घर सोडून पळालेल्या व्यक्तीने लाकडी मॉडेल बनवलं, त्याला आज रिव्हॉल्व्हर म्हटलं जातं…

अॅक्शन मुव्हिज असं म्हटलं की फोडतोड, गाड्या उडणं आणि फायटिंग स्किल्सची अतिशयोक्ती असं आजकालचं चित्र झालं आहे. पण चोर – पोलीस, डिटेक्टिव्ह अशा मुव्हिजमधील अॅक्शन सिन्स आठवले तर गोळ्यांचा धाड धाड आवाज आपोआपच कानी पडतो. बॉलीवूडच्या जुन्या मुव्हिजचा अजरामर डायलाॅग तर अनेकांना चटकन आठवेल. तो म्हणजे ‘अपनी रिव्होल्व्हर नीचे रखदो और खुदको कानून के हवाले करदो’.

अशा या रिव्होल्व्हरने अनेकांना सध्या वेड लावलेलं दिसतं. जरी भारतात शस्त्र बाळगण्यास मनाई असली तरी अनेक लोक लायसन्स काढून रिव्होल्व्हर स्वतःजवळ बाळगतात. त्यातल्या त्यात वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये उपलब्ध असणारं अगदी रिच लुक देणारं ‘कोल्ट’ कंपनीचं रिव्होल्व्हर बाळगण्याचा वेगळाच फॅड जगभरातील लोकांमध्ये आहे. पण हे रिव्होल्व्हर बनवणारा व्यक्ती घरातून पळून गेला होता आणि वाटेत त्याने एक लाकडी मॉडेल बनवले ज्याला नंतर रिव्हॉल्व्हर म्हटले गेले, हे माहितीये का.

या भिडूचं नाव होतं सॅम्युअल कोल्ट.

इतिहासात बघितलं तर शोध लावणारे लोक हे वेडे म्हणून संबोधले गेले आहे. आईन्स्टाईन, न्यूटन सारखे थोर शास्त्रज्ञही यातून दूर राहू शकले नाही. त्यांच्या वेडेपणानेच जगाला विज्ञानाची ताकद दाखवून दिली. आपला भिडू सॅम्युअल कोल्टसुद्धा काहीसा असाच होता.

सॅम्युअल मुळचा अमेरिकेचा.  चार वर्षांचा असताना एका नातेवाईकाने त्याच्या वाढदिवसासाठी त्याला कांस्य खेळण्यातील पिस्तूल दिले. दुसऱ्या दिवशी सॅम्युअलने त्याच्या वडिलांकडून गनपावडरचे पॅकेट चोरले आणि प्रयोग करू लागला. घरात अचानक एक छोटासा स्फोट झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र आपल्या भिडूला शस्त्रांचं वेड लागलं ते या घटनेपासूनच.

शिक्षण घेण्यासाठी बोर्डिंग स्कूलचा पाठवल्यानंतर सॅम्युअलने त्याच्या वर्गमित्रांचे पायरोटेक्निकसह मनोरंजन करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. अशाच एका गंमतीने शाळेत आग लावली, ज्याचा अर्थ सॅम्युअलचा बोर्डिंग स्कूलचा अभ्यास तिथेच संपला. घरी जाण्याची भिती वाचल्याने सॅम्युअल पळून जाऊन एका व्यापारी जहाजावर खलाशी म्हणून नोकरी करू लागला.

किशोरवयात, कोल्टने दोन सैनिकांना डबल-बॅरल रायफलच्या यशाबद्दल आणि रीलोड न करता पाच किंवा सहा वेळा गोळ्या घालू शकणारी पिस्तूल तयार करण्याच्या अशक्यतेबद्दल बोलताना ऐकलं होतं. तेव्हापासून भविष्यात असं काहीतरी करून दाखवण्याचा किडा आपल्या भिडूच्या डोक्यात होता.  गरज होती ती फक्त हिंट चमकण्याची.

हिच हिंट त्याला या प्रवासादरम्यान मिळाली.

एकदा सहजपणे जहाजाच्या स्टीयरिंग व्हीलकडे तो बघत होता. तेव्हा व्हीलच्या काम करण्याच्या प्रक्रियेचं त्याने निरीक्षण केलं. स्टीयरिंग व्हील फास्टनिंग यंत्रणेकडे बघताना अचानक डोक्यात वीज चमकली आणि हातात असलेल्या लागडावरच ड्रम रिव्हॉल्व्हरचे पहिले डिझाइन त्याने तयार केलं, जे नंतर जगभरातील सर्व रिव्हॉल्व्हर डिझाइनचे प्रोटोटाइप बनले.

यानंतर घरी परतून त्याने जगातील पहिल्या रिव्हॉल्व्हरचा नमुना तयार करण्यासाठी अनेक महिने घालवले. सॅम्युअलने तयार केलेली गोष्ट शूट करू शकते असा विश्वास कुणालाच नव्हता. पण सॅम्युअल ठाम होता. १९३५ मध्ये सॅम्युअल कोल्टने अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये त्याच्या शोधाचे पेटंट घेतले.

पेटंट ऍप्लिकेशनमध्ये, कोल्टने त्याच्या सिस्टममधील मुख्य फरक दर्शविला. कोल्टचं नावीन्य असं होतं की त्याने ट्रिगरच्या प्रत्येक पुलानंतर बॅरल्स आपोआप वळवण्याची एक विश्वासार्ह यंत्रणा आणली होती. जेणेकरून ते बोल्टच्या विरुद्ध अचूकपणे निश्चित केले जातील. सिंगल-बॅरल मल्टिपल-शॉट रिव्हॉल्व्हरच्या दिशेने हे पहिले पाऊल होतं.

शिवाय त्यापूर्वी, पिस्तूलमध्ये गोळ्या गोलाकार होत्या. पण सॅम्युअलने रिव्हॉल्व्हरसाठी दंडगोलाकार बुलेट तयार केल्या होत्या.

पेटंट मिळाल्यानंतर २२ वर्षीय सॅम्युअल कोल्टने नंतर आपल्या श्रीमंत व्यापारी काकांकडून पैसे घेतले आणि पेटंट शस्त्रास्त्र निर्मितीची नोंदणी केली. त्याच्या कंपनीने पॅटरसन शहरात शस्त्रास्त्रांची कार्यशाळा उघडली आणि पहिले कार्यरत रिव्हॉल्व्हर मॉडेल इथं दिसू लागले – “कोल्ट पॅटरसन”.

कोल्ट पॅटरसन रिव्हॉल्व्हरचा मुख्य फायदा हा होता की, त्या काळातील इतर पिस्तुलांपेक्षा याने वेगवान गोळीबार करण्याची आणि अनेक विरोधकांचा एकट्याने सामना करण्याची परवानगी दिली. मात्र अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. परिणामी, पॅटरसनमधील लहान कारखान्यात वाढलेली कार्यशाळा बंद पडली आणि कॉल्टच्या कंपनीने १९४२ दिवाळे काढले. त्यानंतर १९४६ पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.

दरम्यानच्या काळात अशा काही लढाया झाल्या ज्यात कोल्ट रिव्हॉल्व्हरचा वापर झाला. यात यश मिळाल्यामुळे कोल्ट रिव्हॉल्व्हरची मागणी वाढली. विक्री आणि त्यासोबत नफाही वेगाने वाढू लागला.

१८४६ मध्ये, जेव्हा मेक्सिकोशी युद्ध सुरू झाले, तेव्हा सरकारने तातडीने कोल्टला आणखी एक हजार नवीन, सुधारित रिव्हॉल्व्हर मागवले. नवीन रिव्हॉल्व्हर सैन्यात सेवेत दाखल झाल्यानंतर, कोल्टचं नाव संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झालं.  १८५२ मध्ये सॅम्युअल कोल्टला नौदल अधिकाऱ्यांसाठी रिव्हॉल्व्हरसाठी मोठी सरकारी ऑर्डर मिळाली. यानंतर कोल्ट आणि त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही. अंतराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला आणि नाविन्यपूर्ण रिव्हॉल्व्हरचे माॅडेल तयार करण्याला सुरुवात केली.

अमेरिकन गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर या ‘शस्त्र राजा’ची तब्येत झपाट्याने खालावली आणि  १० जानेवारी १८६२ रोजी हार्टफोर्ड इथे वयाच्या ४७ व्या जगाचा निरोप घेतला. पण कोल्ट रिव्हॉल्व्हरचं अजूनही जगभरातील लोकांना असलेल्या वेडाने सॅम्युअल कोल्टला अमर केलं आहे.

देवाने लोकांना मजबूत आणि कमकुवत, उंच आणि लहान, लठ्ठ आणि पातळ बनवले, परंतु मिस्टर कोल्टने रिव्हॉल्व्हरचा शोध लावला आणि त्यांच्या संधींना समान केलं, अशा शब्दांत कोल्ट याचं वर्णन केलं जातं.

एक मात्र नक्की म्हणता येईल की, सॅम्युअल कोल्ट यांनी रिव्हॉल्व्हरचा शोध लावून भारतीय नायकांना स्टाईलीश डायलाॅग्स तेवढे दिले.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.