जेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती
सलमान खान फिल्ममध्ये आला त्याची ही गोष्ट.
सुप्रसिद्ध स्क्रिप्टरायटर जोडी सलीम-जावेद पैकी सलीम खान यांचा थोरला मुलगा. त्याने कॉलेज सोडून फिल्म मध्ये करीयर करायचं ठरवलं तेव्हा वडीलांचं लेखक म्हणून करीयर जवळपास संपत आलेलं. स्वभावाने मानी असलेले सलीम खान कोणाच्या दारात माझ्या पोराला सिनेमा मध्ये घ्या म्हणून सांगायला जाणाऱ्या मधले नव्हते.
सलमान छोट्या छोट्या जाहिरातीमध्ये मॉडेलिंग करत करत आपले फोटो घेऊन फिल्मस्टुडिओचे दार झिजवत होता. कुठेच काम मिळत नव्हते.
एक दिवस खार मध्ये एका जेके बिहारी नावाच्या डायरेक्टरला भेटायला तो गेला. फारुख शेख आणि रेखा यांना मुख्यभूमिकेत घेऊन ते एक पिक्चर बनवत होते नाव होत “बिवी हो तो ऐसी”.
ऐंशीच्या दशकात बनणारा टिपिकल सुनेचा छळ टाईपचा हा सिनेमा होता. बिहारीसाहेबाना या फिल्म मध्ये रेखाच्या दिराची भूमिका करणारा कलाकार हवा होता. थोडीशी निगेटिव्ह शेड असणारी हि छोटी भूमिका करायला कोणी कलाकार मिळत नव्हता.
जे के बिहारी सांगतात,
“त्या दिवशी मी अॅक्टर मिळत नाही म्हणून खूप वैतागलो होतो आणि मनाशी ठरवलं आता एखादा गाढव जरी मला भेटायला आला तरी त्याला मी साईन करणार.”
त्या दिवशी सलमान त्यांना भेटला. त्याची कोणतीही स्क्रीनटेस्ट वगैरे न होता त्याला त्यांनी साईन केले. सलमानला मोठ्या पडद्यावर झळकायला मिळते हेच भरपूर होते. तोसुद्धा खुश झाला.
पिक्चरच शुटींग सुरु झालं. इकडे सलमानच मॉडेलिंग सुरूच होत. एकदा त्याने एका चपलेची जाहिरात केली तेव्हा त्याच्या सोबत सहकलाकार होती शबाना दत्ता. शबाना दत्ताला सलमान खूप आवडला. ती सुद्धा स्ट्रगलरच होती.
त्याच दरम्यान राजश्री प्रोडक्शन हाउस नावाच्या नामांकित फिल्मकंपनीमध्ये एका नवीन सिनेमाची जुळवाजुळव सुरु होती.
ताराचंद बडजात्या राजश्री चे मालक होते. एकदम सात्विक निर्मळ सिनेमे बनवणारे म्हणून बडजात्यांची ख्याती होती. त्यांचा बावीस वर्षाचा नातू ‘सुरज’ हा सिनेमा दिग्दर्शित करणार होता. त्याचा हा पहिलाच सिनेमा होता. तरुण दिग्दर्शक त्याचा तसाच फ्रेश अॅप्रोच असल्यामुळे सिनेमामध्ये काम करणारे कलाकार सुद्धा नवीन घ्यायचे असे राजश्रीवाल्यानी ठरवलं होत.
मैने प्यार किया साठी ऑडीशन सुरु झाले. अनेकजन आपली स्क्रीन टेस्ट देऊन जाय होते. यातच होती शबाना दत्त.
शबानाची ऑडिशन काही विशेष झाली नाही पण तिने जाता जाता सुरजला सांगितले,
“सलीम खान यांचा मुलगा सलमान या रोल साठी परफेक्ट आहे.”
सुरजला वाटले सलीम खान चा मुलगा काय आपल्या सिनेमामध्ये काम करणार? तरी त्यांनी शबानाच्या सांगण्यावरून त्याला भेटायला बोलावले.
सलमान राजश्रीच्या ऑफिस मध्ये आला तेव्हा सुरजला तो खूप छोटा वाटला. तेव्हा अंगापिंडाने अगदीच किरकोळ होता. सलमानला सुद्धा आपल्या वयाचा हा मुलगा दिग्दर्शक आहे याच्यावर विश्वासच बसत नव्हता.
सलमानने आपल्या जवळचा फोटो अल्बम त्याला दाखवला. त्याचे फोटो जबरदस्त आले होते. सुरज बडजात्या ते फोटो आवडले. फोटोत तरी देखणा दिसतो . त्याला स्क्रीन टेस्टसाठी काही ओळी देण्यात आल्या. सलमानने कॅमेरासमोर त्या म्हटल्या.
सुरज बडजात्याचा चेहरा खार्र करून उतरला. सलीम खानच्या मुलाला अॅक्टिंग काहीच येत नव्हती. बरेच रिटेक घेण्यात आले. पण त्याचं “क्युं क्युं” असे डायलॉग म्हणन बरंच हास्यास्पद झालं होतं. तसंही सलमान एका फिल्म मध्ये साईड रोल करत होता आणि बडजात्याना या सिनेमासाठी एक फ्रेश चेहरा हवा होता.
सलमानच्या नावावर खाट मारण्यात आली. पण त्याला लगेच नकार सांगण सुरजला जमल नाही. नंतर कळवू असं तो म्हणाला. सलमानला कळालं की याचा अर्थ आपल्या हातून हा सिनेमा गेला.
असेच काही दिवस गेले. सलमान बिवी हो तो ऐसी च्या शुटींग मध्ये बिझी झाला. आपण नाही तर आपले मित्र तरी या बडजात्याच्या सिनेमामध्ये काम करू देत असं त्याला वाटायचं. म्हणून तो आपल्या दीपक तिजोरी, सुनील शेट्टी अशा स्ट्रगलर मित्रांना राजश्रीच्या ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी पाठवून द्यायचा. सुरजला खूप आश्चर्य वाटायचं.
चार महिने झाले. हा खेळ सुरूच होता. एक दिवस सुरज बडजात्या स्वतः सलमानला भेटायला बिवी हो तों ऐसी च्या सेटवर गेला. त्याला बघताच सलमानने धावत येऊन मिठी मारली. तेव्हा भेटल्यावर पण सलमान सुरजला एका चांगल्या कलाकाराचं नाव घेऊन त्याला घेतोस का हे विचारले. आता मात्र हद्द झाली. सुरजने त्यालाच परत एका ऑडिशन साठी बोलावले.
यावेळी सलमान तयारीने आला होता. त्याचे मोठे डोळे निरागस चेहरा हे मैने प्यार कियाच्या रोलसाठी परफेक्ट होते पण यावेळी स्क्रीन टेस्ट वेळी त्याने अॅक्टिंगसुद्धा जोरदार केली. सलमान ला मैने प्यार किया साठी बडजात्यानी साईन केले.
बिवी हो तो ऐसी काही चालला नाही. त्यात सलमानने अतिशय वाईट अभिनय केला होता शिवाय त्याचा आवाज सुद्धा जेके बिहारीनी दुसऱ्याच्या आवाजात डब केला होता. सलमानला वाटले आपल्यामुळे मैने प्यार किया चे नुकसान नको. त्याने शेवटचे सुरजला सांगितले कि दुसऱ्या कोणाला घेतोस का बघ.
पण सुरज आपल्या निर्णयावर ठाम होता,
“मैंने उसकी अॅक्टिंग के लिये नही मगर उसके दिल के बड्डपन के लिये उसको साईन किया”
मैने प्यार किया सुपरहिट झाला आणि या सिनेमाने इतिहास घडवला.
हे ही वाच भिडू.
- बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर सलमान खान एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला हजर झाला !
- या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !
- आमीरसारखां दिसत नाही म्हणून शाहरूखला नकार देणारी जुही.
- मायानगरीत येणारा प्रत्येकजण सुपरस्टार बच्चन होत नाही, काही जण गुरबचन सुद्धा होतात !