पुस्तकात १८५७ चा उठाव वाचला पण १८४४ साली महाराष्ट्रात झालेल्या या उठावाची माहितीच नव्हती.

पाठ्यपुस्तकात १८५७ च्या उठावाबाबत इत्यंभूत माहिती आहे. मात्र शिवरायांच्या किल्यांवरुन त्याच्याही अगोदर इंग्रजाविरोधात रणशिंग फुकण्यात आलं होतं याची माहिती नसते.

महाराष्ट्राच खरं धन म्हणजे शिवरायांचे गडकिल्ले. सह्याद्रीच्या रांगामध्ये उभे असलेले या अभेद्यकिल्ल्यांनी स्वराज्याच्या संरक्षणाच काम चोख बजावलं. शिवाजी महाराजांनी राजवाडे बांधले नाहीत, त्यांनी गडकोट उभारले.

ते काळाच्या पुढ पाहणारे द्रष्टे राजे होते. स्वराज्यातील अधिकाऱ्यानी एकदा महाराजांना किल्ल्यावर होणाऱ्या जादा खर्चा बद्दल सवाल केला.

तेव्हा ते म्हणतात,

“आपणास राज्य संपादन करणे आहे. दिल्ली सारखा मोठा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी ३६० वर्षे पाहिजेत. “

महाराजांच हे भाकीत खरं ठरलं. त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब ३ लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. पण सुरवातील संभाजी महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराज आणि ताराराणी बाईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला २५ वर्ष झुंजवल. शेवटी तोच या मातीत गाडला गेला पण त्याला शिवरायांचं स्वराज्य कधी जिंकता आलं नाही.

याच एकमेव कारण म्हणजे मराठा फौजांच शौर्य आणि इथले गडकोट किल्ले.

पुढच्या राज्यकर्त्यांनी या गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं. याचा फटका मराठा रियासतीला बसला. शिवरायांच्या स्वराज्याची सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्यामध्ये छकले झाली.  सत्तासूत्रे पेशवाईच्या ताब्यात आली. त्यांनी शिंदे होळकर यासारख्या सरदारांच्या मदतीने उत्तरेत मोठ्या मोहिमा आखल्या, मोठे विजय मिळवले.

मात्र राज्यातल्या गडकिल्ल्याच्या देखभाली कडे लक्ष पुरवले नाही. किल्ल्याचं महत्व आणखी कमी झालं.

१८१८ साली दुसऱ्या बाजीरावाच्या पराभवानंतर भारतावर इंग्रजांच राज्य सुरु झाल. कोल्हापूर आणि सातारच्या दरबारामध्ये इंग्रज अधिकारी येऊन बसू लागले. त्यांच्या कारभारात हस्तक्षेप सुरु झाला. यावरून अनेकदा खटकेदेखील उडू लागले.

सातारच्या संस्थानात ग्रॅंड डफ या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती.

तेव्हाच्या राजा प्रतापसिंह यांच्या दरबारात त्याने सारा जमा करण्याच्या नव्या पद्धती लागू केल्या. कंपनी सरकारने त्या बाकीच्या मराठी संस्थानामध्ये देखील लागू केल्या. करवीरच्या गादीवर तेव्हा पाचवे शिवाजी होते. ते अल्पवयीन असल्यामूळे इंग्रजांनी दाजी कृष्ण पंडीत या दिवाणाची नेमणूक केली होती.

इंग्रजांनी बळजबरीने केलेल्या या नेमणूकीमुळे करवीर दरबारातील कारभारी आणि राजमाता हे खूष नव्हते. तो एतद्देषीय असला तरी त्याच्यात व करवीर दरबारात छोट्यामोठ्या कुरबुरी सुरु झाल्या.

रयतेमध्ये देखील असंतोष निर्माण होत होता. याची परिणीती पुढे जाऊन बंडा मध्ये झाली.

शिवरायांच्या काळापासून किल्ल्यातील संरक्षणासाठी गडकऱ्याची नेमणूक केलेली असायची.

त्यांना त्या बद्दल तनखे असायचे. त्या त्या किल्ल्याच्या जमिनी या गडकरीना तनख्यासाठी लावून दिलेल्या असतात. इंग्रजांची सत्ता आल्यावर त्यांनी तनख्याची पद्धत बंद केली. गडकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या नाहीत मात्र त्यावरचा शेतसारा जमा करण्याचे आदेश दिले.

करवीर संस्थानातील गडावरील शेतसारा वसुलीसाठी तिथला दिवाण दाजीबा पंडिताने एका मामलेदाराची नेमणूक केली. आता मात्र गडकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. त्यांनी उत्तर पाठवल,

“दाजीबा राजाचा कारभारी. त्यांनी आम्हांपासून वसूल न्यावा. हा मामलेदार आमच्याहून कमी. त्यालाच आमच्या डोक्यावर बसविले. हा आमच्यावर अन्याय आहे. हा आमचा अपमान आहे.”

दाजीबा कारभारी हट्टी होता. त्याने ऐकलं नाही. गडकऱ्यांनी राजमातेकडे देखील तक्रार केली. पण इंग्रजी सत्तेचा अंमल असल्यामुळे त्यांना इच्छा असून देखील गडकऱ्यांची मदत करता येत नव्हते.

सगळे उपाय थकल्यावर गडकऱ्यानी बंड पुकारले. याच नेतृत्व मुंजाप्पा कदम आणि सहकाऱ्यांकडे होते.

याची सुरवात गगनबावडया जवळच्या सामानगडावर झाली. साल होतं १८४४.

दाजीबा कारभाऱ्याने शेतसारा गोळा करण्यासाठी पाठवलेले हुजरे, कारकून, सैनिक यांना सामानगडावर मारहाण करण्यात आली. दाजीबाला याचा राग आला. त्याने गडकऱ्याला किल्ला खाली करायचे आवाहन केले. पण शिवरायांच्या पराक्रमाच रक्त अंगात वाहत असलेल्या स्वाभिमानी गडकऱ्यानी याला नकार दिला.

या बंडखोराना धडा शिकवण्यासाठी दाजीबांनी बेळगाववरून इंग्रजांच सैन्य मागवलं. सुसज्ज कवायती तुकडी कॅप्टन औटरॅम च्या नेतृत्वाखाली सामानगडावर चालून आली. किल्ल्याला वेढा घालण्यात आला. गडकरी तयारीतच होते.

शिवरायांनी विशेष लक्ष देऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला होता. सामानगड मजबूत तर होताच. तो अवघड ठिकाणी असल्यामुळे जिंकणे अशक्य होते. गडकऱ्यानी देखील प्रयत्नाची शर्थ केली. कडाडणाऱ्या मराठी तोफांनी इंग्रजांना भाजून काढले. त्यांची पळताभुई थोडी झाली. दाजीबा कारभारी सुद्धा कोल्हापूरला पळून गेला.

त्याने तिथून गडकर्याना किल्ल्यावरील तोफा खाली आणून सरकारजमा करण्याच्या आदेशाचे खलिते पाठवले. गडकऱ्यांनी त्याला कचऱ्याची टोपली दाखवली.

“या तोफा कैक वर्ष राजाच्या परवानगीने किल्ल्याच्या बुरुजावर खड्या आहेत. त्या तुमच्या अधिकारात आम्ही खाली आणू शकत नाही. “

या बंडाचा वणवा संपूर्ण संस्थानात पसरला. विशाळगडचे लोक यात सामील झाले. चिकोडीचा सरकारी खजिना त्यांनी लुटला. बंडवाल्यांनी दाजीबा पंडिताला पकडले. कोल्हापूर शहराचा ताबा घेतला.

रावजी वाकनीस आणि दिनकरराव गायकवाड यांनी कोल्हापूरात बंडाचा झेंडा उभारला. शहराभोवती रक्षक ठेवून दळणवळणावर नियंत्रण मिळवले.

सुभाना निकम याने ५०० बंडवाल्यांसह बेळगावचा कोल्हापुराशी संपर्क तोडून टाकला. जनता देखील या बंडात सहभागी झाली. बंडवाल्यांनी पन्हाळादेखील ताब्यात घेतला होता. स्वतःच प्रतिसरकार स्थापन करून राज्यकारभार सुरु केला. इंग्रज अधिकाऱ्याना पळवून लावण्यात आले.

अखेर या बंडाचा बिमोड करण्यासाठी कंपनी सरकारने १४ सप्टेंबर १८४४ रोजी मद्रासहून १२०० जणांची सुसज्ज तुकडी पाठवून देली.

यासोबत २०० तोफा देखील होत्या. गडकर्यांनी निकराचा संघर्ष केला. मात्र १३ ऑक्टोबर १८४४ ला त्यांना किल्ला खाली करून द्यावा लागला. या बंडकऱ्याना कोणतीही मदत न मिळाल्यामुळे ठीकठिकाणचे उठाव मोडून काढण्यात अखेर इंग्रजांना यश आले.

मेजर ग्रॅहम नावाचा एक इंग्रज अधिकारी याचा उल्लेख करताना म्हणतो,

“या उठावामागे राष्ट्रीय भावना होती. “

कोल्हापूरच्या गडकऱ्यानी केलेले हे बंड अख्ख्या भारतात इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यालढ्यातली पहिली क्रांती ठरली. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.