा बाई त्यातून बऱ्या झाल्याच नाहीत आणि त्यांचा आवडता ‘संत सखू’ पहायची त्यांची इच्छा अपुरीच राहिली!

याच कथानकावर आ अत्रे यांनी देखील त्याचा वर्षी ‘पायाची दासी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. पण यातली सखू हि अलीकडच्या काळातील होती. थोडक्यात संतपटाचा सामाजिक पट त्यानी केला. यात सखूची भूमिका वनमाला यांनी तर दुष्ट सासूच्या भूमिकेत दुर्गा खोटे होत्या.

हा चित्रपट अफाट गाजला. यातील ‘अंगणात फुलल्या जाईजुई ‘(सं अण्णासाहेब माईणकर) खूप लोकप्रिय झाले होते. याच गीतातून प्रेरणा घेत सी रामचंद्र यांनी ‘अलबेला’ चित्रपटातील ‘धीरे से आजा रे आंखियन में’ या गीताची चाल बांधली. 

संत सखू हे हिट पात्र असल्याने हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य भाषात त्यावर चित्रपट आले.

या शिवाय संत चोख मेळा, कान्होपात्रा , संत गोरा कुंभार , संत रामदास यांच्या वरही चित्रपट तयार झाले. १९५० साली मंगल चित्र संस्थेकडून ‘जोहार मायबाप’ राम गबाले यांच्या दिग्दर्शनात या चित्रपटात पु ल देशपांडे यांनी संत चोखामेळ्याची भूमिका केली होती!

पुलं साठच्या दशकात त्यांच्या नाटकांमुळे आणि एकपात्री प्रयोगाने खूप लोकप्रिय झाले होते त्या वेळी हि लोकप्रियता कॅश करण्यासाठी रणजीत बुधकर यांनी हा सिनेमा ‘हि वाट पंढरीची’ या नव्या नावाने प्रदर्शित केला. आणि या सिनेमाने तुफान धंदा केला. याच नावाने १९८४ साली एका चित्रपटाची निर्मिती सुरू झाली होती.

या चित्रपटाच्या शूटिंग करीता २२ जून १९८४ रोजी अभिनेते अरुण सरनाईक कोल्हापूर हून पंढरपूर ला आपल्या कुटुंबीयासोबत कारने निघाले होते. पण दुर्दैवाने इस्लामपूर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

पुढची चार वर्षे हा सिनेमा डब्यात गेला. पण नंतर अरुण सरनाईक यांच्या जागी बाळ धुरी सिनेमात आले आणि ‘ पंढरीची वारी ‘या नावाने चित्रपट प्रदर्शित झाला. रमाकांत कवठेकर यांचे दिग्दर्शन होते. ‘धरिला पंढरीचा चोर ‘हे सुंदर गाणे यात होते. रुढार्थाने हा संत पट नव्हता तो सामाजिक चित्रपट होता. वारकऱ्यांचे भावविश्व यात चितारले होते.

विसाव्या शतकातील संत साईबाबा, संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि संत गाडगे बाबा यांच्यावर, त्यांच्या कार्य कर्तृत्वावर अनेक सिनेमे तयार झाले ते त्यांच्या भक्त गणांनी ते आवडीने बघितले.

‘देऊळ बंद ‘ हा सिनेमा तर अलीकडचा रिलेव्हन्स घेवून बनला होता. १९७७ साली राजदत्त यांनी ‘देवकी नंदन गोपाला ‘ हा चित्रपटातून गाडगे महारांजाच्या जीवनालेख उघडून दाखविला यात गोपाला गोपाला देवकी आनंदान गोपाला (मन्नाडे) आणि विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (पं भीमसेन जोशी ) या दिग्गजांनी गायलेली गाणी होती. संगीत राम कदम यांचे होते.

अलीकडच्या काळात पंढरपूर आणि वारी यावर थेट चित्रपट येत नसले तरी चित्रपटाच्या कथानकात याचा वापर केला जातो. लई भारी , एलिझाबेथ एकादशी, वारी या चित्रपटातून नवीन पिढीला देखील या समृध्द वारशाचे दर्शन घडवते .

चित्रपटात आणि चित्रपटाच्या बाहेर संतांच्या अभंगाचा अतिशय सुरेल वापर केलेला दिसतो. मंगेशकर कुटुंबीयांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या रचना रसिकांसमोर आणून अमृतानुभव दिला. 

या शिवाय नको देवराया अंत असा पाहू (संत कान्होपात्रा), निर्गुणाच्या भेटी आलो सगुनासंगे, निर्गुणाचा संग धरीला जो आवडी (संत गोरा कुंभार),अबीर गुलाल उधळीत रंग, सुखाचे हे नाम आवडीने गावे (संत चोखा मेळा),देवा तुझा मी सोनार (संत नरहरी सोनार),योगी पावन मनाचा (संत मुक्ताई) कांदा मुळा भाजी (संत सावता माळी), अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग (संत सोयराबाई) हरी भजनाविण काळ घालवू नको रे (संत सोहिरोबानाथ)अजि मी ब्रम्ह पाहिले (संत अमृतराय महाराज)देह शुध्द करोनी,काया हि पंढरी आत्मा हा (संत एकनाथ) रात्र काळी घागर काळी, काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती (संत नामदेव) या संत वाणी ला जनमानसात मोठं मानाचं स्थान आहे. 

आपल्या कवी आणि गीतकारांनी यांच्या रचनांमधून संताचे दर्शन घडते. विशेषतः गदिमांनी कितीतरी अप्रतिम भक्ती गीते दिली आहेत.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.