छ. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची घमेंड जिरवली. त्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला..
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या लाडक्या शहरावर केलेला हल्ला त्याच्या वर्मी बसला होता..
बुऱ्हाणपूर. तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं अतिशय सुंदर शहर. मुघलांच्या गजांतलक्ष्मीचे माहेरघर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोन वेळेस ‘बदसुरत’ केल्यावर मुघलांच्या वैभवाला प्रचंड मोठा धक्का बसला. उरल्या सुरल्या संपत्तीच्या राशी बुऱ्हाणपूरला अजूनही सुरक्षित होत्या. ही वैभवनगरी म्हणजे दक्षिणेचे प्रवेशव्दार. ज्याच्या हाती बुऱ्हाणपूर त्याच्या हाती दख्खन, एवढे सरळ साधे सूत्र होते.
गावातल्या ‘पीरबेन्ना’ मशिदीची कलाकुसर पाहायला त्याकाळी कित्येक लोक बुऱ्हाणपूरला भेट देत असत. या गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोन्या-चांदीच्या तारा एकात एक गुंफून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू. बुऱ्हाणपूरचे कारागीर यात अतिशय प्रशिक्षित होते.
या बुऱ्हाणपूरविषयी सांगण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे, शाहजहानची पत्नी ‘मुमताज बेगम’ चे शव ताजमहलचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ याच गावाच्या मृगउद्यानात ठेवले होते. या सर्व गोष्टींमुळे औरंगजेबासाठी बुऱ्हाणपूर अतिशय प्रिय शहर..
एवढी ही वैभवशाली नगरी. पण एखाद्या वावटळीत पालापाचोळा अगदी भुर्रकन उडून जावा, तशी बुऱ्हाणपूरची धूळधाण झाली. त्याला कारणीभूत होते महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज..
16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती शंभूराजेंचा रायगडावर मोठा दिमाखदार पद्धतीने राज्याभिषेक झाला.
या राज्याभिषेक सोहळ्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी म्हणजे 30 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरची मोहीम हाती घेतली.. राज्यभिषेक झाल्यावर दहा-बारा दिवसात मराठ्यांचा छत्रपती जातीने एखाद्या मोहिमेत सामील होतो, आघाडीवर राहतो ही गोष्टच किती प्रेरणादायी आहे. या संपूर्ण मोहिमेची आखणी संभाजी महाराजांनी जातीने लक्ष देऊन केली होती.
मराठा फौजेचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी वीस हजार फौजेनिशी बुऱ्हाणपूरची वेस गाठली.
गावातल्या नागरिकांना, व्यापाऱ्यांनाच काय तर सैनिकांनासुद्धा मराठ्यांच्या आगमनाची चाहूल लागली नाही. नवाबपुरा, बहादूरपुरा, करणपुरा, खुर्रमपुरा, शहागंजपुरा असे एकूण 17 पुरे गावात होते. यापैकी बबहादूरपुरा सर्वात श्रीमंत व्यक्तींचे निवासस्थान.. सोने, चांदी, हिरे, मोती, माणके, जडजवाहीर, उंची वस्तू, उंची अत्तरे यांसारख्या मौल्यवान वस्तूंच्या व्यापाराचे ठिकाण होते. बहादूरपुरात राहणारे सर्वच सावकार लखपती होते.
मराठ्यांच्या फौजेने या सर्व व्यापारी पुऱ्यांवर अनपेक्षित हल्ला चढवला. सर्वांची मोठी धांदल उडाली. मराठ्यांच्या तडाख्यात मात्र जे कुणी सापडेल त्याचा निकाल लागत असे. सर्व संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली. शंभूछत्रपतींना स्वराज्यवाढीसाठी हे धन कामास आले. बुऱ्हाणपूरची मोहीम यशस्वी ठरली.
बुऱ्हाणपूर पुरते हादरले होते. सर्व मुल्ला-मौलवी, फकीर आणि गावातल्या काही प्रमुख इसमांनी औरंगजेबाकडे पत्र लिहून तक्रार केली, ‘जर काफरांचा जोर असाच होत राहिला तर आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट होईल. यापुढे शुक्रवारचा नमाज बंद पडेल.’
यावर चिडून औरंगजेबाने आपल्या बुऱ्हाणपूरच्या सुभेदारास पत्र लिहिले. त्यात औरंगजेब म्हणतो,
‘दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः दक्षिणेत उतरत आहे.’
एवढेच नव्हे, तर आपल्या मुलाला, शहजादा अकबराला पत्र लिहून औरंगजेब म्हणतो,
“दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे. वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूवरील स्वर्गच होय. बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळच होय..”
औरंगजेबाला हा घाव वर्मी लागला होता. त्याला या धक्क्यातून सावरण्याचा वेळसुद्धा न देता मराठ्यांनी औरंगजेबाला दुसरा जबर धक्का दिला. बुऱ्हाणपूरच्या मोहिमेनंतर काहीच दिवसांनी औरंगाबादची धूळधाण केली. औरंगजेबाच्या नावाने ओळखले जाणारे ते शहर मराठ्यांनी अक्षरशः बेचिराख केले. आता मात्र औरंगजेबासमोर दक्षिणेत उतरण्याशिवाय काहीही पर्याय दिसत नव्हता.
छत्रपती संभाजी राजेंनी अवघ्या दहा-पंधरा दिवसात औरंगजेबाची घमेंड जिरवली होती. त्याच्या साम्राज्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला.. ही तर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीची केवळ सुरुवातच होती.
- भिडू केतन पुरी
हे ही वाच भिडू.
- सुरत हल्ल्यावेळी हजर असणाऱ्या परकीय व्यापाऱ्याने शिवरायांबद्दल बद्दल पहिलं पुस्तक लिहिलं
- संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते
- असा झाला होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.
- नाहीतर आज मुंबईच्या जागी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी झाली असती.