सलीम खान मुख्याध्यापकांना म्हणाले,” सलमानला नाही तुम्ही मला शिक्षा द्या.”

ज्याच्या घरी सलमान खान सारखं पोरग जन्माला येत त्याच्या आईबापाला शेवटपर्यंत जीवाला घोर लागून राहतो. बेणं सुपरस्टार झालंय पण कधी हिरोईन बरोबर लफडी, इतर हिरोच्या बरोबर मारामारी, कधी काळवीटाची शिकार तर कधी फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर गाडी चढवणे अशी कामे करून घोळात अडकताना दिसतो.

सुपरस्टार असूनही जेलमध्ये जाणाऱ्या या लेकराचं वय आता म्हातारपणाकडे झुकलं पण अजूनही त्याच  लग्न पण करेना. याच टेन्शन मध्ये सलीम खान आणि सुशीला उर्फ सलमा खान या जोडप्याची रात्रीची झोप उडाली आहे.

पण हे शुक्लकाष्ठ आता लागलं नाही. लहानपणापासून सल्लू भाई प्रचंड खोडकर होता. रोज त्याच्या खोड्यांमुळे सलीम खान यांना शेजारी पाजारी वगैरे कित्येकांकडून तक्रारी यायच्या.

आज जरी सलीम खान यांच नाव मोठं असलं तरी त्या काळात ते एक स्ट्रगलर अभिनेते होते. सलीम खान मूळचे भोपाळचे. त्यांचे वडील इंदौर संस्थानमध्ये पोलीस सुप्रीटेंडेन्ट होते. सलीम खान यांना पायलट किंवा क्रिकेटर व्हायचं होतं पण योगायोगाने मुंबईच्या फिल्मइंडस्ट्री मध्ये आले. पण मुंबईत त्यांचं बस्तान मात्र काही केल्या बसेना झालं होतं.

सलीम खान यांचं आणि सलमानच्या मम्मीच लग्न म्हणजे पळून जाऊन केलेलं लव्ह मॅरेज होतं. सुशीला आणि सलीम खान यांचा संसार कसाबसा ओढाताण करून चालला होता. अशातच संसारवेली वर सलमान, अरबाज, सोहेल हे फुले लागली होती. पण यश म्हणून काही मिळत नव्हतं. रोज नवनवीन सिनेमे फ्लॉप होत होते.  

तेव्हा देखील ते बांद्रा येथेच राहायला होते. जवळच्याच एका कॅथलिक कॉन्व्हेंट स्कुलमध्ये आपल्या मुलांचं त्यांनी ऍडमिशन केलं होतं. ती शाळा मोठी कडक शिस्तीची होती. पण सलमान सारखा बंडखोर मुलगा तिथे शांत बसेल हे शक्य नव्हतं. तो खोड्या काढायचं कमी करायचा नाही आणि शाळेत देखील नेहमी त्याला शिक्षा होणे थांबायचं नाही. 

एकदा सलीम खान आपल्या कामावरून घरी परतत होते. जाताना सहज त्यांना दिसलं कि सलमानला शालेच्या ग्राउंडवर उन्हात फ्लॅग पोलपाशी उभं केलंय. सलमानचा स्वभाव त्यांना ठाऊक होता. सलीम खान घरी जाण्याऐवजी ते त्याच्या शाळेत गेले. सलीम खान यांनी त्याला विचारलं,

“अब क्या किया तुमने?”

सलमान म्हणाला,

“मुझे पता नहीं पापा, प्रिसिंपल ने मेरा नाम लिया और मुझे क्लास से बाहर इस फ्लैगपोल के पास खड़े होने की सजा दे दी. मैं पूरे दिन से यहां खड़ा हूं.”

सलीम खान यांना आश्चर्य वाटलं. तरीही त्यांना खात्री होतीच कि सलमाननेच काही तरी घोळ घातला असणार. तो तेव्हा चौथी मध्ये होता. इतक्या छोट्या मुलाला दिवसभर शिक्षा दिली जातीय म्हणजे काही तरी मोठी गोष्ट असणार म्हणून ते शाळेच्या प्रिन्सिपलना भेटायला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी चौकशी केली.

प्रिन्सिपलनी सांगितलं कि वारंवार सांगूनही सलमानची शाळेची फी अजून भरली गेलेली नाही. म्हणूनच त्याला शिक्षा दिलीय.

यावर सलीम खान म्हणाले,

“फीस उसे नहीं मुझे भरनी होती है, आपको उस क्लास में ही रहने देना चाहिए. मेरे पास पैसों की काफी दिक्कतें चल रही है. लेकिन मैं फीस भर देता हूं, उसके बाद भी आप सजा देना चाहते हैं तो मुझे दीजिए.”

एवढं बोलून ते गप्प बसले नाहीत तर प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून उठले आणि थेट मैदानात सलमान जिथे उभा होता तिथे गेले. सलमान सांगतो त्या दिवशी ते स्वतःला शिक्षा घेण्यासाठी फ्लॅग पोल पाशी उभे राहिले. त्या शाळेच्या शिक्षकांनी त्यांची माफी मागितली. 

आपल्या गरिबीच्या काळातही असा आदर्शवाद सलीम खान यांनी जपला होता. पण पोराने त्या आदर्शवादाला स्वीकारलं नाही हि गोष्ट वेगळी पण फिल्म इंडस्ट्री मध्ये सलमान सोहेल अरबाज या पोरांवर कितीही टीका झाली तरी सलीम खान यांच्या बद्दलचा आदर कमी झालेला दिसत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.