संभाजीराजे छत्रपतींच्या शिवसेनेत येण्यानं नेमकी चांदी कुणाची… शिवसेना की राष्ट्रवादी ?
राज्याच्या राजकारणात एका बाजूला, अयोध्या दौरा, टीका-टिपण्ण्या आणि सभांची लड लागलेली आहे… तर दुसऱ्या बाजूला चर्चेतला मुद्दा आहे, राज्यसभेची सहावी जागा.
१२ मे २०२२ ला पुण्यात पत्रकार परिषद घेत माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी, ‘आपण राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढवणार आहोत, यासाठी सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा’ असं आवाहन केलं. सोबतच ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेची घोषणा केली आणि पुढं जाऊन ही संघटना राजकीय भूमिका घेईल असंही सांगितलं.
त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या, संभाजीराजे पाठिंब्याचं गणित कसं बसवणार? त्यांना कोणते पक्ष पाठिंबा देणार? याबद्दल तर्कही लढवण्यात आले.
राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची घोषणा केली, पण अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा असेल असंही सांगितलं. शरद पवारांचं महाविकास आघाडीतलं महत्त्व पाहता, त्यांच्या बोलण्यानुसार सूत्रं हलतील असा अनेकांचा अंदाज होता.
मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘सहावी जागा शिवसेना लढवेल,’ असं जाहीर केलं. तर संभाजीराजेंबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘संभाजीराजे सर्वांनाच प्रिय आहेत. ते जर शिवसेनेकडून उमेदवार होणार असतील, तर त्यांचा नक्कीच विचार केला जाईल.’
संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि पाठिंब्याबाबत चर्चा केली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली असल्याची बातमीही आपण सगळ्यांनी वाचली.
आता सेनेनं राज्यसभेचे उमेदवार म्हणून संजय राऊत यांचं नाव जाहीर केलंय, तर दुसऱ्या जागेसाठी मात्र अद्याप उमेदवार निश्चिती झालेली नाही. सेनेनं सोमवार २३ मे पर्यंत संभाजीराजेंचा निर्णय ठरला नाही, तर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू अशा बातम्याही येतायत.
या दुसऱ्या जागेसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती सेनेत प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलंय.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंच्या शिवसेना प्रवेशाचा सेना-राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? त्यांच्या स्वराज्य संघटनेचा राष्ट्रवादीला तोटा होऊ शकेल का? आणि शिवसेना प्रवेशाची अट का घातली जातीये? हे पाहुयात.
संभाजीराजे छत्रपती सेनेत गेले तर,
राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासंबधित मुक मोर्चे काढण्यात येत होते तेव्हा सामना मधून मुका मोर्चा म्हणत मराठी मोर्चाची खिल्ली उडवण्यात आली होती. मराठा आरक्षणासंबधित देखील शिवसेनेमार्फत ठाम अशी भूमिका आजवर घेतलेली नाही.
जर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत गेले तर पश्चिम महाराष्ट्रासहीत मराठवाड्यातील “मराठा” मतांसाठी संभाजीराजे डॅमेज कंट्रोल करणारे ठरू शकतात. शिवसेनेमार्फत मिशन मराठवाडा आखण्यात आलेलं आहे. यासाठी संभाजीराजेंचा फायदा शिवसेनेच्या पथ्यावरच पडणार आहे.
जर संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडून गेले तर,
तर ते आपल्या ‘स्वराज्य’ संघटनेद्वारे राजकीय वाटचाल सुरू ठेवतील. या स्वराज्य संघटनेला मराठा मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो. सध्या पश्चिम महाराष्ट्रात मराठा मतदारांचं मोठं पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेसला लाभलेलं आहे.
मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतल्यानं या मतदारांचा ओढा संभाजीराजेंकडे वाढलेला दिसून येतो. त्यामुळं जर स्वराज्य संघटना राजकीय पक्ष म्हणून पुढं आली, तर राष्ट्रवादीच्या ठरलेल्या एकगठ्ठा मतदानात मोठी विभागणी होऊ शकते.
मात्र संभाजीराजे शिवसेनेत गेले, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा प्रश्नच उरत नाही आणि सेनेत प्रवेश केला तरीही ते महाविकास आघाडीचाच घटक असतील, किमान व्होटबॅंक डॅमेज होणार नसल्याने या गोष्टी राष्ट्रवादीच्याच पथ्यावर पडणाऱ्या आहेत.
भाजप ‘संभाजीराजेंना महाविकास आघाडीनं त्यांच्या हक्काची जागा द्यावी’ असं म्हणतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीये, सेनेनं थेट पक्षप्रवेशाचीच अट घातली आहे. त्यामुळं संभाजीराजे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा मिळवणं सध्या तरी कठीण दिसतंय.
सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतरही, सेना स्वतःचा उमेदवार घोषित करण्यावर ठाम आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये मतभेद आहेत का? आणि खुलेपणानं संभाजीराजेंच्या नव्या संघटनेला विरोध करु शकत नसल्यानं राष्ट्रवादीच सेनेच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणत आहे का?
अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
या सगळ्याबाबत बोल भिडूनं काही राजकीय विश्लेषकांची मतंही जाणून घेतली,
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणाले,
”संभाजीराजे जर शिवसेनेत गेले, तर त्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल, छत्रपती शिवरायांचे वंशज आपल्या पक्षात असल्यानं त्यांना एक वलय प्राप्त होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसं, ‘कोट्यानुसार ही जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळं तिथं कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेनेचाच असेल.’ संभाजीराजे अपक्ष निवडून गेले किंवा पक्ष स्थापन केला, तरी इतर पक्षांना फारसं नुकसान होईल असं वाटत नाही. कारण त्यांचा चाहतावर्ग प्रचंड असला, तरी वोटबँक तेवढी प्रबळ नाही.
अर्थात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना काही जागांवर फटका बसू शकतो. जर संभाजीराजे राज्यसभेवर निवडून गेले नाहीत, तर त्यांनी मागच्या काही वर्षात आंदोलन आणि चळवळीतून उभारलेल्या त्यांच्याच नेतृत्वाचं नुकसान आहे.”
तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे म्हणाले,
‘शिवसेना संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्याची अट घालतंय यात काहीच वावगं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात याआधीही राज्यसभेवर अपक्ष निवडून जाणाऱ्या खासदारांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं जर आत्ता अपक्ष निवडून जाऊन, संभाजीराजेंनी भाजपला पाठिंबा दिला तर शिवसेनेचं हसं होईल. त्यामुळे तिकिटावर निवडून गेल्यास शिवसेनेला फायदाच आहे.
जरी अपक्ष म्हणून निवडून जायचं असेल, तर सगळ्या पक्षांचं समर्थन असणं गरजेचं आहेच. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात इतरत्रही राजे-महाराजांच्या वंशजांना लोक मानत असले, तरी राजकारणात त्यांच्या पाठीमागे जातीलच असं होत नाही. स्वतःचा पक्ष काढायचा म्हणलं तरी पक्षबांधणीसाठी मोठी ताकद पाहिजे, लोकं पाहिजेत, एका नावानं पक्ष उभा राहणार नाही.
राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं, तर शरद पवारांनी मराठा राजकारणात जे वलय तयार केलंय, त्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. प्लॅनिंग करणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात आणणं वेगळं आहे.’
त्यामुळे आता २३ मेपर्यंत संभाजीराजे काय निर्णय घेतात? ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की हाती शिवबंधन बांधणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
हे ही वाच भिडू:
- संभाजीराजेंनी जे गणित मांडलय त्याच गणितावर 2014 साली संजय काकडे खासदार झाले होते
- संभाजीराजे अपक्ष लढणार पण आवश्यक असणाऱ्या 42 मतांची फिल्डिंग कशी लावणार ?
- ज्या समाजाला १४ वर्ष मुख्यमंत्री पद लाभलं, तोच समाज आज “राज्यसभेसाठी” झगडतोय..