बिहार ते बंगाल एका मराठी माणसाची जयंती साजरी होते पण आपल्याला त्याच नाव माहित नाही

महाराष्ट्रात क्रांतीची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेलं स्वराज्याचे स्फुल्लिंग मराठी मनामनामध्ये कायम तेवत राहिलं. शिवरायांच्या मराठी मावळ्यांनी हेच क्रांतीचे बीज देशभर पसरवलं. भारताचा स्वातंत्र्यलढा देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवणाऱ्यांमध्ये मराठी माणसाचा निश्चित वाटा आहे.

बंगाल पासून ते झारखंड बिहारच्या लोकांना स्वराज्य या शब्दाची ओळख करून देणारा देखील एक मराठी माणूस होता.

सखाराम गणेश देऊस्कर त्यांचं नाव.

१७ डिसेंबर १८६९ साली सखाराम देऊस्कर यांचा जन्म आता झारखंड मध्ये असणाऱ्या करौ नावाच्या गावात झाला. त्यांचं घराणं मूळ कोकणातल्या देऊस गावचे. पेशवाईच्या काळात त्यांचे आजोबा पंडित सदाशिव विठ्ठल देऊस्कर काशीला जाऊन स्थायिक झाले.

पुढे जेव्हा रघुजी भोसलेंच्या नेतृत्वाखालील सैन्याने अलिवर्दी खानाला हरवून बंगाल काबीज केला तेव्हा बंगालची चौथाई गोळा करण्यासाठी कृष्णाजी रायकर नावाचा प्रतिनिधी नेमला होता. एकदा काही कारणामुळे कृष्णाजी रायकरांना बिरभूमच्या बदियुज्जमां खां या सुभेदाराने करौ गावाची जहागिरी दिली. अनेक मराठी कुटुंबे या निमित्ताने बंगाल प्रांतात वसली.

या रायकरांच्या मुलीचे पंडित सदाशिव देऊस्कर यांच्याशी लग्न झालं. लग्नाच्या हुंड्यात रायकरांनी करौ हे गाव सदाशिवरावांना देऊन टाकले. याच सदाशिवरावांचे नातू म्हणजे सखाराम गणेश देऊस्कर.

सखाराम देऊस्कर अवघे पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचं पालनपोषण आत्याने केलं. या आत्याने त्यांना लहानपणी जिजाऊ शिवबाच्या गोष्टी सांगितल्या. आत्याने सांगितलेल्या गोष्टीतून सखाराम देऊस्कर यांना इतिहासाची आणि भाषेची आवड निर्माण झाली.

पुढे ते शिक्षणासाठी बनारसला गेले. तिथे गिद्धौर चे राजा जयमंगल सिंह यांच्या आश्रयाखाली राहून वेदांचा अभ्यास केला. यानंतर त्यांची झारखंडमधील देवघर येथे इंग्रजी शाळेत भरती करण्यात आली. शिक्षण पूर्ण झाल्यावर सखाराम देऊस्कर देवघरमध्येच शिक्षक म्हणून नियुक्त झाले.

त्याकाळी बिहार आणि झारखंड हे प्रदेश बंगाल प्रांताचा भाग होते.

इंग्रजांच्या सत्तेचा कालखंड. देवघर मध्ये मि. हार्ड नावाचा एक इंग्रज मॅजिस्ट्रेट होता. तो प्रचंड अन्यायी होता. शेतकऱ्यांची लूट करून बळजबरीने शेतसारा गोळा करायचा. त्याच्या कारस्थानाविरुद्ध सखाराम देऊस्कर यांनी लेखणी उचलली. बंगाली हितवाद या वर्तमानपत्रातून त्यांनी आवाज उठवला.

त्यांना शिक्षकाच्या नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. सखाराम देऊस्कर या नंतर राजधानी कलकत्त्याला राहायला गेले. तिथे हितवादी वर्तमानपत्राच्या संपादकपदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

हितवादीमधून देऊस्करांचे जळजळीत अग्रलेख वाचून इंग्रज प्रशासनाचा तिळपापड होत असे. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक केसरी मराठा या वर्तमानपत्रातून जे कार्य करत होते तेच कार्य देऊस्कर बंगालमध्ये करत होते. टिळकांप्रमाणेच देउस्करांचे लेख अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा देत होते.

आजही त्यांना बंगालचा टिळक असे ओळखले जाते.

हितवादीचे हिंदी वर्तमानपत्र ‘हितवार्ता’ सुरु करून बिहार झारखंडमधल्या गरीब अशिक्षित लोकांपर्यंत पोहचण्याचे काम देऊस्कर यांच्यामुळे सुरु झाले. तिथे आपल्या हक्काची जाणीव करून दिली. ब्रिटिशांच्या बुरख्याचा पर्दाफाश केला. इंग्लंडच्या राणीचे सरकार हे भारतासाठी इष्टापत्ती आहे असं समजलं जायचं  तो गैरसमज देऊस्कर यांनी खोडून काढला.

त्यांची मराठी, हिंदी,बंगाली,संस्कृत या भाषांवर मजबूत पकड होती. त्यांनी महामति रानडे, झासीर राजकुमार, बाजीराव, आनन्दी बाई , शिवाजीर महत्व, शिवाजीर शिक्षा, शिवाजी, देशेर कथा (परिशिष्ट), कृषकेर सर्वनाश, तिलकेर मोकद्दमा ओ संक्षिप्त जीवन चरित असे अनेक ग्रंथ लिहिले. यात भारतातील इतिहास, धर्म, संस्कृती, मातृभूमीबद्दलचा स्वाभिमान याच्यावर भर दिला.

त्यांनी लिहिलेला देशेर कथा हा ग्रंथ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात महत्वाचा ग्रन्थ मानला जातो.

महान स्वातंत्र्यसेनानी योगी अरविंद घोष एकेठिकाणी असं सांगतात की महाराष्ट्रातील स्वराज्य हि संकल्पना सखाराम देऊस्कर यांच्या देशेर कथा या ग्रंथामुळे बंगालला पहिल्यांदा कळली. क्रांतिकारकांनी भारतात स्वराज्याची मागणी पुढे आणली याला सखाराम देऊस्कर याना श्रेय देण्यात येते. या पुस्तकाचा बाबुराव पराडकर यांनी ‘देश की बात’ नावाने भाषांतर केले.

या ग्रंथाची एवढी लोकप्रियता होती की इंग्रज सरकारने त्याला बंदी आणली. तरीही लपूनछपून देशेर कथाचा प्रसार झाला. शृंगार कथा आणि भद्र संगीतात अडकलेल्या हजारो तरुणांची जनजागृती या पुस्तकाने केली. वंग भंग आंदोलनाला दिशा देण्याचे काम देखील देऊस्कर यांनी केले होते असे सांगितले जाते.

कलकत्ता येथे त्यांच्याच अध्यक्षतेखाली बुद्धिवर्धिनी सभा या संस्थेची स्थापणा झाली. या संस्थेमार्फत युवकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणे, स्वदेशी वस्तूंचा प्रसार करणे, राजकीय शिक्षण असे अनेक कार्यक्रम राबवले गेले.

बिहार झारखंड मध्ये पेटून उठलेले संथाली क्रांतिकारक सखाराम देउस्करांना आपली प्रेरणा मानत. दर दसऱ्याला त्यांच्या करौ येथील घराच्या दारावर पुष्प अर्पण करण्याची परंपरा त्यांनी जपली होती. तिथले दुष्काळग्रस्त शेतकरी आपल्या मागण्या घेऊन देऊस्कर यांच्याजवळच येत.

पुढे सखाराम देऊस्कर प्रकृतीच्या कारणाने आपल्या मूळ गावी करौ येथे परत आले. २३ नोव्हेम्बर १९१२ रोजी त्यांचे निधन झाले. आजही बंगाल आणि झारखंडमध्ये त्यांची जयंती तिथले संथाल लोक साजरी करतात.

करौ या गावी त्यांच्या आठवणीमध्ये शाळा उभारण्यात आली आहे. मागच्या वर्षी त्यांची दिडशेवी जयंती जोरात साजरी करण्यात आली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.