संभाजी महाराजांच्या विरोधामुळे चर्चेत आलेला मदार मोर्चा शिवकालीन आहे का ?

श्री सकल गुणमंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री दुर्गराज म्हणजे रायगड ! 

सर्व गडांचे राजे दुर्गराज रायगड म्हंटल की डोळ्यासमोर येतं ते स्वराज्य ! शिवरायांनी हे स्वराज्य सुराज्य घडविण्यासाठी अनेकदा जीवाची पर्वा न करता मोहीमा आखल्या. स्वराज्याच्या कामी शिवरायांच्या अनेक सरदार, मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. पण या सगळ्यासमवेत शिवरायांना साथ दिली ती गडकिल्ल्यांनी. 

गडकिल्ले हेच स्वराज्याचे, शिवरायांचे, रयतेचे खरे वैभव होते आणि आहेत. स्वराज्यातील सगळेच किल्ले अतिशय महत्वाचे आहेत परंतु या सगळ्याहूनही अधिक, रायगड किल्ला महाराष्ट्रातल्या मावळ्याच्या मनामनात घर करून आहे. 

अनन्यसाधारण असं महत्व असणाऱ्या आणि प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी जाऊन अवश्य पाहावा असा हा किल्ला. पण आज याच किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी  बेकायदेशीर बांधकामाला बळी पडावं लागलं. 

काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी काही शिवभक्तांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याशी संपर्क साधून झाला प्रकार निदर्शनास आणून दिला. तात्काळ या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली.

पण बऱ्याच शिवभक्तांना इतिहासप्रेमींना प्रश्न पडला असेल तो म्हणजे हा मदार मोर्चा काय विषय आहे ? तर यासाठी किल्ले रायगडचा इतिहास पाहावा लागेल.  

रायगडाला गडांचा गड असे संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये रायरी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि तेव्हापासून रायरीला रायगड असे म्हंटले जाऊ लागले. युरोपातील लोक रायरीला जिब्राल्टर असे म्हणत असत. रायगडाचे भौगोलिक महत्व ओळखूनच शिवरायांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले. रायगड हा किल्ल्यांच्या गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात महाड गावापासून साधारण २४ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांत अभिमानाने उभा आहे.

गडावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाडचा वाडा खास जिजाऊंसाठी बांधला होता. यासोबतच खूबलढा बुरुज, चित्तदरवाजा (ज्याचे सध्या फक्त अवशेष उरले आहेत), नाना दरवाजा (लहान दरवाजा), मदार मोर्चा, धान्यांचे कोठार, तोफा, मदनशाह साधूचे थडगे, महादरवाजा, अनेक भक्कम बुरुज, नगारखाना, कचेऱ्या, जगदीश्वराचे देऊळ, टकमक टोक, हिरकणीचा बुरुज, कुशावर्त तलाव आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजेच शिवरायांची समाधी देखील गडावर आहे.

रायगडाचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे. स्वराज्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा रायगड साक्षीदार राहिला आहे. 

यातल्याच मदार माचीला मशिद मोर्चा, महादेवाचा माळ असं हि म्हणतात. पण हा भाग बऱ्याच काळापासून वादातीत आहे. याविषयी जाणून घेण्यासाठी बोल भिडूने काही ऐतिहासिक दस्तांची चाळणी केली. 

तेव्हा इतिहासात आप्पा परब यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे, 

मदार या शब्दाचा अर्थ आहे मध्यभाग. आणि माची म्हणजे गडाच्या सर्वोच्च भागाखालील बालेकिल्ला. थोडक्यात सपाट भुभाग. रायगडवरील मदार माची हे ठिकाण हे गडाच्या सुरक्षेच्या नजरेतुन अत्यंत महत्वाचे होते. मदार माचीवर पेशवे दफ्तरांतील अप्रत्यक्षित कागदानुसार नागिण, भवानी अन लांडा कसाब ह्या तीन तोफा ठेवलेल्या असत. तो रायगडाचा एक लढाऊ तोफांनी झुंजावयाचा मोर्चा होता.

शिवकाळात मदारमोर्चा ही एक चौकी होती. अन नऊ पाईक अन त्यावरील एक नाईक एवढेच त्यावर राहत होते असे आप्पा परब रायगडचेे स्थलदर्शन मध्ये नमुद करतात. आई सोमजाई अन आई झोलाई तेथील पुर्वाभिमुख देऊळांत विराजमान होती. आत्ता त्या दोन्ही देवतां शिर्काई देवीच्या प्रांगणात स्थित आहेत.

शांताराम विष्णु आवळस्कर यांच्या ‘रायगडच्या जीवनकथेत’ मदार माची विषयी एक संदर्भ सापडतो. तो असा की,

ऑगस्ट १७७३ ला नारायण पेशवे अन यशवंत महादेव पोतनिस यांच्यात रायगडाच्या स्वमित्वपदासाठी लढाई झाली होती. आप्पाजी हरी ह्या पेशव्यांच्या सेनापति बरोबर पोतनिसांचा हवलदार यशंवत मोरे यांची हि लढाई झाली. हि लढाई रायगडवर मदार माची (चौकी), कोंडेखळी अन हिरकणी बुरूज इथं लाडगळी गेली. पेशव्यांकडुन नुर मंहमद बाणदाराने चित्त दरवाजा ताब्यात घेतल्यावर तिथून मदार मोर्चावर पेटते बाण टाकले होते. 

कर्नल प्राँथर १२ मे १८१८ रोजी लिहितो, 

औरंगजेबाच्या निधनानंतर त्याच्या चाकरीतुन मुक्त झालेले दुय्यम श्रेणीतील निराधार अरबी पोटा-पाण्याच्या सोईसाठी पेशव्यांच्या सेवेत आले. किल्ले रायगड पेशव्यांकडे आल्यावर ते अरबी सैन्य पेशव्यांच्या वतीने किल्ले रायगड रक्षिण्या ठेवले गेले. त्यातील तोफखान्यावरील अनुभवी अरबी पाईक मदार मोर्चावर तोपची अन गोलदांज म्हणुन नियुक्त केले गेले.

४ मे ते ६ मे १८१८ ला कर्नल प्राँथरने रायगडावर फिरंगी तोफगोळे बरसावायला सुरुवात केली. पोटल्याच्या डोंगरावरून रायगडाचे बारुदखाने उध्वस्त केले. त्याचे साथीदार लेफ्टनंट रेमण्ड, एन्साएस जाँप, डँश वुड यांनी ब्रिटीशांचा तोफखाना संभाळला. ६ मे १८१८ रोजी लेफ्टनंट रेमण्ड याने मदार मोर्चाचा ऊल्लेख मशिद मोर्चा असा केला. 

यावर युक्तिवाद करताना प्र. के. घाणेकर म्हणतात, 

रेमण्डला प्रतिकार करणारी अरबी सैन्याची ती मदार चौकी होती. युध्दकाळातील अधांधुंद स्थिती पाहता आई सोमजाई अन झोलाईचे प्रांगण रिक्त केलेले होते. त्या रिक्त प्रांगणात ते मुसलमान अरबी सैनिक पाच वेळा नमाज पढत. नेमकी युध्द काळापुर्वी हिच नमाज त्या लेफ्टिनेंट रेमण्डने मदार मोर्चावर ऐकली अन ते नमाज पढणारे अरबी सैनिकसुध्दा पाहिले. म्हणुन त्या मदार मोर्चाला लेफ्टनंट रेमण्डने  मशिद मोर्चा संबोधिले.

१९६२ च्या रायगडची जीवनकथा ह्या ग्रंथात शांताराम विष्णु आवळस्कर ‘रायगडचे दर्शन’ ह्या प्रथम अध्यायात पृष्ठ. ७ वर खालिलप्रमाणे मदार माचीचे वर्णन करतात. 

नाणे दरवाजातुन आत शिरल्यावर एक नागमोडी वाट पाऊण मैलावर एका सपाट माचीवर येऊन पोहचते. येथे २ पडक्या ईमारतींचे जोती आहेत. त्यापैकी एक पहारेकरीची व दुसरी अंबारखान्याची असावी. त्यांची लांबी रुंदी 39×25।। व 75×20 फुट आहे. लेफ्टिनेंट रेमण्डने जो मशिद मोर्चा म्हणुन ऊल्लेख केला तो हाच. शिवाजींनी रायगडावर मुसलमान सैनिंकासाठी जी मशिद बांधवलि होती ती येथेच असावी. असं आवळस्कर म्हणतात. 

आवळस्कर मदार मोर्चावर शिवरायांनी मशिद बांधलि असावी असे लिहीतात परंतु त्यास कोणताच ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. लेफ्ट. रेमण्डचा हवाला देऊन तो मशिद मोर्चा आहे हे नामाभिदान करतात. त्याचप्रमाणे आवळस्कर मदार मोर्चावर मदनशहा नावाच्या एका निजामशाही साधुची कबर माञ येथे असल्याचे ठामपणे सांगतात. 

प्र. के. घाणेकर, आप्पा परब, आवळस्कर असे प्रत्येक इतिहासतज्ञ या मदार मोर्चाविषयी आपले मत मांडताना दिसतात मात्र त्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. 

यासंदर्भात बोल भिडूने इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 

रायगडच्या स्थित्यंतरावर एक नजर टाकली तर, रायगड शिवाजी महाराजांच्या ताब्यात १६५६ रोजी आला. १६९० ला परत औरंगजेबाच्या ताब्यात गेला. औरंगजेबाने रायगडाच इस्लाम गड असं नामकरण केलं. १६९० ते १७३३ हा खूप मोठा स्पॅन आहे, जवळजवळ ४२ वर्ष. हा किल्ला एवढे वर्ष मोगलांच्या ताब्यात राहिला. त्यानंतर हा किल्ला जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात गेला. म्हणजे स्वराज्यनंतर खूप कालावधीसाठी मुस्लिम सत्ताधीशांनी इथं राज्य केलं होत. 

मुस्लिम राजवटीच्या काळात किल्ल्यावर जे काही बांधकाम झालं आहे त्याचे अवशेष आजही किल्ल्यावर सापडतात. 

आणि त्यातलीच मदनशहाची मदार किंवा ती कबर असावी. त्यावेळेपासून म्हणजे १८१८ पासून ती कबर होती याचे एव्हिडन्स आहेत. इंग्रजांच्या ताब्यात रायगड किल्ला आल्यावर किल्ल्याचा इतिहास बघितला तर १८१८ मध्ये पेशव्यांकडून रायगड हा कर्नल प्रॉथरने घेतला. इंग्रज तुकडीचा लेफ्टनंट रेमंडने जेव्हा नोंद केली तेव्हा त्याने त्या ठिकाणी मशीद होती अशी नोंद कुलाबा गॅजेट मध्ये करून ठेवली आहे. 

हे गॅजेट १८८३ छापलं आहे. रेमण्डने लिहिल्याप्रमाणे १८८३ ला त्या ठिकाणी मदनशहा नावाच्या एका साधूची कबर होती. आता कबर १८१८ पासून होती का ? तर होती याचे पुरावे उपलब्ध आहेत. मात्र हि कबर शिवकाळापासून होती का ? हाच संशोधकामधला डिबेटचा मुद्दा आहे. 

सावंत यांच्या म्हणण्याप्रमाणे ती कबर शिवकाळापासून नसावी. कारण शिवकाळात म्हणजेच १६५६ पासून तो किल्ला रॉयल कॅपिटल असल्यानं तिथं जी काही साधनसंपत्ती होती ती छत्रपतींच्या अधीन होती. किल्ल्याच्या आवारात कोण एखादा साधूसंत मृत्यू पावला तर कबर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आत करू नाहीत देणार. प्रवेशवाराच्या आत फक्त छत्रपती घराण्यातील व्यक्तींचं दहन शक्य होत. सावंत यांच्या मते, रायगडावर वादग्रस्त ठिकाणी उत्खनन करुन पुरातत्व विभागाने हा प्रश्न मार्गी लावावा. यावरून जातीय तेढ निर्माण होऊ नये.  

त्यामुळे रायगड हा अजुनही संशोधनाचा विषय आहे म्हण्टल्यास वावगं ठरू नये. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.