तुम्ही समृद्धी महामार्गावरून जाताय का ? त्या आधी मार्गावर येणाऱ्या अडचणी माहित करून घ्या

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासात आणि वैभवात भर घालणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प.

नागपूर वरून शिर्डीला निघाला तर ७०१ किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही १० जिल्हे, शिवाय परिघातले १४ जिल्हे आणि २६ तालुके आणि ३९२ गावं असा हा महामार्ग आहे. या महामार्गापासून कोकण दूर वाटला तरी ठाणे, रायगड आणि महामुंबई हे कोकणाचेच भाग आहेत आणि ते या मार्गाशी जोडले जाणार आहेत.  त्यामुळे एका अर्थाने साऱ्या महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग आहे. 

अर्थातच या महामार्गाच्या श्रेयावरून राजकारण रंगलेलं. जिकडे तिकडे राजकीय नेते, सत्ताधारी समृद्धी महामार्गाबद्दल कौतुकाचे शब्द काढत आहेत मात्र महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याकरिता जेव्हापासून हा प्रकल्प सुरु झाला तेंव्हापासून अनेक अडचणींचा सामना प्रवाश्यांना करावा लागतोय त्याबद्दल सत्ताधारी नेते ब्र देखील काढत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

समृद्धी महामार्गात येत असलेल्या अडचणी कोणत्या आहेत ते पाहूया,  

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली. 

रस्त्यांची देखभाल केली जात नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर कुठे खड्डे, कुठे खणून ठेवलेलं आहे. त्यामुळेही अपघात वाढल्याचं सांगण्यात येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १८ दिवसांत विविध भागात किमान ४० अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत आणि याबाबात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वाढत्या अपघातांबाबत मौन बाळगून आहेत.

टायर फुटण्याच्या घटना वाढल्यात. 

समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूरमधील अंतर कमी झालं आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहने सुसाट सुटत आहेत. परिणामी महामार्गावर काही अपघाताच्या घटना घडल्या देखील आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेग मर्यादेबाबत वाहन चालकांना कल्पना द्यायला हवी. कारण गाडीचा स्पीड वाढवला तर टायर फुटीच्या घटना घडत आहेत.

अलीकडेच शिर्डी नागपूर या समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला. या आगीत कार जळून खाक झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात,  प्रवासात टायरची काळजी घेण्याचा सल्ला ऑटोमोबाईल तज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या मारूती, स्कॉरपीओसारख्या गाड्यांचे टायर स्पीडमुळे महामार्गावर फुटत आहेत. थंडी असतानाही टायर फुटत आहेत  तर मग उन्हाळ्यात तापमान ४२-४३ च्या वर जाईल तेंव्हा टायर फुटीच्या घटना आणखी वाढतील त्यामुळे सरकारने खबरदारी घेतली पाहिजे.

शेतकऱ्यांनाही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. 

महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याकरिता या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्या त्या शेतकऱ्यांना आज समस्यांना तोंड द्यावं लागतंय. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये उभ्या पिकांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचल्याने आणि शेतात असणाऱ्या या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने या पिकांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शेतकऱ्यांकडून याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून शेतांत पाणी जाणार नाही यासाठी चर खोदण्यात आले. पण भविष्यात समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी शेतांमध्ये येऊ नये यासाठी प्रभावी उपाय योजना मात्र प्रशासनेला सुचत नाहीत. सिन्नर तालुक्यातील वावी येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत

समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप,डिझेल पंप, इलेक्ट्रिक मोटर चार्जिंग स्टेशन नाहीत. 

या महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा फक्त १३ ठिकाणी इंधन भरण्यासाठी डिझेल आणि पेट्रोल पंपाची सोय करण्यात आली आहे. १०० किमीच्या टप्प्यात पेट्रोल पंप नाहीत. शिर्डीपर्यंतच्या मार्गावर मात्र साधे पंक्चर दुरुस्तीचे दुकानदेखील नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

नागपूर ते अकोला दरम्यान प्रवाशांना इंधन आणि वाहन दुरुस्तीसाठी दिलेल्या निर्गमनातून बाहेर जावे लागते. महामार्गावर स्पीड गन आणि कॅमेरे बसवण्याची गरज आहे. 

खाण्यापिण्याची ठिकाणे नाहीत. 

विश्रांतीची ठिकाणे, गॅरेज, मोटेल किंवा फूड जॉइंट्स यांसारखी कोणतीही गरेजची साधनं नाहीत. सर्वात महत्वाचं आहे दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. खरं तर थोड्या-थोड्या अंतराने प्रसाधनगृह असायला हवेत मात्र महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने जी काही ७ पेट्रोल पंप आहेत तिथेच काय ते प्रसाधनगृह आहेत. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी लाइट्स खराब असल्याचं प्रवासी सांगतात.

वन्यजीव 

हा महामार्ग जंगलातून गेला असल्याने रस्त्यावर अचानक आडव्या येणाऱ्या जंगली जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढलीय. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत जिथून प्राणी महामार्गावर प्रवेश करतात. जागोजागी वानरांची, माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्याची अडचण प्रवासादरम्यान येत आहे. प्रवाशांच्या आणि प्राण्यांच्या सुरक्षेखेरीज निव्वळ गतीला अर्थ नसतो. त्यामुळे त्यामुळे रस्ते सुरक्षा संदर्भात पुरेशा प्रतिबंधात्मक सोयी आवश्यक आहेत.

एवढेच काय तर, वैद्यकीय मदत उपलब्ध नाही. 

दुर्दैवाने गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत. जर काही अपघात झाला तर मदत कशी पोहोचणार? कारण असंच अपघातात सापडलेल्या कुटुंबासोबत घडलेलं आहे. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही.

वैद्यकीय मदत मिळवून देण्याची त्यांची तत्परतादेखील आपण आत्मसात करायला हवी. रात्री-अपरात्री दुर्घटनांचा सामना करणाऱ्या कुटुंबाला ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. सुरक्षा पथकांबाबतची जनजागृती हवी. दिशादर्शक फलकांपासून पोलिसी वा वैद्यकीय साहाय्याचे भक्कम पाठबळ असायला हवे.

समृद्धी महाराष्ट्रावरील अडचणींचा पाढाच थोडक्यात या ठिकाणी असला तरी या महामार्गावरील समस्या तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत नाही तर नुकताच शुभारंभ झालेला प्रकल्पाला फेल गेल्याचा ठपका लागू नये इतकंच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.