सल्लूभाईच्या दाजीची सक्सेस स्टोरी !!

भिडूनो आजवर आम्ही तुम्हाला खूप सक्सेस स्टोरी सांगितल्या. कसा एक गावाकडचा सायकलवरून पाव विकणारा मुलगा ऑडी कारचा मालक झाला, किंवा दहावी नापास माणसाने आयटी कंपनी सुरु केली वगैरे वगैरे. अशीच आम्ही तुम्हाला एक सक्सेस स्टोरी सांगणार आहे.

आयुष शर्मा नावाच्या एका भिडूची सक्सेस स्टोरी.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय मोठा तीर मारलाय या शर्माजी के लडकेने? तर ते ऐकून तुमच्या बत्त्या गुल होतील. सलमान खान तुम्हाला माहीतच आहे. वरचा मजला रिकामा असलेला माणूस. कधी सटकेलं सांगता येत नाही. विवेक ओबेरॉयची त्याने कशी वाजवली हे सगळ्या भारताने अनुभवलेलं. त्याच्या नादाला कोण लागत नाही.

तर हा सल्लूभाई. नावाप्रमाणे भाई. तर त्याच्या बहिणीचा नाद कोण करेल का? तर आपल्या आयुष शर्माने तो केला.

पहिल्यापासून विस्कटून सांगतो जरा धीर धरा. आयुष शर्मा मुळचा हिमाचल प्रदेशचा. त्याचे आजोबा म्हणजे सुप्रसिद्ध राजकारणी सुखराम. तेच सुखराम ज्यांनी भारतात पहिल्यांदा टेलिकॉम घोटाळा केला होतं ते. त्यांना जेल सुद्धा झाली होती. तर हे सुखराम म्हणजे कॉंग्रेसचे वजनदार नेते. त्यांच्या वर घोटाळ्याचे आरोप झाल्यावर पक्षाने काढून टाकल, परत घेतल वगैरे वगैरे

आयुष शर्माचे वडील अनिल शर्मा हे सुद्धा एकेकाळी कॉंग्रेसमध्ये मोठे नेता होते. मग मध्यंतरी ते निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गेले. सध्या त्यांनी घरवापसी केली आहे.

खोबरं तिकड चांगभलं म्हणणाऱ्या शर्मा कुटुंबाचं शेंडेफळ म्हणजे आयुष शर्मा.

जन्मला मंडीमध्ये पण वाढला दिल्लीत. शिक्षण वगैरे तिकडेच झालं. आता तुम्हाला म्हणून सांगतो दिल्ली खूप हरामी लोकांचं गाव आहे,  जानता है मेरा बाप कौन है टाईप डायलॉग गल्लीबोळात मारले जातात. मोठमोठ्या गाड्यातून फिरणारे खिशात रिव्हाल्वर बाळगणारे पहीलवानी जठ्ठ लोकांच्या दिल्लीत वाढलेली पोरं तशीच खमकी होतात.

आयुष शर्मा सुद्धा तसाच खमक्या निघाला.

घरच्या धंद्यात त्याला रस नव्हता. त्याला म्हणे अक्टिंगची आवड होती. त्यासाठी मुंबईला आला. तुमचा बाप दिल्लीत किती जरी मोठा पलिटीशियन असो मुंबईत तुम्हाला चड्डीतच राहायला लागत हे मात्र खर ! आयुषला सुद्धा मुंबईत आल्यावर काय काम मिळाल नाही.(त्याची अक्टिंग बघून अजूनही कोणी दिल नसत) मग स्ट्रगल सुरु झाला.

बापजाद्यापासून चालत आलेला पैसा आणि लोम्डीका दिमाग असल्यामुळे आयुषने आयडिया काय मिळते का चेक करायला सुरवात केली. 

एक दिवस त्याची कुठल्या तरी कॉमन मित्राकडून अर्पिता खानशी ओळख झाली. अर्पिता खान म्हणजे खान कुटुंबातील शेंडेफळ. सलमानच्या सावत्र आईला म्हणजे हेलनला ती रस्त्यावर रडताना सापडली, तिचं मातृहृद्य द्रवल आणि खान कुटुंबाने अर्पिताला दत्तक घेतल. सलीम खान यांनी ठरवलं की हिला वेगळी वागणूक द्यायची नाही.

का कुणास ठाऊक या पोरीवर सगळ्या घराचा जीव जडला. सलीम खान हेलन पासून ते थेट सलमानच्या सख्ख्या आईपर्यंत सगळ्यांची ती गळ्याचा ताईत झाली.

सलमान सगळ्यात मोठा तर अर्पिता सगळ्यात छोटी. ती त्यांच्या घरात आली तो पर्यंत सलमान फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला होता. मैने प्यार कियापासून तर तो सुपरस्टार झाला. अख्खा भारत त्याच्या मागे फिदा. मग काय त्याने आपल्या या बहिणीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून वाढवलं. तिला तिच्या दिसण्यावरून वगैरे कोणी काही म्हटलेलं याला खपायच नाही.

तिच्या मोबाईलच्या बिलाची चर्चा नॅशनल टेलिव्हिजन वर व्हायची.

बालपणापासून चिडक्या असणाऱ्या अर्पिता खानचं कोणाबरोबर लग्न होईल याचीच चिंता तिच्या सगळ्या घरच्यांना होती.

त्यात सल्लू म्हणजे जगाचा भाई. तो एकाही पोराला तिच्या जवळपासही भटकू द्यायचा नाही, काही काळ बोनी कपूर कुलोत्पन्न अर्जुन कपूर सलमानच्या बहिणीबरोबर दिसायचे (सध्या हे महाशय सलमानच्या वहिनीबरोबर म्हणजेच मलायका बरोबर दिसतात. धाडसी फेलो. असो)

पण अर्जुन कपूर सोडला तर अर्पिताच अस काही चक्कर समोर आलं नव्हतं. तर आपल्या आयुष शर्माची आणि तिची ओळख झाली. आता याबद्दल ते जास्त कधी बोलत नाहीत पण आयुष शर्माने मित्रातर्फे सेटिंग लावून आपला घोड पुढ ढकलल असाव.

तर म्हणे सुरवातीला त्यांची ओळख झाली मग मैत्री झाली. पण विषय पुढ जायला लागल्यावर काही तरी घोळ झाला आणि नंतर एक वर्षभर ते एकमेकांनां भेटले सुद्धा नाहीत.

परत भेटले तर  थेट एकमेकांच्या प्रेमात पडले.

अर्पिताला आयुषने कस पटवल हे महत्वाच नाही. खरी स्टोरी पुढ आहे. सलमानला आणि कंपनीला त्याने कस पटवल?

तर अर्पिताने आयुषला टीप दिली. सलमान, अरबाझ आणि सोहेल या तिन्ही भावांमध्ये त्यातल्या त्यात कमी खुंखार म्हणजे धाकटा सोहेल. आयुषने थेट सोहेल ज्या जिम मध्ये व्यायामाला जातो तिथली मेम्बरशिप घेतली. आता तुमच्या पैकी अनेकांना माहित असेल जर पहिलवान माणसाला पटवायचं असेल तर तो रस्ता जिम मधून जातो.

आयुष रोज सज्जन मुलाप्रमाणे जिमला जाऊ लागला. खाली मान घालून डम्बेल्स उचलू लागला. येणाऱ्या जाणार्याला मदत करू लागला. सुरवातीला सोहेलने जिम मध्ये दुर्लक्ष केलं पण नंतर नंतर ओळख झाली, आयुषने आपल्या गोड गोड बोलण्याने सोहेलला इम्प्रेस केलं.

सोहेलला वाटल की पोरग बर आहे, दिसायला क्युट टाईप आहे. आपल्या पुढच्या सिनेमासाठी हिरो म्हणून घेऊ.

त्याने सलमानच्या कानावर ही गोष्ट घातली. माय पंजाबी निकाह नावाच्या पिक्चरसाठी आपल्याला हिरो मिळालाय. सलमानचा आपल्या भावावर विश्वास होता. त्यान पिक्चरच शुटींग सुरु करा म्हणून हिरवा कंदील देखील दिला.

पण काही दिवसांनी कळाल तो मुलगा फक्त हिरो होण्यासाठी नाही तर दाजी होण्यासाठी आला होता.

सलमान रोज उशिरा उठतो. अर्पिताने मौका साधला. आयुषला सकाळी ८.३० वाजता आपल्या घरी आणून बाबासमोर उभा केलं. सल्लूमिया साखरझोपेत होते तोवर त्याच्या बेबीसिस्टरच लगीन ठरल देखील होतं. नंतर उठल्यावर त्याला कळाल. पण वडिलांनी होकार दिला आहे म्हटल्यावर त्याला काही बोलताही येईना, तरी थोडीशी गुरगुर करून तो तयार झाला.

पुढचा खेळ आयुष साठी डाव्या हाताचा मळ होता. त्याने सलमानची चाटून चाटून एकदम लख्ख करून टाकलं. इकडे सोहेलसुद्धा त्याच्या गुणाची, जिम मधल्या कष्टाची तारीफ करत होता. अखेर सलमान पाघळला.

अर्पिता आणि आयुष शर्माच हैदराबादच्या ताज हॉटेलमध्ये रॉयल लग्न लावून देण्यात आल. आज त्या अद्भुत घटनेला पाच वर्ष झाली.

त्यानंतर आयुष शर्माची चंगळ सुरु आहे. सलमानने स्वतः त्याला लव्हयात्री नावाच्या सिनेमातून लॉंच केलं. बाकी त्याचा गरीबांचा टायगर श्रॉफ असणाऱ्या आयुष शर्माचा पिक्चर फ्लॉप झाला तरी त्याच छोगडा तारा च्या रूपाने एक गाण हिट झालं अनी येत्या पाच पंचवीस गरबा मध्ये तरी अजरामर झालं.

सध्या अर्पिता आणि आयुष वंश वृक्षाला एक फळ लागल आणि आणखी काही दिवसात दुसऱ्याची देखील बातमी येईल. आजच सलमानने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. म्हणजे काय अजूनही आयुष साहेबांनी सल्लूला आपल्यावरच प्रेम कमी होऊ दिलेलं नाही. सक्सेस म्हणजे आणखी वेगळं काय ओ? नाही तर कधी त्याच टाळक सटकेलं आणि शिकार होईल सांगता येत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.