समृद्धी महामार्गात साडेचार एकर गेली, त्याबदल्यात ८ एकर घेतली अन् संत्रा बागायतदार झाला

२०१६-२०१७ मध्ये समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. नंतर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे सरकारने भूमी अधिग्रहणाच्या पॉलिसीत बदल केला. जमिनीचे भाव ५ पटीने वाढवून दिले. कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात लाखो रुपये एकदाच आले होते.
शेतकऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्यावर ते गैरमार्गाला लागती, पैसे उडवतील असेही बोलले जाऊ लागले. यातील अनेकजण तर शेती करणार नाही. त्यांच्याकडे पैसे उरणार नाही अशा जाहीर चर्चा होत होत्या.
मात्र, कोटी रुपये मिळून सुद्धा त्याने शेती बरोबरच आपली ग्रामपंचायतमधील डेटा एंट्रीची नोकरी सोडली तर नाहीच. उलट शेतीत नुकसान झालं तरी ती करणे कधीच सोडणार नाही असं सांगणाऱ्या बुलढाण्या जिल्ह्यातील जितेश देशमुखची ही गोष्ट.
जितेश देशमुख हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील चायगावचा. आजी, आई बायको, आणि लहान भाऊ आणि मुलगा असं छोटं कुटुंब आहे.
वडील चोवीस तास शेती करत असल्याने जितेशनं तिकडे कधीही लक्ष दिले नव्हते. २०१३ मध्ये जितेशच्या वडिलांचे अपघाती निधन झाले आणि कुटुंब, शेती याची सगळी जबाबदारी जितेशकडे आली. त्याचा लहान भाऊ शिक्षण घेत होता. देशमुख कुटुंबाची सर्व मदार शेतीवर होती.
मात्र, ही शेती काही प्रमाणात ओलाताखाली असली तरीही त्यावर कुटुंबाचा उदारहनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे जितेशने एकीकडे बी. ए. च शिक्षण सुरु असतांना गावातील ग्रामपंचायत मध्ये डेटा एंट्रीच काम करत होता. वेळ मिळेल तसा शेतात जात असे. जगण्याचे साधन शेतीच होती.
असं सगळं सुरळीत सुरु असतांना शेतीतून समृद्धी नावाचा मोठा महामार्ग जाणार असल्याचे जितेशला समजले. चायगावातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग जात होता. सर्व शेतकरी याविरोधात एकवटले होते. याला जितेशचाही विरोध होता.
इतर शेतकऱ्याप्रमाणे जितेशला महामार्गा शेतीतून गेला तर पैसे मिळतील का? ते किती मिळतील, आज शेती घेतील पण पैसे दिले नाही तर काय करायचं असे प्रश्न सतावत होते. त्यामुळे जितेश या प्रकल्पाला विरोध होता. मात्र, शासकीय अधिकारी, संवादक यांच्याकडून या प्रकल्पाविषयी माहिती मिळाल्यानंतर जितेशचा विरोध मावळला.
१२ एकर पैकी साडेचार एकर जमीन समृद्धी महामार्गात जाणार होती. जेवढी शेती या महामार्गात जाईल त्यापेक्षा दुप्पट शेती घ्यायचा निर्णय आधीच देशमुख कुटुंबीयांनी घेतला होता. पुढील काही दिवसात जितेशच्या शेताची मोजणी झाली आणि खरेदी करारही झाला. ८ आणि १५ दिवसांच्या अंतराने जितेश आणि त्याचा आईच्या बँक खात्यावर शेतीचा मोबदला म्हणून १ कोटी ४३ लाख रुपये जमा झाले होते.
गावात एकाचवेळी १५ ते २० शेतकऱ्यांमध्ये घर, कार खरेदीची चढाओढ लागली होती. पण पैसे आल्यावर काय करायचं हे जितेशने अगोदरच फिक्स केलं होत. त्यानुसार जितेशने ४० लाख खर्च करून शेतीला लागून असलेली साडे सात एकर शेती विकत घेतली.
जितेशन मिळालेल्या पैशातून साडे सात एकर शेती खरेदी तर केलीच त्याबरोबर शेतात ठिबक सिंचन सुद्धा बसविले आहे. आता जितेशकडे एकूण १५ एकर शेती झाली असून त्यात संत्रीची बाग तयार केली आहे. खरिपात सोयाबीन तर रब्बीत हरबऱ्याच पीक जितेश घेतो.
मिळालेल्या पैशातून जितेशने आपल्या भावाचे शिक्षण पूर्ण केले आणि आता जितेशचा भाऊ शिक्षक झाला आहे.
समृद्धी महामार्गातून पैसे आल्याने राहणीमानाचा दर्जा उंचावल्याचं जितेश सांगतो.
सरकारकडून त्यावेळी काही आम्हाला काही आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण झाले नाहीत. महामार्गाच्या बाजूने शेतीत जाणण्यासाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात येईल. महामार्ग लगत ९ नवीन शहरे वसविण्यात येतील, शेतीचा माल नागपूर, मुंबई, नाशिक सारख्या शहरात एक्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वास दिले होते. आता ९० टक्के महामार्गबांधून पूर्ण झाला आहे. मात्र,आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याचे जितेशने सांगितले.
पैसे आले म्हणून काम जितेशने काम सोडले नाही. २- ३ वर्ष शेतीतून चांगलं उत्त्पन्न मिळत. एखाद्या वर्षी नुकसान होत. चांगले पीक मिळाल्यानंतर एखाद्या वर्षी नुकसान होते. मागच्या २ -३ वर्षात मिळालेला नफा यात जातो. अगोदर शेती करतांना याची भीती वाटायची ती आता नाही नसल्याचे जितेश देशमुख सांगतो. पुढील ५० वर्षांनी जी प्रगती होणार होती ती समृद्धी महामार्गामुळे एका वर्षातच झाल्याचे जितेशने सांगितले.
थोडक्यात काय तर शेतजमीन शासनाला गेल्याने मिळालेल्या मोबदल्याचा योग्य वापर करुन शेतीच टिकवणारे शेतकरी देखील आहेत हे सांगण्याचाच हा प्रयत्न.
हे ही वाच भिडू
- आता महिलांना सातबाऱ्यावर १५ दिवसांत ‘शेतकरी’ असल्याचा दर्जा मिळणार आहे.
- सर्वात पहिलं शेतकरी आंदोलन महाराष्ट्रात झालं आणि इंग्रजांना माघार घ्यावी लागली होती
- ४०० कोटीची उलाढाल करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता शेतकरी भिडू….
मा महोदय
अतिशय मोजक्या शब्दात संपुर्ण राज्यातील जनतेला जागृत करण्याचे व समाज हिताचे काम आपल्या कडून होत आहे आपल्या या कार्याने भावी पिढीला मार्गदर्शन मिळत आहे आपल्या या राष्ट्रउभारणीच्या कार्याला सलाम.
Jitesh deshmukh