चहावाल्याला काँग्रेसने थेट खासदार बनवलं आणि त्याने ८४ च्या दंगलीत धुमाकूळ घातला.

३१ ऑक्टोबर १९८४. भारताच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शरीररक्षकांनी हत्त्या केली. या हत्येमागे अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर केलेल्या लष्करी कारवाईची पार्श्वभूमी होती. ज्यांनी इंदिराजींवर गोळ्या झाडल्या ते बॉडीगार्ड शीख होते. यामुळे शिखांच्या विरुद्ध जनभावना भडकल्या आणि त्याची परिणिती शीख दंगलीमध्ये झाली.

१९८४ च्या शीख दंगली हा भारतीय इतिहासातील काळे पान.

दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात हजारो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गोंधळ घालत आहेत हे दृश्य पाहायला मिळाले होते. सरकारी आकडेवारी सांगते की २७०० शिखांच्या कत्तली करण्यात आल्या. काँग्रेस नेत्यांनी दिल्ली आणि पंजाब पेटवला होता. नवनिर्वाचित पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या या दंगलीचे समर्थन केले होते.

पुढे अनेक वर्ष काँग्रेसच्या मानगुटीवर हे दंगलीचे भूत कायम राहिले. राजीव गांधींच्या पत्नी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या दंगलीची माफी मागितली पण त्याचे पाप कधी धुतले गेले नाही.

या शीख विरोधी दंगलीमध्ये सर्वात प्रमुख नाव येते काँग्रेसचे खासदार सज्जन कुमार यांचं. कोण होते सज्जनकुमार ?

दिल्लीच्या करोल बाग इथे अजमल खान रोड नावाचं एक ठिकाण आहे. शनिवार रविवारी बायका पोरांना घेऊन खरेदी करायची असेल तर दिल्लीकरांची ही हमखास जागा. इथे एक चहावाला असायचा. तगडी उंची, दाढी, एकदम रांगडं व्यक्तिमत्व. त्याच्या पर्सनॅलिटी कडे बघून हा माणूस पहिलवानी करायचं सोडून चहा का विकतोय हा प्रश्न पडावा.

तो होता आणीबाणीच्या सुरवातीचा काळ. इंदिरा गांधींचे धाकटे चिरंजीव संजय गांधी राजकारणात आले होते. जुन्या बड्या धेंडांना हटवून स्वतःची जागा पक्की करायचं त्यांचं लक्ष्य होतं. यासाठी तरुण डॅशिंग कार्यकर्ते त्यांना हवे होते.

असं म्हणतात की चहा पिण्याच्या निमित्ताने संजय गांधींची नजर या हट्ट्याकट्ट्या जाट नौजवानावर पडली. त्याच्या बोलण्यातील आत्मविश्वास, त्याची राजकारणाची समज त्यांना भावली. हा गावाकडचा तरुण आपल्या कामाचा आहे हे संजय गांधींनी तत्काळ ओळखलं. नाव विचारल्यावर तो म्हणाला,

“सज्जन कुमार” 

चहा विकणाऱ्या सज्जन कुमारला युवक काँग्रेसमध्ये पद देण्यात आले. आणीबाणीच्या काळात दिल्लीत झालेल्या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत त्यांचं चहाच दुकान गेलं होतं त्याच्या जागी सज्जन कुमारने एक बेकरी सुरु केली. राजकारणात मात्र वेगाने त्याची प्रगती होत होती. काही दिवसातच दिल्ली नगरपालिकेची निवडणूक लढवून तो नगरसेवक झाला.

नावालाच नगरसेवक पण सज्जन कुमारला संजय गांधींची सावली म्हणून ओळखलं जात होतं. 

संजयच्या युथ ब्रिगेडचे नेते मंत्र्यांना देखील आवरत नव्हते. आणीबाणी इंदिरा गांधींनी लागू केली होती मात्र खरा कारभार संजय गांधी आणि त्याच्या सभोवतीच्या वर्तुळाकडे आलाय अशी दबक्या आवाजात चर्चा होती. सज्जन कुमार या कारभारी वर्तुळात कधीच नव्हते. त्यांचं काम संजय गांधींच्या आदेशाचे रस्त्यावर उतरून पालन करणे.

दिल्ली मध्ये हरियाणा युपी या भागातील जाटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या अस्सल ग्रामीण जाटांवर प्रभाव पाडायला त्यांच्याच भाषेत बोलणारा रांगडा नेता म्हणून संजय गांधी सज्जन कुमार यांच्याकडे पाहत होते. त्यांच्यामुळेच अनेक जाट कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले.

आणीबाणी जेव्हा उठली तेव्हा काँग्रेसचे पानिपत झाले.

खुद्द इंदिरा गांधींचा पराभव झाला. नव्याने पंतप्रधान झालेल्या मोरारजी देसाईंनी काँग्रेस संपवण्याचा विडाच उचलला होता. आणीबाणीच्या सर्व दुष्कृत्याचे खापर संजय गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर आले. बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेस फुटली.

इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये जे काही मोजके कार्यकर्ते होते त्यात संजय गांधींचे निष्ठावन्त सज्जन कुमार हे होते.

अशातच १९८० सालच्या लोकसभा निवडणूका आल्या. सज्जनकुमार यांच्या निष्ठेचं फळ म्हणून त्यांना दिल्लीत थेट लोकसभेचा तिकीट देण्यात आले. तेही दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या चौधरी ब्रम्ह प्रकाश यादव यांच्या विरुद्ध.

ब्रम्हप्रकाश हे देखील एक जाट नेते होते. स्वातंत्रलढ्यापासून काँग्रेसमध्ये असलेले ब्रम्हप्रकाश आणिबाणी नंतर मात्र जनता पार्टीत गेले. तिथे कृषिमंत्रिपद सांभाळलं. दिल्लीत त्यांचा बोलबाला होता. सज्जनकुमारच डिपॉजिट देखील जप्त होईल अशी शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केली होती.

पण सज्जन कुमार यांनी संपूर्ण निवडणूक फिरवून दाखवली.

ब्रम्हप्रकाश यांना हरवण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला. दिल्लीमध्ये सर्वात चमत्कारी निकाल म्हणून सज्जन कुमार यांची देशभरात चर्चा झाली. सज्जनकुमार यांनी या भागात तळागाळात केलेल्या कामाचे त्यांना मिळालेल्या भरघोस मतात रूपांतर झाले.

फक्त सज्जन कुमारच नाही तर काँग्रेसने सगळीकडेच जनता पार्टीचा धुव्वा उडवत कमबॅक केले होते. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. यावेळी मात्र संजय गांधी आणि त्यांच्या युथ ब्रिगेडने गंभीरपणे राजकारण करण्यास सुरवात केली.

पण दुर्दैवाने या निकालाने काही महिन्यातच संजय गांधी यांचा विमान अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी त्यांचे बंधू राजीव गांधी राजकारणात आले. राजीव गांधी यांनी शिकल्या सावरलेल्या नेत्यांना पक्षात आणण्यास सुरवात केली. संजय ब्रिगेडचे महत्व आपोआप कमी झालं. त्यांचा आक्रमकपणा कधीच विझला होता.

अशातच इंदिरा गांधींच्या हत्येची घटना झाली. संजय गांधींचे कार्यकर्ते आपल्या मूळ रूपात आले. त्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर आतंक माजवला. 

असं म्हणतात की सज्जन कुमार आणि जगदीश टायटलर या सगळ्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत होते. सज्जन कुमार यांना दंगलीत पाहिल्याचा अनेकांनी दावा केला होता. त्यांच्यावर सहा जणांच्या खुनाचे आरोप लावण्यात आले.

सज्जन कुमार यांचे ८४च्या दंगलीचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलं.

देशात इतरत्र शिखांच्या मतावर परिणाम होऊ नये म्हणून राजीव गांधी यांनी सज्जन कुमार यांना तिकीट दिले नाही. १९८९ ला देखील त्यांचं तिकीट कापण्यात आलं. सलग दोन निवडणुका हुकल्या तरी सज्जन कुमार यांच्या पक्षातील वजनावर काहीही परिणाम झाला नाही. जाटांच्यात त्यांची लोकप्रियता प्रचंड होती शिवाय संघटनेतील पकडदेखील मजबूत होती.

जेव्हा जनता पार्टीचे सरकार आले तेव्हा त्यांनी १९८४ च्या दंगलीच्या केसेस ओपन केल्या. सज्जनकुमार यांच्या ऑफिस व घरावर सीबीआयचे छापे पडले. गंमत म्हणजे सीबीआय ऑफिसर आता छापा मार्ट होते आणि बाहेर हजारोंचा जमाव गोळा झाला होता.

या भडकलेल्या जाटांनी त्या सीबीआय ऑफिसरना सज्जनकुमारांच्या घरातच बंदी बनवलं. 

सज्जनकुमारना अटक झाली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी या सीबीआय ऑफिसरना सोडलं नाही, त्यांच्याकडचे सगळे पुरावे हिसकावून घेतले. पोलिसांचीही या कार्यकर्त्यासमोर डाळ शिजत नव्हती. अखेर कोर्टाने सज्जन कुमारांना जामीन दिला मगच सीबीआय टीमची सुटका झाली. सज्जन कुमार यांचा दरारा वाढतच चालला होता.

१९९१ साली त्यांना तिकीट मिळाले. यात त्यांनी मोठा विजय मिळवत कमबॅक केले. मात्र पुढच्या पंचवार्षिक मध्ये त्यांचा पहिला पराभव झाला. 

वाजपेयी पंतप्रधान बनल्यापासून सज्जन कुमार यांच्यावर कोर्ट केसचा सिलसिला चालू झाला. त्यांना अटक वगैरे देखील झाली मात्र त्यांची लोकप्रियता कमी झाली नव्हती. २००४ सालच्या निवडणुकीत तब्बल ८ लाखांनी विजय मिळवत त्यांनी विक्रम केला व खासदार बनले. मात्र त्यांच्या खासदारकी वरून खूप वाद झाला.

तेव्हाचे गृहमंत्री पी.चिदम्बरम यांना सज्जन कुमार यांच्या खासदारकीमुळे भर पत्रकार परिषदेमध्ये बुटाचा मार देखील खावा लागला.

यानंतर मात्र काँग्रेसने त्यांना परत कधी तिकीट दिले नाही. त्यांचे भाऊ एकदा खासदार बनले मात्र हळूहळू पक्षाने त्यांच्यापासून आपलं नातं तोडण्यास सुरवात केली. उपयोग संपल्यावर सज्जन कुमार अडगळीत पडले. त्यांच्या राजकारणालाही घरघर लागली.

१७ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली हायकोर्टाने सज्जनकुमार यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली. एकेकाळी काँग्रेस गाजवणारे सज्जन कुमार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. संजय गांधी पर्वाची अखेर झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.