संभाजीराजे अपक्ष लढणार पण आवश्यक असणाऱ्या 42 मतांची फिल्डिंग कशी लावणार ?
आज गुरुवार १२ मे २०२२.. दुपारी ठीक १२ वाजता पुणे येथे आयोजीत पत्रकार परिषदेमधून संभाजीराजे छत्रपतींनी त्यांची पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली…
या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्यात…ज्याच्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून होतं.
६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांनी भूमिका बजावली. त्यांच्या या पदाचा कार्यकाळ येत्या जून मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे संभाजी राजे पुढे कोणत्या पक्षात जाणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. याबाबत त्यांनी स्पष्ट केलं आहे की,
ते कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. सोबतच त्यांनी राज्यसभेत जाण्यासाठी सर्वपक्षीय नेते मला मदत करतील असंही आव्हान केलं आहे.
सोबतच त्यांनी राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा म्हणून नविन संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली.
त्या संघटनेचं नाव स्वराज्य !
या संपूर्ण महिन्यात महाराष्ट्र दौरा करुन लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी शिव शाहु विचार निर्माण करण्यासाठी ही संघटना असेल आणि भविष्यात ‘स्वराज्य’ उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी आहे असंही सूचक वक्तव्य त्यांनी या पत्रकार परिषदेत केलं आहे.
संभाजीराजे यांनी सांगितल्यानुसार, ते येत्या राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार आहेत.
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या समीकरणाची संभाजीराजेंनी मांडणी केली…
ती अशी की,
जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचं समीकरण असं होतं की, ३ जागा भाजप, १ जागा राष्ट्रवादी, १ जागा शिवसेना, १ जागा काँग्रेस हे अशा ६ जागांचं समीकरण होतं.
२०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्या अन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि राज्यसभेच्या जागांचं समीकरण बदललं. त्यानुसार, २ जागा भाजप, १- राष्ट्रवादी, १- काँग्रेस, १- शिवसेना, मात्र यातील ६ वी जागा संख्याबळ कमी असल्यामुळे, कुठलाही एक पक्ष किंव्हा कुठल्याही एका आघाडीला ही जागा मिळू शकत नाही.
जर तुम्हाला राज्यसभेत खासदारकी मिळवायची असेल तर त्यासाठी ४२ मते लागतात, महाविकास आघाडीकडे २७ मते आहेत. भाजप कडे २२ मते आहेत.
तर संभाजी महाराजांचा क्लेम असा जाणारे की ते ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत. ज्यासाठी सर्व पक्षीय नेते त्यांना मदत करतील असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
तसेच त्यांनी सांगितल्यानुसार, सर्वपक्षीय नेते त्यांना मदत करणार आहेत. मग कोणत्या पक्षाचा काय वाटा राहिल? कोण मतदान करेल? हे गणित कसं असणार ?
त्यापूर्वी हे सोप्यात समजून घेऊया कि, राज्यसभेची निवडणूक पद्धत कशी असते ?
लोकसभेमध्ये जनतेने निवडून दिलेले खासदार असतात. तर राज्यसभेतल्या खासदारांची निवड हे राज्यांच्या विधानसभेचे आमदार करत असतात.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ८० नुसार, राज्यसभेची सदस्य संख्या २५० आहे. त्यातले १२ सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात.
देशातील खेळाडू,कलाकार, विविध विषयातील तज्ज्ञ, लेखक अशा क्षेत्रातील लोकांची राष्ट्रपती निवड करतात. राष्ट्रपती नियुक्त खासदार सोडले तर उर्वरित २३८ हे सदस्य राज्यांमधून निवडून येतात. कोणत्या राज्यातून किती खासदार येतात हे राज्याच्या लोकसंख्येच्या आधारे ठरतं.
मग महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा येतात तर १९ जागा येतात.
राज्यसभेचे दर दोन वर्षाला एक तृतियांश सदस्य निवृत्त होत असतात. त्या रिक्त झालेल्या जागांसाठीच निवडणूक होत असते. त्यानुसार येत्या जुलै मध्ये ६ जणांचा कार्यकाळ संपतोय आणि याच ६ जागांवर निवडणूक लागणार आहे.
या ६ सदस्यांमध्ये ३ सदस्य हे भाजपचे आहेत. ज्यामध्ये पियुष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे. बाकी ३ जागांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम हे आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांचं गणित बदललं त्यानुसार, भाजपकडे त्यांचा ३ रा उमेदवार राज्यसभेत पाठवण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसणारे. पण त्याचवेळी महाविकास आघाडीला तो एकत्र गाठता येणार नाही. कारण महाविकास आघाडीकडे २७ मते आहेत. भाजप कडे २२ मते आहेत. संभाजीराजेंनी हेच समीकरण पकडत अपक्ष उमेदवारीची घोषणा करून, निवडून येण्यासाठी सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितलाय.
पण जिंकून येण्यासाठीचा आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा कसा ठरतो ?
खासदार म्हणून निवडून येण्यासाठी ४२ मते लागतात. पण ही ४२ मते कशी येतात ? त्याची एक प्रक्रिया असते. ती मते ठरविण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो.
यासाठी एक फॉर्मुला ठरविण्यात आलेला आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण आमदारांची संख्या. या संख्येला राज्यातील राज्यसभेच्या रिक्त जागांमध्ये (+) अधिक १ करून भागाकार करायचा. जो भागाकार येईल त्यामध्ये पुन्हा अधिक १ (+) करायचा.
महाराष्ट्राच्या संख्येचं गणित -विधानसभेच्या एकूण जागा २८८/ राज्यसभेच्या रिक्त जागा ६ + १.
२८८ / ७ = ४१ + १= ४२
थोडक्यात २८८/७ = ४१. यामध्ये अधिक (+) १ आलेले उत्तर हा मतांचा कोटा निश्चित करतो. म्हणजेच ४१ + १ = ४२ हा मतांचा कोटा आहे.
त्यात महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्याकडे २७ मते आहेत. तर भाजप कडे २२ आहेत. तर संभाजीराजेंना ४२ मते आवश्यक असतील त्यासाठी सर्वच पक्षांनी पाठिंबा द्यावा लागेल.
हे सगळं समीकरण घडवून आणून संभाजीराजे निवडून येणार अशी त्यांची योजना आहे..मात्र या योजनेत त्यांना कोणते पक्ष साथ देतील हे पाहणं आवश्यक ठरणार आहे.
हे ही वाच भिडू :
- तो सोनेरी रथ म्यानमार, थाईलंडवरून वाहत येणं कोणत्या लॉजिकमध्ये बसतय
- १९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है
- या आधीही उत्तर भारतीय असणाऱ्या या नेत्यांनी राज ठाकरेंशी पंगा घेतला होता…पण