आता समीर वानखेडे बॉलिवूडच्या नाही, तर सोनं तस्करांच्या मागं लागणार

नुकतंच संपलेलं २०२१ हे वर्ष तसं चांगलंच गाजलं. या वर्षात कित्येक नव्या चेहऱ्यांना ओळख मिळाली, कित्येक जुने चेहरे पुन्हा एकदा चर्चेत आले. या वर्षातल्या काही गोष्टी आपण विसरू, पण काही घटना, काही नावं अशी आहेत, जी २०२१ म्हणल्यावर चटकन आपल्या डोळ्यांसमोर येतील. त्यातलंच एक नाव म्हणजे समीर वानखेडे.

देशाच्या नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी असणाऱ्या वानखेडे यांचं नाव भरपूर चर्चेत राहीलं. कथित ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वानखेडे यांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांचं नाव जवळपास दररोज बातम्यांमध्ये होतं. वानखेडे यांच्या खासगी आयुष्यापासून त्यांचे कपडे, लाईफस्टाईल अशा कित्येक गोष्टींबाबत सातत्यानं चर्चा झाली.

हे प्रकरण काहीसं निवळलेलं असतानाच, नव्या वर्षाच्या सुरुवातीला बातमी आली, की समीर वानखेडे यांची डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्समध्ये (डीआरआय) बदली झाली. खरंतर, वानखेडे यांची ही घरवापसीच म्हणावी लागेल. कारण एनसीबीमध्ये बदली होण्याआधी ते डीआरआयमध्येच काम करत होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांची एनसीबीमध्ये बदली झाली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडले, बॉलिवूड अभिनेत्यांच्या चौकशीचे किस्सेही गाजले. पण वानखेडे चर्चेत आले ते आर्यन खान प्रकरणामुळं. पुढे राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळं त्यांच्याभोवती संशयाचं धुकं तयार झालं. त्यामुळे त्यांना एनसीबीमधला कार्यकाळ वाढवून मिळाला नाही, अशी चर्चा आहे.

या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वानखेडे यांची बदली झालेलं डीआरए नेमकं काय आहे?

महसूल गुप्तचर संचलनालय हे सेंट्रल बोर्ड ऑफ इनयरेक्ट टॅक्स अँड कस्टम्सच्या अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जातं. हे अधिकारी भारताच्या विविध विभागांसोबतच परदेशातही तैनात असतात. डीआरआय ही तस्करी विरोधातली भारताची सर्वोच्च तपास एजन्सी आहे. त्यांचं मुख्य काम हे हत्यारं, सोनं, अमली पदार्थ, बनावट चलन, वन्यजीव, दुर्मिळ आणि पुरातन वस्तू अशा गोष्टींची तस्करी रोखणं आणि काळ्या पैशावर आधारित व्यवहार रोखणं हे असतं.

या एजन्सीची स्थापना ४ डिसेंबर १९५७ रोजी झाली. तेव्हा ही एजन्सी स्मगलिंगच्या घटनांचा अभ्यास करणं, त्यांची माहिती गोळा करणं हे काम करायची. त्यानंतर देशात उपलब्ध असलेल्या यंत्रणांचा स्मगलिंग रोखण्यासाठी कसा वापर करता येईल, याची माहितीही काढायची. कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही डीआरएने केलं.

सुरुवातीला प्रामुख्यानं सोने तस्करांच्या मागावर असणाऱ्या डीआरएनं आता तस्करी होणाऱ्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपली जरब बसवली आहे. गेल्या काही दिवसांत ड्रग्ससोबतच रक्तचंदन, सोनं, दुर्मिळ मासे यांची तस्करी करणाऱ्यांना जेरबंद करण्यात डीआरएनं यश मिळवलं आहे. आता पुन्हा समीर वानखेडे या विभागात कार्यरत होत असल्यानं डीआरएच्या रडारवर कोण येणार याची चर्चा सुरू आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.