पोरालाच नाही तर कधी काळी वानखेडेनी शाहरुखला पण आपला इंगा दाखवला होता.

नाही म्हणलं तरी दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. म्हणजे जुलै २०११ ची. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉलिवूडच्या बादशहाला एका तरण्याबांड अधिकाऱ्यानं अडवलं. कस्टम विभागातल्या अधिकाऱ्याने या बॉलिवूडच्या बादशहाची चांगली पाच – सहा तास चौकशी केली आणि चांगली दिड लाखांची कस्टम ड्युटी लावली.

एव्हाना तुम्हाला समजलंच असेल हा विषय कोणाचा आहे ? हा बॉलिवूडचा बादशहा म्हणजे आपला शाहरुख खान आहे. तर कस्टम विभागातला तरणाबांड अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. 

हे प्रकरण आजच्या सारखं त्याकाळात मीडिया मध्ये गाजलं नाही. कारण ही कस्टम ड्युटी थोडकीच होती. पण आज आर्यन खान चर्चेत आल्यावर शाहरुखचे सगळेच किस्से बाहेर यायला लागले. त्यातलाच हा किस्सा.

जुलै २०११ मध्ये शाहरुख खान आपल्या कुटुंबासोबत युरोप ट्रिपवर गेला होता. हॉलंड आणि लंडन अशी बडी बडी शहर फिरून खान कुटुंब मुंबईकडे परतलं. मुंबई मध्ये उतरल्यावर त्यांना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आलं. अडवलं होत कस्टम विभागाच्या समीर वानखेडे या अधिकाऱ्याने. त्यावेळी वानखेडे हे कस्टम डिपार्टमेंट मध्ये असिस्टंट कमिशनर होते. आणि त्यांची ड्युटी मुंबईच्या विमानतळावर होती.

तर वानखेडेंनी शाहरुखच्या कुटुंबाला अडवलं होत कारण खान कुटुंबाकडे जवळजवळ २० बॅगा होत्या. या बॅगा प्रवासाच्या नव्हत्या. तर यात परदेशातून बरंच किंमती सामान आणण्यात आलं होतं. दागिने कपडे असं बरचसं किंमती सामान. आणि शाहरुखने चक्क या किंमती सामानाची कस्टम ड्युटी भरली नव्हती. कदाचित तो विसरला असावा. पण वानखेडे विसरले नाहीत. 

त्यांनी शाहरुखला बरोबर पकडलं. आणि कस्टम ड्युटी विषयी विचारलं. यावर शाहरुखने ती ड्युटी भरली नसल्याचं कबुल केलं. लागलीच वानखेडेंनी शाहरुखला आपल्या ऑफिसात नेलं. सगळ्या बॅगांची अधिकाऱ्यांना नीट तपासणी करायला लावली. तपासणी करून भारतात नियमानुसार जेवढा टॅक्स लावला जाईल तेवढी रक्कम शाहरुखला भरायला सांगितली. शाहरुखने ती रक्कम भरल्यावरच त्याला सोडण्यात आलं.

आता ही रक्कम फक्त दीड लाख होती. एवढेसे पैसे हे कोट्यवधींनी कमाई करणाऱ्या शाहरुखला किंबहुना आपल्यातल्या बऱ्याच जणांना कमी वाटेल. पण विषय कमी किंवा जास्त रकमेचा नव्हता. तर आपली ड्युटी व्यवस्थित आणि कर्तव्यनिष्ठ पद्धतीने पार पाडण्याचा हा विषय होता.

आता या वानखेडेंनी फक्त शाहरुख खानचं नाही तर गायक मिक्का सिंग, मनीषा लांबा, अनुष्का शर्मा  यांसारख्या बॉलिवूड सेलेब्रेटीजना कस्टम ड्युटी भरायला लावून आपला इंगा दाखवला होता. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.