जगाला कॅन्सर देणारी कंपनी म्हणून “सॅमसंगचा” उल्लेख करावा लागेल..?

गेल्या आठवडाभरात एका बातमीची खूप चर्चा झाली. बातमी होती इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील बडी बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या सॅमसंगने आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मागितलेल्या माफीची आणि त्यांच्या नुकसानभरपाईसाठी तरतूद केलेल्या भल्या मोठ्या रकमेच्या आकड्याची.

समजून घेऊयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सॅमसंग सारख्या बड्या कंपनीवर कर्मचाऱ्यांची माफी मागण्याची वेळ नेमकी का आली आणि या संपूर्ण प्रकरणात सॅमसंगची केवळ माफी पुरेशी आहे का..?

नेमकं प्रकरण काय आहे..?  

साधारणतः दशकभरापूर्वीचं हे प्रकरण आहे. सॅमसंगच्या दक्षिण कोरियातील सेमी-कंडक्टर आणि एलसीडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅन्सर झाल्याचं, तसंच त्यांच्यात इतर आजारांची लक्षणे दिसून आल्याचं समोर आलं होतं. सर्वप्रथम २००७ साली हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये यावरून वाद निर्माण झाला होता.

whyang yumi
AP

एएफपी या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, २००७ साली व्ह्यांग युमी नामक २२ वर्षीय तरुणीच्या ल्युकेमियाने झालेल्या मृत्यूनंतर सॅमसंग विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. मृत तरुणीचे वडील व्ह्यांग-सँग कि यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने सॅमसंग विरोधातील या लढ्याचं नेतृत्व केलं होतं.

सॅमसंगच्या सेमी-कंडक्टर बनवणाऱ्या कारखान्यातील २४० कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या अशा १६ प्रकारचा कॅन्सर आणि इतरही आजारांनी ग्रासलं असल्याचा, तसंच त्यातील ८० कर्मचारी मरणासन्न अवस्थेत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला होता.

व्ह्यांग-सँग कि यांनी सॅमसंगच्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास दशकभर लढलेल्या या लढ्याला २३ नोव्हेंबर २०१८ रोजी यश आलं आणि सॅमसंगने आपल्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली. सोबतच त्यांच्यासाठी नुकसानभरपाईची तयारी देखील दाखवली.

माफीनाम्यात काय म्हटलय..?

सॅमसंगने आपल्या माफीनाम्यात जे काही म्हंटलय ते इथे जशास तसं देण्यात येतंय.

“सॅमसंगमध्ये काम करताना आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आम्ही माफी मागतो. आमच्या सेमी-कंडक्टर आणि एलसीडी निर्मितीच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांचं व्यवस्थापन करण्यात आम्ही अपयशी ठरलो.”

DEAL
समझोत्यादरम्यान डावीकडून सॅमसंगचे किम कि नाम आणि व्ह्यांग-सँग कि

सॅमसंगने याप्रकरणी माफी मागितल्यानंतर एका समझोत्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यात आला. या समझोत्यानुसार सॅमसंगने प्रत्येक पिडीत कर्मचाऱ्याला नुकसानभरपाई देण्याचं मान्य केलं.

सॅमसंगकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला साधारणतः १ लाख ३३ हजार अमेरिकन डॉलर एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

सॅमसंगकडून मागण्यात आलेली माफी पुरेशी आहे का..?

सॅमसंगकडून जरी या प्रकरणी माफी मागण्यात आली असली आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी नुकसानभरपाईची घोषणा केली असली तरी केवळ माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही. कुठल्याही माणसाच्या जीवाची किंमत म्हणून एक माफीनामा आणि आर्थिक नुकसानभरपाई हा फार अमानवी सौदा झाला.

एखाद्या कुटुंबातील कर्ता माणूस ज्यावेळी अशा प्रकारे औद्योगिक चुकांमुळे आपला जीव गमावतो, त्यावेळी होणारं नुकसान हे काही फक्त आर्थिक नसतं, तर ते मानसिक देखील असतं. एखाद्या बापाने आपली २२ वर्षीय मुलगी गमावणं, हे नुकसान पैशाने कसं भरून निघू शकेल..?

सॅमसंगसारख्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील इतक्या मोठ्या कंपनीने अगदी खुलेपणाने आपली चूक मान्य करणं, हे देखील इथे लक्षणीय आहे. सॅमसंगने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाच नसेल, असं समजण इथे खुळेपणाचं लक्षण ठरेल.

सर्व प्रयत्न करून देखील प्रकरण दाबता येत नाही, हे लक्षात आल्यानंतरच सॅमसंगने हे शेवटचं पाऊल उचललं. याप्रकरणी कंपनीची अजून नाचक्की होऊ नये आणि बाजारातील कंपनीच्या प्रतिमेवर त्याचा वाईट परिणाम टाळता यावा, यासाठी उशिराने सुचलेलं शहाणपण म्हणून आपण या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे.

सॅमसंगने जबाबदारी झटकणं सर्वाधिक वाईट  

या माफीनाना आणि नुकसानभरपाई प्रकरणातली सर्वात मोठी मेख अशी की,

आपल्या कारखान्यांमध्ये वापरलेल्या ज्या केमिकलमुळे या प्रकरणात मृत्यू झाला आणि अनेक लोकांना मृत्यूशी झुंझावं लागतंय, त्या केमिकलची माहिती सार्वजनिक करण्यास सॅमसंगने कंपनीच्या व्यावसायिक गुप्ततेचं कारण देत नकार दिलाय. सॅमसंगच्या या भूमिकेमुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणारच नाहीत, याची खात्री खुद्द सॅमसंग तरी देऊ शकेल का..?

कुठल्याही औद्योगिक अपघातानंतर देण्यात येणारी नुकसानभरपाई ही त्या अपघातातील पिडीतांच्या वेदनेवरची मलमपट्टी म्हणून ठीक. पण तसे औद्योगिक अपघात होणारच नाहीत, याची काळजी आधीच घेणं कधीही श्रेयस्कर. मात्र या प्रकरणात सॅमसंगने अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या केमिकलची माहिती दडवताना ती काळजी घेण्याची जबाबदारी झटकलेली आहे, हे सर्वाधिक वाईट.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.