छत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी बांधलेल धरण आजही शेतकऱ्यांचा भक्कम आधार बनून उभे आहे

शिवपूर्व काळात महाराष्ट्राला अस्मानी आणि सुलतानी संकटाने ग्रासले होते. वर्षानुवर्षे दुष्काळाने या भागाला पछाडलेलं होतं. त्यातच जे थोडं फार पीक शेतात उगवत होतं ते  आदिलशाही, निजामशाही या शाह्यांचे सैन्य लुटून नेत होते. भीषण पाणी टंचाईने संसाराची , शेतीवाडीची वाताहत झाली होती.

संत ज्ञानोबा यांनी एका अभंगात दुष्काळाचं वर्णन केलं आहे,

“दुष्काळे आटले द्रव्य गेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करता मेली।।

लज्जा वाटे जीवा यासाठी या दुःखे। वेवसाय देखे तुटी आली।।

नगरची वसावी जलाशये निर्मावी। महावने लावावी नाना विविधे ।।”

अशा या अंधकारमय कालखंडात शिवनेरी गडावर जिजाऊच्या उदरी शिवबाचा जन्म झाला.

पुण्याची अवस्था तर या काळात अत्यंत बिकट झाली होती. आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव याने गावावर गाढवाचा नांगर फिरवला होता.लोक परागंदा झाले होते. शेती पडीक झाली होती.

अशातच जिजाऊंनी शिवबांसह पुण्याची जहागीर सांभाळण्यासाठी बंगळूरहुन महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला. ते परत आले तेव्हा पुणे उजाड झाले होते. शिवरायांच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून लोंकाना आत्मविश्वास मिळवून दिला. हळूहळू रयतेचं  गावात आगमन झालं. शेती वाडी होऊ लागली.

शिवराय आणि जिजाऊंसाठी पुण्यात लाल महाल बांधला गेला मात्र त्या अगोदर महाराज खेड शिवापूर येथील वाड्यात वास्तव्यास होते. येथेच त्यांचा बालपणीचा काही काळ व्यतीत झाला होता.

शिवरायांनी बारा मावळातून सवंगडी गोळा केले व रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. 

हे स्वराज्य म्हणजे फक्त स्वतःच राज्य नव्हतं तर हे रयतेच राज्य होत. मांसाहेबांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांनी आपले ध्येय व आपली मूल्ये अगदी लहानपणीच पक्की केली होती. त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आपलेपणातुन कानाकोपऱ्यातल्या खेडोपाड्यातून हजारो तरुण या स्वराज्याच्या महायज्ञात सामील झाले.

छ .शिवाजी महाराजांनी आसपासचे तोरणा, सिंहगड,राजगड, पुरंदर हे किल्ले जिंकून घेतले. फक्त किल्ले जिंकले नाहीत तर त्याच्या आसपासच्या गावातली व्यवस्था नीट केली. प्रजा सुखी तर राजा सुखी या उक्ती अनुसार महाराजांनी जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांचे कल्याण करण्याचे धोरण राबवले.

त्यांना देखील ठाऊक होते हिंदवी स्वराज्याचा खरा आधार शेतकरीच आहेत.

त्यांनी आपल्या आज्ञापत्रात शेती व पाण्याच्या नियोजनाविषयी अनेक आदेश दिलेले वाचायला मिळतात.

नद्या ओढ्यांचे पाणी बंधारे घालून अडवण्याचे निर्णय पिढ्यानपिढ्या शेती ला फायदेशीर ठरले. असं म्हणतात कि शिवरायांनी स्वराज्यात ३२ धरण उभारले. या पैकी पहिले धरण म्हणून खेड -शिवापूरच्या साळोबा धरणाचा उल्लेख केला जातो.

१६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर बांध घालून शिवरायांनी रयतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची सोय केली. या कामी त्यांना शिवापूरच्या  बाबाजी कोंडे देशमुख यांची मदत झाली. 

या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले आहेत.

यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिराजवळून खेड शिवापूरच्या छ. शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून जात. तर डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूरचे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते.

येथे असलेल्या साळोबा मंदिरामुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात.

गेली अनेक वर्षे दुष्काळ पडला तर खेड -शिवपूरच्या नागरिकांना याच पाण्याने जगवलं. अगदी दहा वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात देखील या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले. मध्यंतरी पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही येथील शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाच्या धरणातून येते.

छ. शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दूरदृष्टी दाखवली याचा आज आपल्या पिढीला ही फायदा होत आहे. म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हणतात. अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये राज्यकारभार करतानाही जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नांचा विचार करणारे महाराज वर्तमान कालीन स्थिती मध्ये सुद्धा मार्गदर्शक ठरतात.

अनेक राज्यकर्ते आले गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांना जनता विसरू शकत नाही याला हेच कारण आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.