जिच्या जीवावर सलमान ऑडिशन द्यायला आला, तिनंच ऐन ऑडिशनवेळी कल्टी मारली होती

सलमान खान आपल्या ॲक्शन, ॲक्टिंग आणि डान्स या त्रिसूत्रीच्या बळावर सुपरस्टार पदापर्यंत जाऊन पोहोचला. पण तुम्हाला माहित आहे का, सलमान खान डान्स करायला आधी खूपच घाबरत होता.

डान्स म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येत होता. पण नंतर सरावानं त्यानं आपल्या नृत्यकौशल्यामध्ये आमुलाग्र प्रगती केली. आज एक चांगला डान्सिंग स्टार म्हणून त्याने लौकिक प्राप्त केला आहे. हा किस्सा आहे त्याच्या पहिल्या सुपरडुपर हिट सिनेमाचा!

१९८८ साली राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमान खानला साईन केले होते. राजश्री करिता हा अतिशय महत्त्वकांक्षी आणि महत्त्वाचा चित्रपट होता. पाच वर्षाच्या गॅपनंतर त्यांचा हा चित्रपट येत होता. सारांश, अबोध या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर त्यांच्या संस्थेचा ‘बाबुल’ हा सिनेमा आला होता आणि अपयशी ठरला होता.  या चित्रपटापासून बडजात्या कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजेच सूरज राजकुमार बडजात्या चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार होते.

सलमान खानला चित्रपटाचा नायक म्हणून नक्की केल्यानंतर दोन दिवसांनी राजश्रीच्या ऑफिसमधून सलमान खानला एक फोन आला. त्यात त्यांनी सलमानला डान्स ऑडिशन करिता बोलावले आणि ही डान्स ऑडिशन जर व्यवस्थित झाली तरच त्याचा नायक म्हणून विचार होईल असे सांगितले! 

डान्स म्हटलं की सलमान खानच्या पोटात गोळा आला! 

कारण डान्स मध्ये तो त्यावेळी खूपच कच्चा खेळाडू होता. पण आता हातात मोठी संधी आली होती आणि ती त्याला कुठलीही परिस्थितीत गमवायची नव्हती, म्हणून त्यानं त्याच्या एक मैत्रिणीला फोन करून सिच्युएशन सांगितली.

तिने सलमानला धीर दिला आणि “घाबरू नकोस मी तुला डान्स शिकवते!” असे सांगितले. 

पुढे काही दिवस सलमान खान रोज तिच्याकडे जाऊन डान्सचा स्टेप्स शिकत होता. चित्रपटाचा जॉनर लक्षात आल्यामुळे पाश्चात्त्य शैलीच्या संगीतावरील डान्स स्टेप्स ती मैत्रीण त्याला शिकवत होती. सलमान देखील हळूहळू आत्मविश्वासाने पावले टाकत होता.

ज्या दिवशी सलमान खान ची डान्स ऑडिशन होती त्यावेळी तो खुपच नर्व्हस झाला होता. त्यामुळे त्याची  मैत्रीण त्याला म्हणाली “डोन्ट वरी मी देखील तुझ्यासोबत येते. त्यामुळे तुला आत्मविश्वास येइल.” ते दोघे राजश्रीच्या ऑफिसमध्ये गेले. तिथून ऑडिशनच्या सेटवर गेले. 

सलमानच्या मैत्रिणीने त्याला हिम्मत दिली. सलमान खानची डान्स ऑडिशन सुरू झाली. सलमान खानने ज्या वेस्टर्न म्युझिकची प्रॅक्टिस केली होती नेमकं त्याच्या विरुद्ध वेगळं म्युझिक सुरु झालं!

सलमान खानसाठी हा खरोखरच अवघड क्वेश्चन पेपर होता. आता तो खूपच घाबरला पण आता पाण्यात पडलोच आहोत तर हातपाय मारुया असे म्हणून त्याने संगीतावर डान्स करायला सुरुवात केली. म्युझिक बीटस आणि त्याला अनुसरून केलेला डान्स हे काही बरोबर होत नव्हतं.

सलमानची मैत्रीण काचेतून सर्व दृश्य पाहत होती. सलमान डान्स स्टेप्स चुकत होत्या, हे तिच्या लक्षात आले “हेची फळ काय मम तपाला” असे म्हणून तिने डोक्याला हात लावला. तिला पाहून सलमान आणखी नर्व्हस होवू लागला.

त्या वेळी त्या मैत्रिणीने सुज्ञ विचार केला. ‘सलमान आपल्याला पाहून आणखी नर्व्हस होतोय आता इथे आपण न थांबणे इष्ट!’ असा सारासार विचार करून तिने त्या सेटवरून काढता पाय घेतला. आता सलमान तिथे एकटाच उरला.

आता मात्र त्याच्या साठी ही निकराची लढाई होती.

त्याने म्युझिककडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ त्याला साजेशा स्टेप्स करायला सुरुवात केली. सूरज बडजात्या आणि त्याची टीम यांना सलमानचा डान्स तेवढा आवडला नाही पण त्याच्यावर मेहनत घेतली तर नक्कीच त्यात प्रगती होईल अशी त्यांना अपेक्षा वाटली आणि कशीबशी सलमाननं डान्स ऑडिशन पूर्ण केली.

संध्याकाळी राजश्रीच्या ऑफिसमधून फोन आला आणि सलमानचे सिलेक्शन झाले असल्याचे सांगितले. सलमानला सेटवर एकट्याने सोडून जाणारी ती मैत्रीण पुढे बॉलीवूडची चांगली कोरिओग्राफर बनली, ती होती फराह खान!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.