तो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला!!

देवदास भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं करुण स्वप्न. प्रत्येक पिढीतील फिल्म मेकरला या शोकांतिकेतील प्रेमाची उत्कटता मोठ्या पडद्यावर दाखवण्याची संधी मिळावी म्हणून तडफडत असतात.

संजय लिला भन्साळीने देखील हे शिव धनुष्य उचलले होते. साल होते 2000.

मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये त्याने भलेमोठे सेट लावले होते. महागडे कॉस्च्युम, उत्कृष्ट तंत्रज्ञ. संजयने महत्वाकांक्षी सिनेमासाठी कुठेही तडजोड केली नव्हती.

त्याच्या सिनेमात देवदास बनला होता शाहरुख खान, माधुरी दीक्षित चंद्रमुखी बनली होती तर ऐश्वर्या राय बनली होती पारो. त्याकाळचे हे सर्वात दिग्गज सुपरस्टार. अभिनयाच्या बाबतीतही त्यांचा हात धरणारा त्याकाळी हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणी नव्हता.

पण देवदास च्या शुटिंगवेळी ऐश्वर्या राय मात्र वैयक्तिक आयुष्यात एका अवघड दुखण्यातून जात होती,
“सलमान खान”

संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनमच्या सेटवरच या दोघांची लव्हस्टोरी फुलली होती. ऐश्वर्याच्या घरच्यांचा विरोध असूनही 2 वर्षे त्यांचं प्रेमप्रकरण चाललं. पण पुढे वेगवेगळे केसेस, सलमानचा रागीटपणा, त्याने केलेली मारहाण यातून ऐश्वर्या त्याच्यापासून दुरावू लागली.

आपलं प्रेम वाचवण्यासाठी सलमान धडपडत होता. पण त्यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागली होती.

ऐश्वर्यासाठी तडफडणारा सलमान गोंधळून गेला होता. स्वतःला विनाशाच्या दिशेने त्याने ढकलून दिले होते, जणू दुसरा देवदास बनला!

देवदासचं शूटिंग सुरू होत तेव्हा ऐश्वर्याला मनवायला सलमान रोज तिथल्या सेटवर हजर राहू लागला. संजय लीला भन्साळी आणि शाहरुख हे दोघेही त्याचे चांगले मित्र असल्यामुळे त्याला कोणी काही म्हणणारं नव्हतं. तो त्यांच्या युनिटचाच एक भाग झाला होता.

ऐश्वर्या शूटिंग मध्ये मग्न असायची आणि सलमान तिच्या मेकअप व्हॅनमध्ये मद्यधुंद अवस्थेत तासनतास पडून राहायचा. रात्र पडल्याचं किंवा पहाट झाल्याचं देखील त्याला भान नसायचं.

एकदा सेटवर ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या एका रोमँटिक सॉंगचं शूटिंग सुरू होतं. त्यात एक सिन होता की पारोच्या पायात काटा घुसला असतो आणि देवदास तो काटा काढून फेकतो.

का कुणास ठाऊक शाहरुखचे त्या दिवशी बरेच रिटेक होत होते. सलमान खान सुद्धा सेटवर हजर होता. त्यानं तो सिन कसा करायचा याचे शाहरुखला धडे द्यायला सुरुवात केली.

सर्वसाधारणपणे कोणत्याही बड्या हिरोला दुसऱ्या नटाने शिकवलेले आवडत नाही पण शाहरुख ला सलमान च्या मनातली खळबळ ठाऊक होती. त्याने विरोध केला नाही.

सलमान ने अत्यंत हळुवारपणे ऐश्वर्याच्या पायातुन काटा काढून दाखवला ! काटा नकली होता पण ऐश्वर्याच्या डोळ्यातुन ओघळलेले अश्रू अस्सल होते!

संजय लीला भन्साळीच्या आदेशावरून सिनेमॅटोग्राफरने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. तो खरोखर ऐतिहासिक क्षण होता. सलमानने इतकी नॅचरल acting कधी पडद्यावर क्वचितच केली असेल.

 

आजही आपण देवदास या सिनेमातील मोरे पिया हे गाणं पाहिलं तर त्यात ऐश्वर्याच्या पायातील काटा काढणारा हात सलमान खानचा आहे.

सलमान आणि ऐश्वर्याने कॅमेऱ्याला दिलेला हा शेवटचा शॉट! यानंतर थोड्याच दिवसात ऐश्वर्याने सलमान खान हे नाव आपल्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकलं.

जेष्ठ सिनेसमीक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान या पुस्तकात हा किस्सा लिहिलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.