शंभुराजांची ही स्वारी यशस्वी झाली असती तर तेंव्हाच गोवा प्रांत महाराष्ट्रात आला असता

छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी, बुद्धीमान, उत्तम सेनानी चारित्र्य संपन्न, उत्तम प्रशासक व प्रतिभावंत लेखक होते. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा जगाच्या इतिहासात आजही प्रेरणादायी आहे.

शंभुराजांनी बालपणापासूनच स्वातंत्र्याचा रणसंग्राम, स्वराज्याच्या सीमा ओलांडून उत्तरेत व दक्षिणेत पोहोचविल्या. शिवाजी राजांच्या मृत्युनंतर स्वपराक्रमावर, बुद्धीमत्तेवर स्वराज्याच्या सीमा चौफेर वाढविल्या. स्वराज्य जननी मावळ खोऱ्यातील पुरंदर गडावर शंभुराजांचा जन्म झाला. राजगड व गुंजन कानंदीच्या दऱ्या खोऱ्यात, शस्त्र, युद्ध, कलेचे प्रशिक्षण घेतले होते. 

सतत ९ वर्षे बलाढ्य मोगल, तसेच पोर्तुगीज, सिद्दी व इतर शत्रुंशी झुंत देताना शेवटी त्यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले.  

ज्यांचे सागरावर वर्चस्व त्यांच्या राजांच्या सीमा दिल्ली यमुना पार करतात. असे शिवाजी महाराज नेहमीच म्हणत असत, 

हे शिवाजी महाराजांचे शब्द संभाजीराजांच्या स्मरणात शेवटपर्यंत होते. स्वराज्याच्या संरक्षणात समुद्रावरील पकड असणे महत्त्वाचे होते. त्यानुसार एके दिवशी त्यांनी आपल्या जहाज बांधणी केंद्रास बाणकोट येथे भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण केले व त्यानुसार अनेक तारव्यातून, राब्यातून शिड्या चढून जाऊन संपूर्ण निरीक्षणे केली. अनेक नवी जहाजे बांधण्यात यावीत, अशा सूचना दिल्या त्यासाठी प्रचंड प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला. 

कल्याण, महाड जैतापूर, राजापूर अशा अनेक ठिकाणी जहाजे बांधण्याचे काम दिवस रात्र चालू होते. तसेच डिचोली व कुडाळ या ठिकाणी नवीन कारखाने उभारले.

संभाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सुरुवातीलाच औरंगजेब बदाशहा प्रचंड साधन सामग्री घेऊन स्वराज्यावर चालून आला. औरंगजेब महाराष्ट्र भूमीवर चालून आल्यामुळे मराठ्यांचा पुरता बिमोड होणार असं सर्वानाच वाटू लागले, त्यातच पोर्तुगीज फारच खुश झाले होते. त्यांना उघड उघड विरोध करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी युक्तीचा उपयोग करून घेण्याचे धोरण अवलंबिले. संभाजी राजांनीही पोर्तुगीज संपूर्ण खुष झाले आहेत म्हणून त्यांना धडा शिकवावा असा बेत रचला. 

चौल परीसरात निळो मोरेश्वर पेशव्यांचे सहा हजार पायदळ आणि दोन हजार घोडेस्वार यांनी आघाडी उघडली आणि गोव्यातील व्हाईसरॉय टाव्होरा व कोंद आलव्होर याला धडा शिकविण्यास स्वत: संभाजीराजे तैनात झाले. आणि याच सुमारास अलव्होर साहेबाला माहिती मिळाली की, मराठ्यांनी जमविलेला पैसा व धनांचा साठा फौंड्याच्या मर्दनगडावर आहे अवघे ६०० मावळे त्या किल्ल्यावर आहेत. ताबडतोब हल्ला करुन पैसातर मिळेलच, परंतु फोंड्याचा गडही ताब्यात मिळेल आणि औरंगजेबही आपल्या पोर्तुगीजावर खुष होईल.

गोव्यापासून तीन किमी असलेल्या या किल्यावर मोठा इतिहास घडला. 

जुलै, ऑगस्ट १६८३ च्या दरम्यान फोंड्याच्या मर्दनगडास पोर्तुगीज सैन्याने वेढा दिला. बऱ्याच पुस्तकात या किल्याला सेंट स्टफिनचा किल्ला असा उल्लेख असला तरी हा सेंट स्टिफनचा किल्ला म्हणजेच कुंभार जुव्याचा किल्लाच आहे. 

संभाजीराजांच्या सैनिकांनी हा किल्ला जिंकला, तेव्हा ३०० जणांची प्रचंड फौज घेऊन आलव्होरने तेथे हल्ला चढविला कारण किल्यामध्ये फक्त चाळीस मराठे सरदार होते. जातांना शेतीचे बांध फोडून त्यांने चोहोकडे पाणीच पाणी करुन टाकले होते. मराठ्यांची कुमक किल्यात पोहचू नये म्हणून हा सगळा खटाटोप त्यांनी केला होता. मराठ्यांनी किल्ला खाली केला, परंतु मराठ्यांची दुसरी ३०० मावळ्यांची टोळी किल्ल्यात घुसली शेतीचे बांध फुटल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते अन मागून स्वतः  संभाजी राजे चालून येत होते.

तीन दिवस गोळीबार चालू होता. एका बुरजांवर लहानसे खिंडार पडले पण गड काही ताब्यात घेणं जमल नाही पाच-सहा दिवसानंतर व्हाईसरायने पुन्हा प्रयत्न केला तेव्हा पाठीमागून संभाजी राजांचं सैन्य आणि पुढे गडावरील मराठ्यांच्या कचाटीत आलव्होरचे सैन्य सापडले. 

मग काय पोर्तुगीजांच सैन्य पळून जाऊ लागले. आलव्होर साहेबांवर अशी नामुष्की आली. आता आपली घटका भरली आहे हे व्हाईसरॉय समजून चुकला, परंतु त्याला आयत्या वेळी एक नौका सापडली आणि डोळ्यांदेखत व्हाईसरॉयने तेथून जीवघेणा पळ काढला.

 हे संभाजीराजांनी पाहिले त्यांनी घोडी तशीच पाण्यात घातली पण घोडे पाण्यात वाहून जाऊ लागले तशी पाण्यात उडी टाकून घोडा धरायला कोणाचीच हिम्मत होईना. एवढ्यात खंडो बल्लाल सरदाराने धप्पदिशी पाण्यात राजांचा घोडे घरण्यासाठी उडी टाकली पाण्याच्या प्रवाहात जाऊन त्याने राजाचे घोडे स्वतःचे प्राण धोक्यात घालून पकडले आणि घोडा किनाऱ्यावर घेऊन आले संभाजीराजे घोड्यासकट बाहेर आले.

गोव्याच्या व्हाईसरॉय बचावला अन तो थेट तेथील चर्चमध्ये पळून गेला. 

भर पावसाळी दिवसात संभाजीराजांनी तळ कोकणात आपली दहशत बसविली.  या लढाईमध्ये शिवरायांचा सवंगडी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक जखमी झाले. जखम बरी न झाल्यामुळे कृष्णाजी कंक मरण पावला. तेव्हा कृष्णाजीच्या ३ वर्षाच्या मुलास संभाजी राजांनी किताब देऊन सरदारकी बहाल केली. वयात येईपर्यंत त्याचा कारभार चाहुजी कंक यांच्याकडे सोपविण्यात आला. 

शंभुराजांची ही स्वारी यशस्वी झाली असती तर, यश पदरी पडले असतं तर, निखळ मराठी भाषिक गोवा प्रांत तेव्हाच महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला असता असं म्हणलं जातं.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.