क्लास ऑफ ८९चे सगळे क्रिकेटर गाजले, फक्त एक जण सिनेमात गेला.

क्रिकेट मध्ये एका सालाला प्रचंड महत्व आहे, १९८९. तुम्ही विचाराल का? तर या वर्षात काही महान खेळाडूंनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सगळ्या जगाचा इतिहास बदलून टाकला. यात होता वंडर बॉय सचिन तेंडुलकर, स्विंगचा बादशहा वकार युनूस, स्फोटक क्रिकेटचा रावण जयसूर्या, तसलाच खतरनाक सईद अन्वर, इंग्लंडचा खत्रूड कप्तान नासिर हुसेन, ऑस्ट्रेलियन कप्तान मार्क टेलर, आपला रॉबिन सिंग, पाकचा मुश्ताक अहमद, यादी खूप मोठी आहे.

या यादीत एक असा प्लेअर होता ज्याने आल्या आल्या इम्रान खानला आउट केलेलं, त्याच्या पहिल्या बॉलला सिक्सर देखील मारलेला पण या महान लोकांच्या एवढी कामगिरी करू शकला नाही. आज तो क्रिकेट पेक्षा त्याच्या फिल्मी करियर साठी जास्त ओळखला जातो.

नाव सलील अंकोला.

अंकोलाचा जन्म सोलापूरला झाला. त्याच कुटुंब मूळचं कर्नाटकातील कारवार भागाचं. तो वाढला महाराष्ट्रात. दिसायला उंचापुरा देखणा होता. शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याची क्रेझ जबरदस्त होती. तो क्रिकेट ग्राउंड वर उतरला की पोरींची गर्दी वाढायची. त्याचा स्टाईलिश रणअप, वेगवान बॉलिंग याचे कित्येकजण फॅन्स होते.

वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या रणजी टीममध्ये निवड झाली. आपल्या पहिल्याच फर्स्ट क्लास सिरीजमध्ये गुजरात विरुद्धच्या मॅचवेळी त्याने एका इनिंगमध्ये चक्क ६ विकेट्स पटकावला यात एका हॅटट्रिकचा समावेश होता. शिवाय त्याने बॅटिंग करताना ४२ धावांची तुफानी इनिंगदेखील खेळली होती.

त्या रणजी सिझनमध्ये त्याने २७ विकेट्स पटकावल्या ज्यात तीन वेळा फाईव्ह विकेट्स चा तो मानकरी ठरला होता. त्याला भारतीय क्रिकेटचा गवसलेला हिरा समजलं गेलं. कपिल देवचा वारसदार अखेर सापडला अशीच सगळीकडे चर्चा होती.

अशातच १९८९ सालचा भारताचा जगप्रसिद्ध पाकिस्तान दौरा आला. जवळपास पाच वर्षांनी भारतीय टीम पाकिस्तानला जाणार होती. आपला के श्रीकांत कप्तान होता तर पाकिस्तानचा सुपरस्टार इम्रान खान त्यांचं नेतृत्व सांभाळलंत होता.

पाकिस्तानची बॉलिंग तेव्हा जगात सर्वोत्तम मानली जायची. वसीम आक्रम आणि इम्रान दोघेही आपल्या करियरच्या पीक पॉइंटवर होते. शिवाय तेव्हाचा नम्बर वन स्पिनर अब्दुल कादिर, तडाखेबाज बॅट्समन जावेद मियांदाद, रमीज राजा वगैरे मुळे पाक टीम आपल्या पेक्षा वरचढ ठरणार होती.

शिवाय त्यांच्या टीम मध्ये वकार युनूस येत होता. असं म्हटलं जायचं कि तो एवढा फास्ट बॉल टाकतो कि कोणाला दिसत देखील नाही. खास वकारच्या डेब्यू साठी म्हणून पाकिस्तानी पिचवर वित्त वीतभर लांबीचे गवत ठेवण्यात आले होते.

या सीरिजसाठी भारतीय निवड समितीने तीन नवीन प्लेयर्स निवडले होते. एक होता मुंबईचा १६ वर्षांचा सचिन, दुसरा होता दिल्लीचा मेडीयम पेसर विवेक राजदान आणि तिसरा महाराष्ट्राचा फास्टर बॉलर सलील अंकोला.

या तिघांनी पाकिस्तानच्या दौऱ्यात पदार्पण केलं मात्र चर्चा १६ वर्षांच्या सचिनची होती. अजून दुधाचे दात न पडलेल्या मुलाला भारतीय टीम वसीम इम्रान वकार च्या तोफखान्यापुढे घेऊन जात होती. त्यांनी देखील सचिनचं स्वागत ‘क्रिकेट सोड आणि जा आईच दूध पी ” अशा स्लेजिंगने केलं होतं.

सराव सामन्यात अंकोलाने सहा विकेट्स घेऊन हवा केली. 

पहिलीच मॅच कराची येथे होती. तुफान पब्लिक गोळा झालेल. प्रचंड दबाव होता. ठरवेलेलं तस पाकिस्तान ने पिचवर भरपूर गवत राखलेलं. त्यांच्या टीमने पहिल्या दिवसापासून भारतावर वर्चस्व राखलं. इम्रान खानने शतक ठोकलं. पहिलीच इनिंग खेळणारे सचिन आणि अंकोला गोंधून गेले होते. सचिनने या मॅच मध्ये फक्त १५ धावा काढल्या तर अंकोलाची भरपूर धुलाई झाली. त्याने दोन्ही इनिंग मध्ये एकेक बळी मिळवले.

कपिलच्या अनुभवी बॉलिंगमुळे आपल्याला ही मॅच ड्रॉ करता आली पण अंकोला दुदैवाने जखमी होऊन टीमच्या बाहेर पडला. पुढच्या तीन ही कसोटी त्याला खेळायला मिळाल्या नाहीत. त्याच्या ऐवजी विवेक राजदानला संधी मिळाली. सचिन देखील फिफ्टी मारून चमकला.

वनडे सिरीज वेळी मात्र अंकोलाला संधी मिळाली. त्याला माहित होतं अभि नहीं तो कभी नहीं. आपल्या पहिल्याच वनडे मध्ये त्याने इम्रान खानला १ धावांवर असताना आउट काढलं. त्या मॅचमध्ये त्याने दोन विकेट्स घेतल्या शिवाय  बॅटिंगला आला तेव्हा भारताला जिंकायला १ ओव्हर मध्ये २५ धावा लागणार होत्या. त्यावेळी सलील अंकोलाने थेट इम्रान खानला तडाखेबाज सिक्स मारून मॅचमध्ये रंगत आणलेली. ती मॅच आपण जिंकू शकलो नाही पण सलील अंकोला हे नाव घराघरात फेमस झालं.

पुढे मात्र त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही.

त्यानंतर कित्येकवेळा असं झालं कि परदेशात टेस्ट सिरीज साठी अंकोला निवडला गेला मात्र प्रत्यक्ष मॅच मध्ये त्याला खेळवलं नाही आणि काही वर्षांनी त्याला एकही मॅच न खेळवता थेट ड्रॉप करून टाकलं. सलील अंकोला हे नाव राखीव मध्ये एवढं कॉमन झालं होतं कि पुढे पुढे काही कॉमेंटेटर यांनी असं ज्या खेळाडूंबरोबर घडतंय त्याला अँकोल्ड होणे असा नवा शब्द शोधून काढला.

नाही म्हणायला त्याला काही वनडे सिरीज मध्ये चान्स मिळाले, साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या फेमस हिरो कप वेळी एका डावात ३३ धावांमध्ये ३ विकेट्स घेऊन अंकोला चमकला. पण कामगिरी मध्ये सातत्य राखणे त्याला जमले नाही.

images 8

१९९६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली होती पण प्रत्यक्ष मॅच तो एकदाच खेळला. या वर्ल्ड कप मध्ये हरल्यावर ज्या खेळाडूंच्या वर त्यांच्या वागणुकीमुळे निवड समितीची कुर्हाड पडली त्या मनोज प्रभाकर, विनोद  कांबळी यांच्या बरोबर सलील अंकोला देखील उगाच टीममधून बाहेर पडला.

परत त्याच नाव भारतीय क्रिकेटमधून दुर्मिळ होत गेलं. आफ्रिकेविरुद्धच्या एका फायनल मॅच मध्ये तर त्याने सात ओव्हर मध्ये पन्नास धाव दिल्या. कुरविला, निलेश कुलकर्णी, साईराज बहुतल वगैरे नव्या दमाचे खेळाडू येत गेले. तेव्हा त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे कायमचे बंद झाले.

त्याच वर्षी एका फर्स्ट क्लास मॅच वेळी सलील अंकोला पडला आणि इंज्युअर्ड झाला. त्यावेळी केलेल्या तपासणीमध्ये लक्षात आलं कि त्याला हाडाचा कॅन्सर झालाय. अंकोलासाठी क्रिकेट संपून गेलं.

वयाच्या २८ व्या वर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली.

क्रिकेटमधील त्याच करियर जरी संपलं असलं तरी संपुर्ण आयुष्य त्याच्यासाठी पडलं होतं. दिसायला देखणा होताच, अंकोलाला ऍक्टिंगचे आणि मॉडेलिंग ऑफर येऊ लागले. काही टीव्ही सिरीयल मध्ये तो चमकला. त्यात यश आल्यावर तिथून त्याने अभिनयाकडेच लक्ष केंद्रित केलं.

गेल्या काही वर्षात त्याने ७ सिनेमांमध्ये काम केलंय. यात सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे संजय दत्त बरोबरचा कुरुक्षेत्र. त्यात त्याने केलेल्या रोलच कौतुक देखील झालं.

छोट्या पडद्यावर तर सलील अंकोला चे दर्शन कायम होऊ लागलं. एकता कपूरच्या कोरा कागज पासून ते सावधान इंडिया पर्यंत आणि विक्राल और गबराल सारख्या सुपरहिरो सिरीयल पासून ते कर्मफळ दाता शनीच्या डॅशिंग सूर्यदेवपर्यंत सगळी कडे तो झळकला. अगदी बिग बॉस, फिअर फॅक्टर, पॉवर कपल अशा अनेक रियालटी शो मध्ये देखील सलील अंकोलाला आपण पाहिलं.

IMG 20210302 074203

मध्यंतरी पहिल्या बायको बरोबर सुरु असलेली घटस्फोट आणि तिची आत्महत्या, काम मिळत नसल्यामुळे आलेलं फ्रस्ट्रेशन, क्रिकेट सोडल्याचं डिप्रेशन अशा अनेक वैयक्तिक समस्यांबरोबर त्याने सामना केला.

२०१० साली बीसीसीआयने त्याच्या मदतीसाठी एक प्रदर्शनीय टी-२० सामना खेळवला. या मॅच मध्ये सचिन, गांगुली, धोनी सारखे दिग्गज खेळाडू होते. स्वतः अंकोला देखील खेळला.  

आता तो सावरला आहे. याच वर्षी त्याचा द पॉवर हा सिनेमा रिलीज झालाय. अभिनयाबरोबरच क्रिकेटमध्ये देखील त्याला संधीचे दार उघडले गेलेत. अंकोला आज मुंबई क्रिकेटच्या निवड समितीचा अध्यक्ष आहे.

१९८९ च्या क्रिकेटचा फेमस बॅचच नाव सांगणारा हा खेळाडू आपल्या मैदानातल्या कामगिरी पेक्षा फिल्मी करियर मुळे ओळखला जातो.

 हे हि वाच भिडू.

 

 

1 Comment
  1. Sachin Katote says

    I miss you Salil

Leave A Reply

Your email address will not be published.