दादांच्या सांगलीत कॉंग्रेसला सुरुंग लावणारा पैलवान म्हणजे संभाजीअप्पा…!!

स्वातंत्रपूर्व काळापासून सांगली विधानसभा मतदारसंघात वसंतदादांची हुकूमत एवढी होती की ते देतील तो उमेदवार हमखास निवडून यायचा. त्यामुळे सांगली म्हणजे वसंतदादा आणि वसंतदादा म्हणजे कॉंग्रेस असे समीकरण झाले होते.

अशा या कॉंग्रेसच्या बालेकिल्यामध्ये पहिल्यांदा भगदाड पाडले ते बिजलीमल्ल संभाजी पवार यांनी.

कॉंग्रेसच्या विरोधात आणि तेही दादांच्या हयातीत. हरीपूरच्या नामदेवराव मोहितेंनी विरोध करुन पाहिला पण त्यांना ते जमले नाही. परंतु मारूती चौकातील या पैलवानाने मात्र इतिहास घडवला.

तुमचे एक मत विष्णु अण्णांना पाडू शकते या जॉर्ज फर्नांडिसच्या वाक्याने संपुर्ण मतदारसंघात भूरळ पाडली. आणि विरोधकांबरोबर आख्खी तरुण मंडळी पेटून उठली.

दादांच्या विरोधात ॲग्री यंग मॅन म्हणून तरुणाई संभाजी पवारांच्यात पाहू लागली. आपण स्वत:च संभाजी पवार आहोत असे समजून सर्वांनी निवडणूक हातात घेतली आणि दादांच्या समोर दादांच्या पुतण्याला पराभवाला सामोरे जावे लागले.

कॉंग्रेसकडून अनेक मातब्बर इच्छुक होते. आप्पासाहेब बिरनाळे, केशवराव चौगुले, कवठेपिरानचे हिंदकेसरी मारूती माने यांचा त्यामध्ये समावेश होता. परंतु दादांचे पुतणे शामराव पाटील यांचे चिरंजीव विष्णु अण्णा पाटील यांनी मुंबईतून कॉंग्रेसचे तिकीट खेचून आणले.

दादांच्या हयातीत १९५२ पासून १९८५ पर्यन्त आठ निवडणूकीत दादा किंवा दादांनी उभे केलेले उमेदवारच निवडून आले होते. त्यामुळे येथे कोण उभा राहणार हा प्रश्न होता.

पोटनिवडणूक असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष्य सांगली विधानसभा निवडणूकीकडे होते. विरोधकांनी तत्कालीन नगराध्यक्ष देवीकुमार देसाई यांचे नाव फायनल केले. परंतु देवीकुमारने त्याला विरोध केला. देवीकुमारनी सांगलीचे नगरसेवक संभाजी पवार यांचे नाव विधानसभेसाठी सुचविले. सर्व विरोधी पक्षांचे त्यावर एकमत झाले आणि संभाजी पवारांचे नाव विष्णु अण्णा पाटील यांच्या विरोधात फायनल झाले.

कॉंग्रेस विरोधात सर्व विरोधक असा लढा त्यावेळी झाला. राजारामबापुंच्या तालमीत तयार झालेले संभाजी पवार यांना अनेकजण येवून निवडणूक लढू नकोस असे सांगितले. परंतु लढायचा पिंडच असलेल्या आप्पांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच असा निर्धार केला.

योगायोगाने त्याच दिवशी समाजवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगलीला आले होते. आबासाहेब कुलकर्णी यांच्या घरात संभाजी पवार आणि त्यांचे सहकारी शरद पवारांना भेटले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले. शरद पवारांनी सर्वचक्रे फिरवली आणि सर्व विरोधकांच्या वतीने संभाजी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

सांगली विधानसभा मतदार संघात सांगली, सांगलीवाडी, समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी तुंग, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, कर्नाल, पद्माळ, हरिपूर आदी गावांचा या मतदार संघात समावेश होता. जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसा प्रचारात रंग भरू लागला.

त्यावेळी आचारसंहिता नसल्याने रात्ररात्रभर प्रचार सभा रंगायच्या. विरोधी पक्षाकडून शरद पवार, जॉर्ज फर्नाडिस, मधू दंडवते, मृणाल गोरे यांनी सभा घेतल्या. शरद पवारांनीही तर एका दिवसात सावळवाडी, माळवाडी पासून सांगलीपर्यंत ११ सभा घेतल्या.

रात्री उशीरा सभा संपवून त्यंनी जाता जाता विष्णूअण्णा यांची भेट घेवून तब्येतीला जपा असे सांगून गेले.

दादा राज्यस्थातात असल्याने तेथून ते निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. विष्णुअण्णांच्या बाबतीत अनेकांची नाराजी असल्याने काँग्रेसमधील काही गट संभाजी पवारांचा छुपा प्रचार करू लागले, मिरज पश्चिम भागातील अनेक गावात विरोधी पक्षांच्या नेत्यांना पाहण्यासाठी गर्दी होवू लागली, गर्दीचे रूपांतर समेत होवू लागले.

काँग्रेस हा एकच पक्ष माहित असलेल्या ग्रामीण भागात तरूणांची जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडू लागले. विरोधी पक्षांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. समडोळी येथे शरद पवारांची जंगी सभा झाली.

या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात अनेक युवक नेते घडले. काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यात मोठा संघर्ष झाला. संभाजी पवार यांना ३६ हजार ९७७ तर विष्णु अण्णा यांना ३४ हजार ३४६ मते मिळाली. २६३१ मतांनी जनता पक्षाचे संभाजी पवार आमदार म्हणून निवडून आले.

विष्णुअण्णांचा हा पराभव केवळ त्यांचा नव्हता, केवळ दादांचा नव्हता तर व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारण्याची ताकद तरूणामध्ये जोर धरू लागली. गावागावात प्रस्थापिताविरोधात नवनवे युवक उभे राहू लागले. घराणेशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात सर्वसामान्य माणूसही लढून जिंकू शकतो हे मात्र संभाजी पवारांच्या विजयाने खात्री झाली.

  • दिनेशकुमार ऐतवडे सांगली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.