तेंडुलकर कांबळीच्या शाळेतल्या दोस्ताने रणजी गाजवली पण देशासाठी चमक दाखवू शकला नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमधून खेळून अनेक प्लेअर संघात सिलेक्ट होतात. त्यांचं स्थानिक क्रिकेटमधील प्रदर्शन हे जितकं चांगलं तितकं त्यांच्यावर निवड समितीच लक्ष असतं. आजचा किस्सा आहे भारतीय डोमेस्टिक क्रिकेटचा जायंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईराज बहुतुलेचा.

अस्सल मराठमोळा हा खेळाडू भारतीय संघाकडून दीर्घकाळ भलेही खेळू शकला नाही मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा होता.

६ जानेवारी १९७३ रोजी साईराज बहुतुले यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील वसंत बहुतुले हे सुद्धा क्रिकेटर होते. १९५३ साली महाराष्ट्र प्रांताकडून ते २ मॅचेस खेळलेले होते. मधू रेगे यांच्यासोबत ते ओपनर म्हणून बॅटिंग करायचे. साईराज बहुतुले यांनाही लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. 

साईराज बहुतुले हे त्या बॉलर्सपैकी एक होते ज्यावेळी सेंट झेवियर शाळेविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप १९८८च्या हॅरिस शिल्ड इंटरस्कुलमध्ये शारदाश्रम विद्यामंदिरसाठी केली होती.

हि एक मोठी ऐतिहासिक घटना होती. या मॅचमध्ये बहुतुलेंनी २७ ओव्हर बॉलिंग केली आणि १८२ रन दिले होते पण विकेट मिळवू शकले नव्हते.

क्रिकेटमध्ये येण्याअगोदर बहुतुले यांचा एक ऍक्सिडंट झाला होता त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर परतायला त्यांना बराच काळ लागला. अंडर १९ च्या संघात त्यांची निवड झाल्यावर त्यांनी कूच बिहार ट्रॉफीमध्ये बडोदाविरुद्ध पहिला सामना खेळला.

१९९७-९८ च्या सुमारास झालेल्या इराणी ट्रॉफीमध्ये साईराज बहुतुले यांनी कमालीचा खेळ करत भारतीय संघात स्थान पटकावलं.

इराणी ट्रॉफीमध्ये साईराज बहुतुलेंनी ७१ धावा आणि १३ विकेट घेऊन सगळ्यांना चकित केलं होतं. इराणी ट्रॉफीतलं बहुतुले यांचं हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं आणि याच कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघाचं दार खुलं झालं.

रणजी क्रिकेटमध्ये बहुतुले यांची खास चमक होती. ६ वेळा रणजी विजेत्या संघात साईराज बहुतुले होते.

रणजी क्रिकेट करिअरमध्ये साईराज बहुतुले यांनी ४ हजार धावा केल्या आणि तब्बल ४०० विकेट पटकावल्या होत्या. हा रेकॉर्ड करणारे फक्त सुनील जोशी या यादीत होते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बहुतुले बऱ्याच संघांकडून खेळले. महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आसाम, आंध्र हा एक विक्रमच होता. इतक्या संघांकडून खेळणारे ते एकमेव खेळाडू होते.

१९९७ साली साईराज बहुतुले यांनी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. २००१ साली त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला. पण या दोन्ही फॉरमॅटमध्ये साईराज बहुतुले फारसे यशस्वी ठरले नाही.

२ टेस्ट सामन्यांमध्ये त्यांना फक्त ३ विकेट मिळवता आल्या आणि ३९ धावा करता आल्या. ८ वनडेमध्येसुद्धा त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. २ विकेट आणि २३ धावा अशी त्यांची कामगिरी होती.

फर्स्ट क्लास रेकॉर्डमध्ये मात्र ते विशेष खेळाडू होते १८८ सामन्यांमध्ये ६१७६ धावा आणि तब्बल ६३० विकेट अशी त्यांनी सर्वोच्च कामगिरी होती. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना चमक दाखवता आली नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मात्र त्यांचा कुणी हात धरणार नव्हतं. बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. 

२०१३ साली ते क्रिकेटमधून रिटायर झाले आणि २०१४ साली त्यांची नियुक्ती केरळाच्या क्रिकेट टीममध्ये बॉलिंग कोच म्हणून झाली. पुढे २०१५ साली ते बंगाल क्रिकेट टीमचे कोच झाले. साईराज बहुतुले हे खरेखुरे डोमेस्टिक क्रिकेटचे जायंट होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.