सलीम जावेद वेगळे कशामुळे झाले ?

ऐंशीच दशक. भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये तेव्हा सलीम जावेद हे नाव खूप मोठ होतं. जंजीर, शोले, दिवार, डॉन, त्रिशूल, शान एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्यांनी लिहिले होते. एखाद्या हिरोप्रमाणे त्यांच्या भोवती वलय होतं. लोक म्हणायचे कि हे दोघे एका पिक्चरसाठी अमिताभ पेक्षाही जास्त पैसे घेतात. आणि ते खरच होतं.

एखादे वेळेस अमिताभचा पिक्चर फ्लॉप होईल पण सलीम जावेदनी लिहिलेला सिनेमा कधीच फ्लॉप होत नाही अशी त्यांची ख्याती झाली होती.

अमिताभला अँग्री यंग मन त्यांनीच बनवलं. भारतात सिनेमाच शुटींग व्हायच्या आधी संपूर्ण स्क्रिप्ट लिहून देणारे त्या काळातले ते एकमेव स्क्रिनप्ले रायटर होते.

दोघांपैकी सलीम खान वयाने मोठे. मुळचे भोपाळचे. वडील पोलीस ऑफिसर होते. घरची परिस्थिती एकदम उत्तम होती. हा दिसायला देखणा. गावात कोणीतरी त्याला सांगितल की मुंबईला जाऊन हिरो हो. त्यात काही जमल नाही मग असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम सुरु केल. अशाच एका सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख जावेद अख्तरशी झाली.

जावेद अख्तर म्हणजे एका बड्या बापाचा बिघडलेला मुलगा. प्रचंड बंडखोर. वडील मोठे उर्दू कवी, सिनेमा गीतकार. गेल्या अनेक पिढ्या त्यांच्या घरात कवितेची परंपरा आहे. त्याच्या आईकडचे देखील सगळे शायर. याने लहानपणीच ठरवल कि आपण कधी गाणी लिहायची नाहीत. त्याला हजारो शायरी पाठ असायची, त्याचा वापर साहीरसारखे मोठे गीतकार करून घ्यायचे पण हा गाणी लिहायचे नाहीत या मतावर ठाम आणि बेरोजगार.

अशातच सलीमशी भेट झाली. गप्पांमध्ये जाणवल कि दोघांची सिनेमाची आवड सेन्सिब्लीटी पशन एकदम जुळते. हॉलीवूडचे सिनेमे बघणारे, पुस्तकाची प्रचंड वाचन करणारे हे दोघे हिदी सिनेमाला बदलायची स्वप्न बघत होते. त्यांना माहित नव्हत कि काही वर्षात ते त्यांच्या हातून घडणार होतं.

सलीम खानने एक सिनेमा लिहायचा प्रयत्न केला होता. ती स्टोरी तो धर्मेंद्रला विकला देखील होता.पण जेव्हा जावेदशी ओळख झाली, त्याच्या कल्पना ऐकल्या तर त्याने स्टोरीत काही बदल केले. स्टोरी फुलवली. हाच पुढे जाऊन भारताच सिनेमाच चित्र बदलवणारा सिनेमा बनला.

त्याच नाव जंजीर.

हा सिनेमा येई पर्यंत कधी कोणी सिनेमाच्या लेखकांच नाव देखील पोस्टरवर लिहित नव्हते. सलीम जावेदनी ते बदलायला लावलं. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याकाळी लेखक घेत होते त्याच्या दसपट मानधन आकारल आणि ते ठोकून घेतल देखील. त्यांचा येणारा प्रत्येक सिनेमा एक नवा विक्रम करत होता.

सलीम जावेदला सिनेमा सुपरहिट करायचा फॉर्म्युला सापडला होता.

त्यांची दोस्ती म्हणजे त्याकाळात एक मिसाल होती. अनेक जणांना माहित देखील नसायचं कि सलीम आणि जावेद दोन वेगळी माणसे आहेत. सगळ्यांना वाटायचं कि ते एकच आहेत. त्यांना एकत्र येऊन जवळपास दहा वर्षे झाली होती.

एकदिवस जावेद अख्तरच्या घरी त्यांचं नेहमीप्रमाणे काम सुरु होतं. ते संपलं आणि जावेद अख्तरनी बोलता बोलता सलीम खान यांच्याकडे एक विषय काढला,

“सेपरेशन”

किती जरी झाल तर जावेद अख्तरच्या रक्तात शायरी होती. त्याने ठरवलेलं कि कधी कविता करायचं नाही तरी कधी ना कधी आत लपलेला शायर जागा होणारच होता आणि तसच झालं. जावेद अख्तरला यश चोप्राच्या सिलसिलाची गाणी लिहिण्याची ऑफर आली.

त्याने तो विषय सलीम खान यांच्या कडे काढला. जावेद अख्तरच्या डोक्यात होतं कि सलीम जावेद या नावाखाली आपण सिनेमाचं स्क्रिप्ट, डायलॉग, गाणी अस पूर्ण पकेज दिग्दर्शकाला द्यायचं आणि तसे पैसे त्याला चार्ज करायचे. सलीम खान त्याला तयार झाले नाहीत.

त्यांचं मत होतं कि मला सिनेमाची गाणी लिहायला येत नाही तर मी त्याच क्रेडीट कां घेऊ? मी स्क्रिप्ट लिहू शकतो आणि त्यात मला मास्टरी आहे. आपण दोघे त्यात काम करतो म्हणून आपल दोघांच नाव एकत्र आहे. जे काम मी करत नाही त्यात माझ नाव तुम्हाला वापरता येणार नाही.

आता वेगळे होण्याशिवाय पर्याय नव्हता. जावेद त्यांना सोडायला दारापर्यंत आले. पण सलीमनी त्यांना परत पाठवलं.

“I will look for myself.”

त्याच दिवशी सलीमजावेद संपून त्याचे सलीम खान आणि जावेद अख्तर यात रुपांतर झाल होतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरची हेड लाईन होती कि सलीम जावेद यांच्यात भांडण.

सलीम खान यांना मोठा धक्का बसला होतं. त्यांना हे सगळ अनपेक्षित होतं. वेगळ झाल्यावरची त्यांची अनेक वर्ष चाचपडत गेली. नाम, जुर्म सारखे जबरदस्त सिनेमे त्यांनी लिहिले मात्र खूप मोठा सुपरहिट त्यांना देता आला नाही. जावेद अख्तर यांचेही वेगळे झाल्यावर स्क्रिप्ट लिहिण्याचे प्रयत्न फसले. पण ते सलीम खान यांच्या पेक्षा १० वर्षांनी तरूण होते. त्यांनी लिरिक्समध्ये चांगला जम बसवला. त्यात त्यांनी नवीन इनिंग सुरु केली.

पुढे काळाच्या ओघात दोघांच्यातील शीतयुद्ध कधीच मागे पडले. त्यांची मुले मोठी झाली. सलीम खान यांना जे यश मिळाल नाही ते त्यांच्या मुलाने करून दाखवलं. सलमान खान इंडस्ट्रीत येऊन सुपरस्टार झाला आणि सलीम खाननी निवृत्ती घेतली.

जावेद अख्तर आजही सिनेमाची गाणी लिहितात. त्यांचा मुलगा फरहान आणि मुलगी झोया हे दोघेही यशस्वी लेखक दिग्दर्शक आहेत. फरहानने तर अभिनय क्षेत्रातही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. या नव्या युगातही आपल्या मुलांच्या सोबत त्यांच्याच एनर्जीने जावेद अख्तर अजून काम करत आहेत.

आज इतके वर्ष झाली. अनेक सिनेमे आले, अनेक स्क्रिप्टरायटर आले. पण सलीम जावेदची जादू परत कोणालाच जमली नाही. त्यांनी भारतीय प्रेक्षकांची जी नस पकडली होती, तो फॉर्म्युला बाकीच्यांना सोडा खुद्द त्यांना स्वतःला देखील रिपीट करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.