घरातले फटाके संपले म्हणून भाईने पैसे पेटवून दिवाळी साजरी केली..

मुलं जेव्हा लाडावलेली असतात, तेव्हा ती काहीशी बेभान असतात. काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची त्यांना जाणीव नसते. अशी मुलं भयंकर मस्ती करतात. घरच्यांना अगदी नाकीनऊ आणतात. आपण नेहमी म्हणतो, की मोठ्या घरची मुलं याबाबतीत फारच उथळ असतात. त्यांना वागण्या – बोलण्याची रित नसते. आणि मुख्य म्हणजे, पैसे कसे खर्च करावेत, याची त्यांना जाणीव नसते.

ही गोष्ट अशाच एका मुलाची. तो मुलगा म्हणजे सलमान खान.

सलमान सध्या ‘बिइंग ह्युमन’ वैगरे संस्था काढून लोकांना आर्थिक मदत जरी करत असला, तरी बालपणी मात्र सलमानला स्वतः पैशांबाबतीत गांभीर्य नव्हतं. बरं, हा दबंग खान इतकी मस्ती करायचा की घरच्यांच्या अगदी नाकीनऊ आणायचा. स्वतः सलमानचे वडील सलीम खान यांनी अनेक मुलाखतीत सलमानच्या खोड्यांचे कारनामे सांगीतले आहेत.

घरात लाडावलेला असल्याने त्याला कोणाचा धाक नव्हता. बालपणी स्वतःच्या दुनियेत वावरणारा हा भाईजान कुटुंबीयांना अगदी सरो की पळो करून सोडायचा.

सलमानच्या बालपणीचा असाच एक किस्सा स्वतः सलीम खान यांनी एका मुलाखतीत सांगितला.

सलीम खान लेखक म्हणून स्थिरस्थावर झाले नव्हते. छोटी मोठी लिखाणाची कामं घेऊन घराला आर्थिक हातभार लावत होते. तर दुसऱ्या बाजूला सलमान अगदीच लहान होता. तुफान मस्ती करायचा. सलमान घरात सगळ्यांचा लाडका त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचं नाही.

यामुळे सलमान जसा आत्ता बिनधास्त वावरतो, तसाच तो बालपणी सुद्धा वागायचा.

दिवाळीचे दिवस होते. सलीम खान काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सलमान घरी होता. सर्वत्र दिवाळीची रोषणाई होती. फटाके वैगरे वाजत होते. या धामधुमीत खान भावंडं मागे कसे राहतील. ते सुद्धा फटाके वाजवून दिवाळी साजरी करत होते.

सलमान सुद्धा भावंडां सोबत दिवाळी उत्साहात साजरी करत होता.

लहान असताना आपल्या सर्वांना आगीचं वेगळंच आकर्षण असतं. मोठेपणी काही माणसं दोन माणसांमध्ये आग लावतात, तो मुद्दा वेगळा. दिवाळीच्या दिवसात कागदांचे अथवा पेपरचे तुकडे घेऊन ते जाळणं हा जणू प्रत्येकाचा छंद असतो.

सलमान खान आणि भावंडं अशाच गोष्टी करत होते.

फटाके संपले म्हणून माचीसने कागदाचे तुकडे पेटवत होते. खान भावंडांच्या आनंदाला उधाण आलं होतं. कागद एवढे जाळले, की आत्ता जाळायला काही शिल्लक राहिलं नाही.

दबंग खान हळव्या मनाचा. त्याला भावंडांचे उतरलेले चेहरे बघवले नाहीत.

जाळायला अजून काही सापडतंय का हे बघण्यासाठी तो घरी आला. त्याला सलीम खानच्या स्टडी टेबलवर काही कागद दिसले. हे कागद कसले आहेत, असा कोणताही विचार न करता ते सर्व कागद घेऊन भाईजान आनंदाने भावंडांपाशी आला. सगळेच लहान आल्याने सलमानने आणलेले कागद कसले आहेत, याची शहानिशा न करता सलमानने ते कागद पेटवले आणि मजा करायला सुरुवात केली.

भावंडं खुश म्हणुन सलमान खुश.

थोड्याच वेळात सलीम खान घरी आले. त्यांनी स्टडी टेबलवर नजर फिरवली तर तिथे काहीच नव्हतं. त्यांना आश्चर्य वाटलं. कारण जाताना त्यांनी ती गोष्ट तिथेच ठेवली होती. मग त्यांना कळालं, की सलमान इथे आला होता. ते त्वरित सलमान जवळ गेले. तेव्हा

त्यांनी समोर बघितलं की सलमान कोणतीतरी कागदं जाळत होता. त्यांनी अगदी निरखून बघितलं, तेव्हा सलीम खान पार उडालेच.

सलमानने सलीम खान यांचे टेबलवर ठेवलेले पैसे जाळले होते.

सलीम खान यांना मिळालेला ७५० रुपयांचा पगार सलमानने आगीत पेटवला होता.

आपण अशी काही कृती केली असती तर वडिलांनी आपल्या कानाखाली फटाके वाजवले असते. पण सलीम खान यांनी वेळ ओळखून सलमानला घरात बोलावलं. आणि त्याला म्हणाले,

“तू आत्ता जे काही कागद जाळलेस, ते माझे पैसे होते. त्या पैशांमुळे आपल्याला दोन वेळचं जेवायला मिळतं. त्यामुळे तू पैशांचं महत्व ओळखलं नाहीस तर आपण उपाशी राहू.”

अशा शब्दांत सलीम खान यांनी शांतपणे सलमानला समजावलं.

याच गोष्टींमुळे आज सलमानचं बाबांसोबत फार छान नातं आहे.

सलमानने वडिलांचं बोलणं किती मनावर घेतलं हे माहीत नाही. कारण मोठेपणी सुध्दा सलमानने अशा काही गोष्टी करून ठेवल्या आहेत, ज्यामुळे सलीम खान यांना निश्चित त्रास झाला असणार. असो ! त्या विषयावर नंतर कधीतरी…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.