सलमान खानचे आजोबा इंदौर मध्ये होळकर संस्थानचे पोलीस प्रमुख होते

२०१० साली दबंग सिनेमा आला आणि सल्लूभाईची सगळी इमेज बदलून गेली.  एकेकाळी ऐश्वर्याच्या प्रेमभंगात वाया गेलेला दर्दी ते काळवीटाची शिकार करणारा, फुटपाथवर झोपलेल्या गरिबांवर गाडी चढवणारा बेदरकार हिरो म्हणून सलमानला ओळखलं जायचं. पण चुलबुल पांडे आला आणि सलमानची गाडी रुळावर आली.

आज सलमानच्या प्रत्येक पिक्चरमध्ये दबंग ऍक्शन असते. निम्म्या सिनेमात तो पोलीस असतो. बिईंग ह्युमन वगैरे त्याची थेरं यामुळे लोकांनी खपवून घेतली. सलमानच्या दबंग ऍक्शनची परंपरा मात्र त्याच्या आज्जा पासून येते.

सलमानची फॅमिली मूळची अफगाणिस्तानची.

हे पश्तुन जमातीचे लढवय्या पठाण. त्याचे पणजोबा अन्वर खान पोटापाण्याची सोय शोधण्यासाठी भारतात आले. भारतात तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं. हा अन्वर खान ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये जॉईन झाला. त्याने इंग्रजांची भाषा शिकून घेतली, पराक्रम गाजवला.

अन्वर खानचा मुलगा म्हणजे अब्दुल रशीद खान. याने मात्र आर्मीच्या ऐवजी पोलीस खात्यात नोकरी मिळवली. १९१५ साली त्यांना होळकर संस्थानच्या पोलीस खात्यात बोलावून घेण्यात आलं. होळकरांची राजधानी इंदौरमध्ये  त्यांची थेट डेप्युटी सुप्रिटेंडट ऑफ पोलीस (डिवायएसपी ) पदी निवड करण्यात आली.

सुरवातीला अब्दुल रशीद खान यांना १०० रुपये पगार होता.

हा पगार त्याकाळच्या मानाने भरपूर होता. तेव्हाचे महाराजा तुकोजीराव होळकर यांचे ते खास विश्वासातील होते. काही वर्षातच त्यांची पदोन्नती होऊन ते डीआयजी म्हणजे डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीस बनले. हे पोलीस खात्यातील दुसरे मोठे पद. इंग्रजांच्या काळात भारतीयांना मिळू शकेल असे हे सर्वोच्च पद होते.

अब्दुल रशीद खान यांचा इंदौर शहरात प्रचंड दरारा होता.

त्यांची स्टाईल एकदम वेगळी होती. ते कधीही रिव्हॉल्व्हर वापरायचे नाहीत. त्यांच्या हातात नेहमी एक दंडुका असायचा. त्याच्या जोरावर मोठमोठ्या गुन्हेगारांना ते चड्डी ओली करायला लावायचे. तगडी उंची पठाणी राकटपणा असलेल्या रशीद खान यांची उघड्या जीपमधून स्वारी निघाली की त्यांना बघूनच अनेक जण गार व्हायचे.

तुकोजीराव यांच्यानंतर होळकरांच्या गादीवर बसलेले स्व. यशवंतराव होळकर यांनी रशीद खान यांच्या पराक्रमावर आणि प्रामाणिकपणावर खुश होऊन त्यांना दिलेर जंग ही मानाची पदवी दिली होती.

या रशीद खान याना चार मुले मोठा हमीद, मग हाफिज, तिसरा नईम आणि सगळ्यात धाकटा सलीम खान. या चारही मुलांना त्यांनी उच्चशिक्षित बनवलं. खान मंडळींचा इंदौरमध्ये एक मोठा वाडा होता.

या वाड्याचीही एक भन्नाट स्टोरी सांगितली जाते.

झालं असं कि इंदौरमध्ये बड़वाली चौकी नावाचा भाग आहे तिथे रशीद खान यांनी एक जुनं घर विकत घेतलं. ते घर पाडून मोठी हवेली बांधायचा त्यांचा विचार होता. असं म्हणतात कि ते घर पाडताना त्यांना मोठा होळकरी खजिना सापडला. तो खजिना त्यांनी सरकारजमा केला. त्याच्या बदल्यात त्यांना मोठा इनाम मिळाला. रशीद खान यांनी ती जागा विकूंन टाकली आणि त्या खजिन्याच्या पैशातून त्याहूनही मोठी हवेली विकत घेतली.

होळकरांचा खजिना रशीद खान यांच्यासाठी लकी ठरला. तिथून पुढे त्यांच्या घराण्याची भरभराट झाली. 

सलीम खान फक्त १४ वर्षांचे असताना रशीद खान यांचा मृत्यू झाला. सलीमच्या काकांनी व मोठ्या भावांनी त्यांचा सांभाळ केला. सलीम खान देखील आपल्या वडिलांप्रमाणे यूपीएससी देऊन आयपीएस ऑफिसर होणार होते मात्र त्यांना क्रिकेटचा नाद लागला आणि अभ्यास मागे पडला. पुढे क्रिकेट देखील सोडलं आणि हिरो व्हायचं म्हणून मुंबईला आले. नशिबाने लेखक बनले. त्यांचं हिरो व्हायचं स्वप्न सलमानने पूर्ण केलं.

सलमान खान देखील जन्मला इंदौर मध्येच. त्याच संपूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे. आजही त्याचे काका तिथल्या जुन्या हवेलीत राहतात. सलमानचे आणि त्याच्या कुटूंबाचे होळकर राजघराण्याशी चांगले संबंध आहेत.

मात्र आज जेव्हा एखाद्या सिनेमाच्या प्रमोशन साठी सलमान इंदौरला जातो तेव्हा आपल्या गावचा मुलगा सुपरस्टार झाला म्हणून त्याच तिथं जोरात स्वागत होतं, कौतुक होतं. पण आजही तिथले जुने लोक म्हणतात,

“सलमान पडद्यावर कितीही उड्या मारू दे खरा दबंग त्याचा आज्जा होता.”

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.