संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य संपणार अशी आशा बाळगणारे अनेकजण आश्चर्यचकित झाले.

खर तर आश्चर्यचकित होण्यापेक्षा ते घाबरले होते. अशीच अवस्था गोव्यातील पोर्तुगीजांची झाली होती.

पोर्तुगीजांचे राज्य स्वराज्याच्या पश्चिम सीमेला लागून होते. वसई, चौल, गोवा, दमण ही ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. शिवाय बहुतांश हिंद महासागरात पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. मराठे आणि पोर्तुगीज यांचे याआधीही खटके उडाले होते. पण ते दरवेळी युद्धाचा प्रसंग टाळून तह करत.

असे असले तरी पोर्तुगीजांचे धोरण दुटप्पी होते. ते स्वराज्याचे शत्रू असलेल्या मुघलांना सर्वोतोपरी मदत करीत होते. पोर्तुगीजांनी मुघलांना आपल्या भागातून मुक्त संचार करण्याची परवानगी दिली होती.

याचा राग संभाजी महाराजांच्या मनात होता.

त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. संभाजीराजांनी १६८२ मध्ये गोव्याजवळील समुद्रात कारवारनजीक असलेले अंजदीव बेट जिंकून घेतले. काही दिवसांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांना घालवून ते बेट आपल्या ताब्यात घेतले. यानंतर संभाजीराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील चौलला वेढा दिला. यानंतर सतत दोन महिने पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या आरमारात झटापटी होत होत्या.

७ नोव्हेंबर १६८३ रोजी पोर्तुगीज व्हीसेरेई (व्हॉईसरॉय) फ्रान्सिको दि ताव्होरा याने मराठ्यांच्या ताब्यातील फोंडा किल्ल्यावर हल्ला केला.

हे समजताच संभाजी महाराज ३००० सैन्यासह राजापूरहून गोव्याला निघाले. ही बातमी कळताच व्हीसेरेईने माघार घेतली. मराठ्यांनी पळून जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ले केले. अखेर १२ नोव्हेंबरला व्हीसेरेई आपल्या उरल्या सुरल्या सैन्यासह गोव्यात परतला.

२४ नोव्हेंबरला संभाजी महाराजांचे सैन्य पोर्तुगीज्यांच्या ताब्यातील सांत एस्तेव्हावं म्हणजेच जुवे बेटावर शिरले.

ओहोटीच्यावेळी येथे पायी जाता येते, हे पाहून रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी व्हीसेरेई आपल्या ४०० सैन्यासह जुवे बेटाचा ताबा घेण्यासाठी आला. मात्र मराठ्यांनी त्याला चांगलाच प्रतिकार केला. यावेळीही व्हीसेरेईने माघार घेतली व तो घाबरून पळू लागला. हे पाहून आधीच घाबरलेल्या त्याच्या सैन्यानेही धूम ठोकली.

मराठ्यांच्या सैन्याने व्हीसेरेईचा पाठलाग सुरू केला. पण नदीजवळ पोचताच पोर्तुगीज सैन्याचे धाबे दणाणले. कारण आता ओहोटी संपून भरती सुरू झाली होती.

पोर्तुगीज सैन्य बोटीतुन जुवे बेटावर उतरले होते. पण  भरतीमुळे या बोटी भरकटुन वाहून गेल्या होत्या.

पाठलाग करणाऱ्या मराठ्यांना घाबरून पोर्तुगीज सैन्याने पाण्यात उड्या मारल्या पण बहुतेक सैनिक बुडून मेले उरलेले कसे बसे गोव्याच्या हद्दीत पोचले. खुद्द व्हिसेरेई जखमी झाला. व्हिसेरेईला पलीकडे नेण्यासाठी छोटी नाव आली होती.

व्हिसेरेई पळताना पाहून खुद्द संभाजी महाराजांनी घोड्यावरून त्याचा पाठलाग सुरू केला.

पण त्याच्याधीच व्हिसेरेई नावेत बसून नदी पार करू लागला. तरीदेखील संभाजीराजांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यांनी व्हिसेरेईच्या पाठोपाठ भरतीच्या पाण्यात आपला घोडा घातला. पण ऐनवेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराजांना अडवले.

इकडे गोव्यात व्हिसेरेई मेला अशी अफवा पसरली आणि सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी व्हिसेरेई कसाबसा गोव्याच्या हद्दीत परतला खरा पण त्याचा उरला सुरला आत्मविश्वास, गुर्मी, माज सगळं सगळं गळून पडलं होतं.

फोटो : पिनाक कल्लोळी (याच पेटीतील सेंट फ्रान्सिस झेवीयरचे थडगे पुन्हा बाहेर काढण्यात आले.)

जीव वाचला याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आता कोणत्याही क्षणी संभाजी नदी पार करून गोव्यावर हल्ला करतील या भीतीने तो आणखीनच गांगरून गेला. संभाजीराजे गोव्यात आले तर तो किंवा त्याचे सैन्य मानसिक अथवा शारीरिक दृष्ट्या लढण्याच्या स्थितीत नव्हते.

अखेर सर्व उपाय संपल्यावर व्हिसेरेईने सध्या ओल्ड गोवा इथे असणाऱ्या बॉम जीजस चर्चकडे धावा घेतला.

या चर्चच्या तळघरात ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेवीयरचे थडगे ठेवण्यात आले होते. व्हिसेरेई चर्चमध्ये गेला आणि त्याने ते शवपेटीत बंद असलेले थडगे पुन्हा उघडायला लावले. थडगे उघडल्यावर त्याने पोर्तुगीजांचा राजदंड त्या प्रेताच्या हातात ठेवला, इतर राजचिन्हे पायात ठेवली तसेच एक कागदही ठेवला.

या कागदावर लिहले होते की पोर्तुगालच्या राजाच्यावतीने त्याने हे राज्य संत फ्रान्सिस झेवीयरला (प्रेताला) अर्पण केले असून काहीतरी चमत्कार करून आम्हाला या संकटापासून वाचवाचे. संभाजीचे संकट टळावे यासाठी प्रार्थनाही करण्यात आल्या. 

योगायोगाने याचवेळी सुमारे १ लाख मुघल सैन्य स्वराज्यावर चालून येत असल्याची बातमी आली. यामुळे गोव्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजीराजे आपल्या सर्व सैन्यासह रायगडला परतले.

फोटो : पिनाक कल्लोळी(ओल्ड गोवा येथील बॉम जिजस चर्च)

या घटनेमुळे पोर्तुगीजांना वाटले की सेंट झेवीयरमुळेच गोवा वाचला. यानंतर सेंट फ्रान्सिस झेवीयरला गोव्याचा साहेब अशी पदवी मिळाली. नंतर आलेल्या सगळ्या व्हेसेरेईने फ्रान्सिस झेवीयरच्या थडग्याकडे जाऊन प्रार्थना करण्याची प्रथाच पडली.

अद्यापही ओल्ड गोवा येथील बॉम जीजस चर्चमध्ये तेव्हा बाहेर काढलेले हे थडगे आणि प्रेत तुम्ही पाहू शकता. स्वराज्याच्या राजान पोर्तुगीजांना पळता भुई थोडी करून सोडली होती.

 –  पिनाक कल्लोळी (गोवा) 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.