साकीनाका बलात्काराच्या दुर्दैवी घटनेनंतर सरकारने आता हातावर हात ठेऊन बसू नये इतकंच…
साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज या पीडितेचा राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला आहे.
सध्या या प्रकरणामुळे मुंबईसह राज्यभरात आक्रोश केला जात आहे. भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीला याबाबत लक्ष केलं जात आहे. या घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने देखील घेतली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा असं पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे.
काल साकीनाका इथं ही दुर्दैवी घटना घडली होती.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तिथं रक्ताने माखलेल्या आणि बेशुद्धावस्थेमधील महिला निदर्शनास आली होती. त्यानंतर संबंधित महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचं उघड झालं होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवून काही तासांच्या आत यातील संशयितांना इंडियन पिनल कोडच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि ३७६ (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली होती. मात्र घटना उघडकीस आल्यानंतर मुंबईसह राज्यभरातून याबाबत संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की,
याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील.
मात्र आज उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे.
पीडितेच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या,
माफ कर ताई आम्हाला. कोणत्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला.
तर या घटनेवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,
मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम १४४ फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला आहे. वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? असा सवाल करत या नराधमांना फाशीच व्हायला हवी, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
मुंबईतील #साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी आहे…
आज अमरावतीत बलात्कार, पुणे, पिंपरी येथील घटना या महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का लावणार्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत. #Nirbhaya #Sakinaka #MumbaiRape #Mumbai https://t.co/8jPT9CpZU8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2021
तर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं असा संतप्त सवाल राज्य सरकारला केला आहे.
याबाबत सरकारकडून काय सांगण्यात आलं आहे?
या दुर्दैवी घटनेवर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि,
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून यातील गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. सोबतच या संदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन दिले आहे.
We will make sure that the charge-sheet is filed within a given frame of time & the case is fast-tracked to bring the accused to justice: Maharashtra Minister Nawab Malik on Mumbai rape case pic.twitter.com/nj9jD5AwcT
— ANI (@ANI) September 11, 2021
तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले आहेत कि,
मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणात आरोपी अटकेत आहेत पण शक्ती कायदा आणखी कठोर करण्याची गरज असून राज्य सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे.
याबाबत बोल भिडूशी बोलताना सर्वसामान्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पुणे इथं राहणारी एक २४ वर्षीय युवती म्हणाली, घडलेली घटना दुर्दैवी आहे. मागच्या ४ दिवसांमध्ये सातत्यानं राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यात पुण्याच्या ३ घटना आहेत. सरकारने साकीनाका इथल्या पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा.
तर अहमदनगर इथं राहणाऱ्या ३४ वर्षीय महिला म्हणाल्या, सरकारने कोपर्डी प्रकरणातील घटनेप्रमाणे तात्काळ आरोपीना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साकीनाक्याच्या घटनेनंतर देखील सरकारने आता हातावर हात ठेऊन बसू नये इतकीच आमची मागणी आहे.