गंगा नदी वाचविण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेला संत !

भारतीयांसाठी गंगेचं स्थान हे कोणत्याही देवी देवतेपेक्षाही मोठे आहे. करोडो लोकांची ती जीवनदायिनी आहे. लाखो शेतकरी आजही तिच्या पाण्यावर अवलंबून आहेत. यामुळेच की काय गंगेला पुराणात पावित्र्याचं प्रतिक मानलं गेलंय. असं म्हणतात की हजारो पिढ्याचं पाप आपल्या शिरावर घेऊन ती वाहत आहे. कायम तिच्या तिरावर आपले पाप धुण्यासाठी आपण डुबकी मारत असतो. आजही आपलं आणखी  एक पाप गंगेला अर्पण केलंय. एका संताच्या हत्येचं पाप.

स्वामी ज्ञानस्वरूप सानंद असं त्यांचं नाव.

८६ वर्षाचे स्वामी ज्ञानस्वरूप यावर्षीच्या २२ जूनपासून गंगेच्या शुद्धिकरणाची मागणी करत उपोषणाला बसले होते. तब्बल ११२ दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचे निधन झाले. हा नैसर्गिक मृत्यू नसून ही  हत्याच आहे आणि या हत्येला सरकारसह आपण सगळेच जबाबदार आहोत.

स्वामींचं पूर्वाश्रमीचं नाव प्रा.जी.डी.अगरवाल. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. आयआयटी रुरकी येथून त्यांनी सिव्हील इंजिनिअरींगची डिग्री पूर्ण केली. त्यानंतर उत्तरप्रदेश पाटबंधारे खात्यात नोकरीला लागले. अमेरिकेच्या कॅलीफोर्निया विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट मिळवली. पुढे आयआयटी कानपूरमध्ये सिव्हील आणि पर्यावरण विभागाचे विभागप्रमुख अनेक वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. निवृत्तीनंतर त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काम देखील पाहिलं होतं.

gd agarwal
प्रा. जी. डी. अग्रवाल

विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक तर ते होतेच पण त्याशिवाय ‘पर्यावरणशास्त्राचे भीष्म पितामह’ अशीही त्यांची ओळख बनली होती. आपल्या दैनंदिन आयुष्यात अतिशय मर्यादित गरजा ठेवून जीवन व्यतीत करत असताना गांधीवाद फक्त पाठ्य पुस्तकापुरता न ठेवता ते जीवनमूल्य आहे, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. संपूर्ण हयातीत पर्यावरण संरक्षणाचा वसा त्यांनी घेतला होता.

२०११ साली त्यांनी संन्यास घेतला आणि गंगा शुद्धीकरण या एकमेव ध्यासाने त्यांना झपाटले. फक्त भावनिकतेने नव्हे तर शास्त्रीयदृष्ट्या प्रदूषण रोखून गंगेचे पुनरुज्जीवन कसे करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या पूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारविरुद्ध सुद्धा त्यांनी गंगाप्रश्नावर लढा दिला होता.

स्वामी सानंद यांचं नैतिक बळ किती होतं याचा अंदाज आपल्याला यावरून लावता येईल की भागीरथी नदीच्या काठावर बांधल्या जात असलेल्या ‘लोहारी नागपाला’ प्रकल्पाविरुद्ध जेव्हा त्यांनी रान उठवलं त्यावेळी त्यांच्या उपोषणाला प्रतिसाद देत तत्कालीन सरकारला  हा जवळपास बांधून पूर्ण होत आलेला प्रकल्प बंद करावा लागला होता. गंगोत्री नदी पासून ते उत्तर काशीपर्यंतचा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला होता.

२०१४ साली वाराणसीमध्ये “गंगा मां ने बुलाया है” अशी साद घालून निवडून आलेले नरेंद्र मोदी जेव्हा देशाच्या पंतप्रधानपदावर  विराजमान झाले त्यावेळी तरी  गंगेचा प्रश्न मार्गी लागेल असं स्वामी सानंद यांना वाटलं होतं. कारण मनमोहनसिंग यांच्या सरकारविरोधात ज्यावेळी स्वामी गंगेच्या प्रश्नावर लढत होते त्यावेळी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचा पाठींबा मिळाला होता.

सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजत गाजत “नमामि गंगे” प्रकल्पाची सुरवात करण्यात केली. गंगा जलशुद्धीकरणासाठी वेगळे मंत्रालय स्थापन करून उमा भारतींकडे या मंत्रालयाचा कार्यभार देखील सोपविण्यात आला. मात्र या सगळ्या गोष्टी फक्त दिखाऊ असल्याचं हळूहळू समोर आलं.

“२०१८ सालापर्यंत गंगा शुद्ध झाली  नाही तर जलसमाधी घेईन” ही उमा भारतींनी केलेली भीमथडी घोषणा हवेत विरून गेली आणि गंगेची पूजा करण्याचा ‘इव्हेंट’ फक्त निवडणुकीतील मतांपुरताच राहिला. या सगळ्या घटनाक्रमामुळे व्यथित झालेल्या स्वामीजींनी मोदींच्या नेतृत्वाखालील  सरकारवर या सरकारच्या कार्यकाळात गंगेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचा आरोप केला.

मोठ्या उद्योगपतींना मदत करण्यासाठी गंगेचा व्यावसायिक वापर केला जातोय का, असा खडा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात विचारला. शिवाय या  पत्रांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या  चार प्रमुख मागण्या मांडल्या सरकारसमोर मांडल्या. मात्र त्यांच्या मागण्या मान्य करायचं तर सोडूनच द्या पण त्यांनी पाठवलेल्या कुठल्याही पत्राला उत्तर देण्याचं  सौजन्य देखील आपल्या पंतप्रधानांकडून दाखवलं गेलं नाही.

सरकारने वारंवार केलेल्या दुर्लक्षाला कंटाळून शेवटी या वर्षीच्या २२ जूनला स्वामीजींनी आपल्या मागण्या घेऊन उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. पत्र लिहून या निर्णयाची कल्पना सरकारला देण्यात आली. उपोषणा दरम्यान मोदी सरकार धोका देत असल्याच्या आपल्या आरोपाचा माध्यमांशी बोलताना त्यांनी पुनरुच्चार केला. ‘सरकार जर या प्रश्नाला गांभीर्याने घेणार नसेल तर आपण  नवरात्रीपर्यंत जलत्याग करू आणि दसऱ्याच्यापूर्वी गंगामातेसाठी आपले प्राण अर्पण करू’ असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

एवढं सगळं होत असताना सरकार मात्र ढिम्म होतं.  नाही म्हणायला स्वामीजींची  प्रकृती खालावल्यानंतर केंद्रीय मंत्री उमा भारतींनी त्यांची भेट घेतली मात्र त्यांच्याकडून देखील कुठलही ठोस आश्वासन न मिळाल्याने स्वामीजींचं  उपोषण सुरूच राहीलं.

स्वामीजींनी आधीच दिलेल्या इशाऱ्यानुसार नवरात्र सुरु झाल्यानंतर त्यांनी जलत्याग केला. जलत्याग केल्यानंतर जेव्हा प्रकृती अधिकच खालावली त्यानंतर मात्र पोलिसांनी बळजबरीने त्यांना ऋषिकेश येथील एम्समध्ये भरती केलं. शेवटी काल म्हणजे ११ ऑक्टोबरला रुग्णालयाकडून स्वामीजींचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधानांपासून अनेकांनी ट्वीटरवरून एका ओळीत स्वामीजींना श्रद्धांजली वाहिली. मात्र ते जिवंत असताना त्यांच्या जीवाच्या होरपळीस जबाबदार असलेल्या या नेत्यांनी तेव्हाच या प्रश्नात लक्ष घालून स्वामीजींचे प्राण का वाचवले नाहीत, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. एका म्हातारा संन्याशाचा जीव जाईपर्यंत त्याच्या मागण्यांकडे साधं लक्ष द्यायला देखील आपल्या सत्ताधाऱ्यांकडे वेळ असू नये ही लोकशाहीची चेष्टा म्हणावी लागेल.

गंगेसाठी एखाद्याने आपले प्राण अर्पण करण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी २०११ साली देखील स्वामी निगमानंद यांनी सुद्धा याच कारणासाठी उपोषण करून प्राण त्याग केले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील तत्कालीन उत्तराखंड राज्य सरकारने स्वामी निगमानंद यांच्यावर विषप्रयोग करून त्यांची हत्या घडवल्याचा आरोप देखील त्यावेळी सरकारवर झाला होता. निगमानंद स्वामींच्या मृत्यूनंतर देखील ही चळवळ  थांबली नाही तर स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांच्या रुपात जिवंत राहिली.

समाज म्हणून या प्रकरणात आपणही दोषी आहोत.

समाज म्हणून जलप्रदूषणाच्या प्रश्नावर आपण देखील किती गंभीर आहोत, हा प्रश्न एकवार आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारला पाहिजे. गंगा असेल काय किंवा आपल्या आसपासची इतर कुठलीही नदी असेल तर तिच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तीच गंगेला वाचविण्यासाठी शहिद झालेल्या या कर्मयोग्याला खरी श्रद्धांजली ठरेल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.